New Information in Candolim Murder Case, Suchna Seth
तीन दिवसांपूर्वी कांदोळीत झालेल्या 4 वर्षीय मुलाच्या हत्येमुळे गोव्यासोबतच संपूर्ण देशभरातून हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेतील मुख्य आरोपी सूचना सेठ सध्या पोलिसांच्या ताब्यात असून तिची कसून चौकशी सुरू आहे.
सूचना तिच्या 4 वर्षांच्या मुलासोबत हॉटेलमध्ये राहिलेल्या रूममधून कफ सिरपच्या बॉटल आढळल्या असून या प्रकरणातील काही नवीन माहिती समोर आल्याने खळबळ माजली आहे.
काल (9 जानेवारी) आरोपी सूचनाला म्हापसा कोर्टातर्फे 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. त्यानंतर बाळाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. तेव्हा उशी अथवा हाताने मुलाचा गळा दाबून खून झाल्याचे समोर आले. तसेच शरीरावर रक्त किंवा जखमेच्या कोणत्याच खुणा आढळून आल्या नाहीत.
मात्र, गुदमरल्याने छाती आणि चेहऱ्याचा भाग फुगला होता. हत्येवेळी मुलाने धडपड केली असावी पण, त्याची कोणतीही स्पष्ट चिन्हे दिसत नाहीत, असे शवविच्छेदन करणारे डॉ. कुमार नाईक म्हणाले.
त्यामुळे सूचना हिने मुलाला ठार मारण्याआधी कफ सिरप पाजले असावे. कारण कफ सिरपमुळे थोडी गुंगी येते. त्यानंतर उशीच्या सहाय्याने मुलाची हत्या केली असावी असा स्पष्ट अंदाज वर्तविण्यात येतोय. सध्या मुलाचा व्हिसेरा पोलिसांनी राखून ठेवलाय. दरम्यान, कळंगुट पोलिसांना सिकेरीमधील गेस्ट हाऊसधून महत्त्वाचे धागेदोरे हाती सापडले असल्याचे कळते.
उपलब्ध माहितीनुसार, 6 जानेवारी जेव्हा सूचना आपल्या मुलासोबत गोव्यात आली तेव्हा 6 आणि 7 जानेवारीला ती त्याच्यासोबत गोव्यात फिरली असल्याचे कळते.
सूचना आणि तिचा पती वेंकटरामनमध्ये सध्या घटस्फोटाची प्रकिया सुरू आहे. त्यामुळे दोघेजण बेंगळुरूमध्ये वेगवेगळे राहत आहेत. दरम्यान, दोघांमध्येही बाळाच्या कस्टडीवरून न्यायालयीन लढाई सुरू आहे. मात्र सध्या मुलगा सूचनाच्याच ताब्यात असून प्रत्येक रविवारी वेंकटरामनला मुलाला भेटण्याची परवानगी कोर्टातर्फे देण्यात आली.
पतीची मुलाशी भेट होऊ नये यासाठी रविवार उजाडण्याआधीच सूचना मुलाला घेऊन गोव्यात आली. यावेळी वेंकटरामनला काही कामानिमित्त इंडोनेशियाला जावे लागले. रविवारी (7 जानेवारी) त्याने सूचनाच्या फोनवर मुलासोबत बोलण्यासाठी व्हिडिओ कॉल केला होता. त्यानंतर ही घटना घडली. मुलाला आणि वडिलांना वेगळे करण्याच्या रागातूनच पुढे सूचनाने हे दुष्कृत्य केल्याचे कळते.
बेंगळुरूस्थित आर्टिफिशियल इंटेलिजेंस स्टार्टअपची सीईओ सूचना सेठ ही सध्या गोवा पोलिसांच्या कोठडीत आहे. यानंतर घटनेचा अधिक तपास करण्यासाठी पोलिसांनी तिच्या कंपनीच्या पत्त्यावर भेट दिली असता तिचे स्वतंत्र ऑफिस नसून, शेअरिंगमध्ये असलेले ऑफिस आढळून आले.
तसेच बेंगळुरूमध्ये ती ज्या अपार्टमेंटमध्ये राहत असल्याचे बोलले जाते, तिथे पोलिसांनी तपासणी केली असता तिने साधारण 4 महिन्यांपूर्वीच ती अपार्टमेंट सोडली असल्याचे समोर आले. सदर प्रकरणातील नव्याने समोर आलेल्या या सर्व गोष्टींमुळे तिढा अधिकच वाढत आहे.
काल जेव्हा सूचनाला म्हापसा न्यायालयात हजर केले तेव्हा ती मानसिक आजाराची शिकार असल्याचे मत वकिलांनी व्यक्त केले. मात्र वस्तूस्थिती काहीतरी वेगळीच असल्याचे कळते. मुलाचा खून करून त्याचा मृतदेह बॅगेत भरून जेव्हा सूचना टॅक्सीमधून बेंगळुरूला जात होती तेव्हा तिच्या चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारची भीती नव्हती किंवा पश्चात्तापाचा लवलेशही नव्हता. ती अतिशय बिनधास्तपणे काहीच न झाल्यासारखे गाडीत बसली होती, असे त्या टॅक्सीचालकाने सांगितले आहे.
सोबतच पोलीस चौकशीमध्ये तिच्या उत्तरांवरून ती मानसिकरित्या तणावाखाली नसल्याचे पोलिसांना जाणवले. त्यामुळे सूचना खरंच तणावाची शिकार होती का? की अतिशय शांत डोक्याने पूर्वतयारी करून तिने हे कृत्य केले? याचा खुलासा होणे बाकी आहे.
हत्या झालेल्या चार वर्षीय मुलाचा मंगळवारी रात्री चित्रदुर्गमध्ये शवविच्छेदनानंतर मृतदेह पोलिसांनी कुटूंबियांच्या स्वाधीन केला होता. त्यानंतर आज बुधवार (10 जानेवारी) सकाळी वडील वेंकटरामन यांनी मुलाच्या पार्थिवावर बेंगळुरूमधील हरिश्चंद्र घाटात अंत्यसंस्कार करण्यात आले. पती-पत्नीच्या नात्यातील तणावामध्ये बिचाऱ्या 4 वर्षांच्या मुलाचा निष्पाप बळी गेला. या घटनेमुळे सध्याच्या पिढीतील नातेसबंधातील असुरक्षिततेची भावना अधोरेखित होत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.