Goa New Academic Year Dainik Gomantak
गोवा

Goa Education: एप्रिलमध्ये शाळा नकोच! पालकांचा कडाडून विरोध, निवेदनावर 10 हजारहून अधिक स्वाक्षऱ्या; काय आहेत कारणे? वाचा

New Academic Year in Goa: शैक्षणिक वर्ष यंदा १ एप्रिलपासून होत आहे. परंतु हा निर्णय घेताना आम्‍हाला विश्‍‍वासात घेण्‍यात आले नाही, असे पालकांचे म्‍हणणे आहे.

Sameer Panditrao

Goa Schools Academic Year News

पणजी: नवीन शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने राज्य सरकारने यंदा पहिल्यांदाच एप्रिल महिन्यात शैक्षणिक वर्ष सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र त्‍यास विद्यार्थी आणि पालकांचा विरोध दिवसेंदिवस वाढू लागला आहे. या निर्णयाविरोधात राज्यभरात स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येत आहे.

शैक्षणिक वर्ष यंदा १ एप्रिलपासून होत आहे. परंतु हा निर्णय घेताना आम्‍हाला विश्‍‍वासात घेण्‍यात आले नाही, असे पालकांचे म्‍हणणे आहे. काही शिक्षणतज्‍ज्ञ व शाळांनीही सरकारच्‍या या निर्णयाला आक्षेप घेतला आहे. अवघ्‍याच काही पालकांनी पाठिंबा दर्शविला आहे. एप्रिलमध्ये शैक्षणिक वर्ष सुरू करण्याचा निर्णय घेण्यापूर्वी शिक्षण संचालनालयाने संबंधित सर्व घटकांना विश्‍‍वासात घेणे आवश्‍‍यक होते.

परंतु तसे काही झाले नाही. ज्या प्रकारचे निर्णय घेतले जात आहेत, ते पाहता त्‍यांना तांत्रिक आवश्‍‍यकतेनुसार वेळ भरून काढायचा आहे, असेच दिसते. सद्यःस्थितीत नव्या शैक्षणिक वर्षाच्या बदलांमध्ये योग्य नियोजन दिसून येत नाही, असा आरोप होत आहे. परंतु सरकार एप्रिलमध्येच शैक्षणिक वर्ष सुरू करण्यावर ठाम आहे. याबाबत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी देखील ‘एप्रिलमध्ये शाळा सुरू करण्याचा निर्णय पालक आणि शिक्षकांच्‍या हितासाठी नाही तर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी घेण्यात आला आहे’ असे स्पष्ट केले आहे.

सरकार ठाम

सरकार एप्रिलमध्येच शैक्षणिक वर्ष सुरू करण्यावर ठाम आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनीही तसे विधान केले आहे, परंतु पालकांच्‍या वाढत्‍या विरोधामुळे सरकार कोणता निर्णय घेते याकडे लक्ष लागले आहे.

वाढत्‍या उष्‍म्‍याने चिंता वाढवली

राज्‍यात फेब्रुवारीपासूनच उकाडा जाणवू लागला असून पारा ३७ अंशांपर्यंत जाऊन आला आहे. उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. या पार्श्वभूमीवर एप्रिलपासून शैक्षणिक वर्ष सुरू करण्‍याच्‍या घेतलेल्‍या सरकारच्‍या निर्णयाबाबत नाराजी व्‍यक्त करण्‍यात येत आहे. मुलांच्‍या आरोग्‍याबाबत पालक चिंता व्‍यक्त करू लागले आहेत.

आत्तापर्यंत दहा हजार पालकांची स्‍वाक्षरी

आत्तापर्यंत राज्याच्‍या विविध भागातील सुमारे दहा हजार पालकांनी सरकारच्‍या या निर्णयाविरोधातील निवेदनावर स्वाक्षरी केली आहे. गेल्या वर्षी इयत्ता नववीसाठी राष्ट्रीय शिक्षण धोरणाची (एनईपी) अंमलबजावणी करण्यात आली होती.

काही आक्षेपार्ह मुद्दे

एप्रिल महिन्यात मोठ्या प्रमाणात उष्मा जाणवतो. राज्यातील बहुतांश शाळांमध्‍ये योग्य साधनसुविधा नाहीत. अशा परिस्थितीत एप्रिलमध्ये शाळा सुरू करण्याचा अट्टहास का?

आठवीपर्यंतचा मुलांना सरसकट उत्तीर्ण करण्याचा निर्णय कायम आहे. नववीची मुले एप्रिलमध्ये दहावीच्या वर्गात बसतील, परंतु नापास झालेले विद्यार्थीही दहावीची परीक्षा देतील. जे नववीची परीक्षा उत्तीर्ण न होता दहावीच्या वर्गात जातील अशा विद्यार्थ्यांची इतर विद्यार्थ्यांकडून खिल्ली उडविली जाऊ शकते. त्यांच्यावर मानसिक ताण येऊ शकतो.

नवीन शैक्षणिक धोरणात कुठेही एप्रिलमध्ये नवीन शैक्षणिक वर्ष सुरू करण्याची सक्ती करण्यात आलेली नाही. तरीसुद्धा हा निर्णय केवळ वेळ भरण्यासाठी म्हणून घेणे चुकीचे आहे.

मोजक्याच शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. परीक्षेनंतर शिक्षकांचा वेळ उत्तरपत्रिका तसेच निकाल बनविण्यातच जातो. अशा वेळी विद्यार्थ्यांना कसे शिकवायचे याबाबत स्पष्टता नाही.

नवीन शैक्षणिक वर्ष एप्रिलपासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यापूर्वी शिक्षक, पालक, शाळा व्यवस्थापनाशी चर्चा करणे आवश्‍‍यक होते. मात्र अचानक शेवटच्या क्षणी घेतलेल्या या निर्णयामुळे संभ्रमावस्था निर्माण झालेली आहे.

आपल्या तांत्रिक बाबी पूर्ण करण्यासाठीच सरकार एप्रिलपासून शैक्षणिक धोरण लागू करत पाहत आहे. पूर्वी ‘वर्किंग डे’ आणि ‘इनस्‍ट्रक्‍शनल डे’ कोणते असतील, याबाबत माहिती दिली जायची. परंतु सरकार आता नेमके कशा पद्धतीने निर्णय घेऊ इच्छिते याबाबत स्पष्टता नाही. प्रत्येक प्रदेशातील हवामानाचा घटक हासुद्धा महत्त्‍वाचा मुद्दा ठरतो. त्याबाबतही विचार होणे गरजेचे आहे.
नारायण देसाई, शिक्षण तज्‍ज्ञ
अशा प्रकारचा निर्णय घेण्यापूर्वी पालकांच्या बैठका घेऊन त्यांना विश्‍वासात घ्यायला हवे होते. परंतु तसे न झाल्याने आता पालकांचा विरोध वाढू लागला आहे. राज्यातील शाळा किंवा ज्या काही साधनसुविधा पुरविल्या जातात, त्या विद्यार्थ्यांना उष्‍म्‍यापासून बचावासाठी योग्य आहेत का? असे अनेक प्रश्‍न आहेत. त्यामुळे या सगळ्यावर उपाय काढूनच अशा प्रकारचा निर्णय घेणे योग्य ठरेल.
कालिदास मराठे, शिक्षण तज्‍ज्ञ

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

अर्ध्या तासाहून अधिक वाट पाहिली, रुग्णवाहिका वेळेवर न मिळाल्याने 46 वर्षीय वीज कर्मचाऱ्याचा मृत्यू; म्हापशातील धक्कादायक घटना

Goa Murder Case: पीर्ण येथे तरुणाचा खून? खुल्या पठारावर मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ

Operation Sindoor: 'कोण काय करतं, कधी येतं, सगळं माहीतीये,' ऑपरेशन सिंदूरसाठी भारतीय नौदल सज्ज; व्हाईस ॲडमिरल वात्स्यायन यांचं वक्तव्य VIDEO

LeT terrorist shot dead: हाफिज सईदचा खास माणूस, लष्कर ए तैयबाचा दहशतवादी शेख मोईज मुजाहिदची गोळ्या घालून हत्या; Photo, Video समोर

Australia vs India, 2nd T20: टीम इंडियाचा फ्लॉप शो! मेलबर्नमध्ये 17 वर्षांनंतर पराभव, ऑस्ट्रेलियानं 4 गडी राखत मिळवला विजय

SCROLL FOR NEXT