Khari Kujbuj Political Satire Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: खरी कुजबुज; मळ्यात मद्यविक्रेता निवडणूक लढवणार

Khari Kujbuj Political Satire: कोणताही भारतीय नागरिक देशातील कोणत्याही राज्यात स्थायिक होऊ शकतो, इतर राज्यातील नागरिक गोव्यात मतदार यादीत नावे नोंद करू शकतात.

Sameer Panditrao

नेपाळी बनले गोंयकार!

कोणताही भारतीय नागरिक देशातील कोणत्याही राज्यात स्थायिक होऊ शकतो, इतर राज्यातील नागरिक गोव्यात मतदार यादीत नावे नोंद करू शकतात. परंतु आता नेपाळी नागरिकांची नावे गोव्याच्या मतदार यादीत मोठ्या प्रमाणात येऊ लागली आहेत. त्यामुळे आता परदेशी नागरिक हे गोवेकर होण्यासाठी स्पर्धा करत असल्याचे एल्वीस गोम्स यांनी निदर्शनास आणून दिले आहे. हा प्रकार मूळ गोमंतकीयांच्या मतदानाचे मोल कमी करणारा आहे. गोम्स यांनी अधिकारी म्हणून प्रशासकीय काम जवळून पाहिले आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांचे काम कशा प्रकारे चालते, याचा अनुभवही त्यांनी घेतला आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांकडून पराचा कावळा कशा प्रकारे केला जातो, याची इत्थंभूत माहिती त्यांना आहे. गोव्याच्या अस्मितेवर घाला घालणारा हा प्रकार असल्यामुळे हा प्रश्‍न येत्या दिवसात अधिक चिघळण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे. राज्यातील मतदार यादींची पडताळणी करून अवैध नावांची मोठी यादी समोर येणार असल्याचे संकेतही गोम्स यांनी दिले आहेत. ∙∙∙

दामूचे विधान चुकले का?

फातोर्डा भाजप कार्यकर्ता मेळाव्यात मडगावचे आमदार दिगंबर कामत यांनी आपल्या भाषणात सांगितले, की आपण कॉंग्रेस पक्षातर्फे मुख्यमंत्री असताना दामू नाईक यांची सर्व कामे केली. फातोर्डा व मडगावला आपण कधीच वेगळे मानले नाही. मात्र लगेच दामूने आपल्या भाषणात कॉंग्रेसच्या काळात काहीच विकास झाला नाही असे भाष्य केले. दिंगबरच्या विधानाचा हा विपर्यास झाला नाही का? तोही दिगंबरांच्याच उपस्थितीत! लगेच कार्यकर्त्यांमध्ये कुजबूज सुरू झाली. ∙∙∙

...कार्यकर्त्यांशी संवाद!

माजी मंत्री गोविंद गावडे रविवारी बेतकीच्या ‘बिग-बी’च्या भव्य सभागृहात कार्यकर्त्यांशी संवाद साधणार असून संवाद सोहळ्याची जोरदार तयारी चालली आहे. बहुसंख्य कार्यकर्ते या संवाद कार्यक्रमाला जमण्याची शक्यता आहे. कारण या ठिकाणी गोविंद गावडे नेमका काय संवाद साधणार, कार्यकर्त्यांना काय सांगणार? याबाबत मतदारांना जाणून घ्यायचे आहे. कदाचित गोविंद गावडे यावेळी पुढील दिशा कशी असेल, वाटचाल कशी करावी, याबाबत मार्गदर्शन करण्याची शक्यता आहे. पण काहींना वाटते, की नेहमीप्रमाणे हे एक शक्तिप्रदर्शन असेल! ∙∙∙

मळ्यात मद्यविक्रेता निवडणूक लढवणार!

महानगरपालिका निवडणुका पुढील वर्षी होणार आहेत. त्या निवडणुकीत भाजपचे माजी नेते आणि मद्य व्यवसायाशी निगडित असलेले दत्तप्रसाद नाईक यांनी पणजी महानगरपालिका निवडणुकीत स्वतंत्र पॅनल उभे करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु सध्या मळा परिसरात मोठी चर्चा सुरू झाली आहे, ती मद्यविक्रेत्याला रिंगणात उतरवण्याची सुरू असलेल्या तयारीची. ज्या प्रभागातून या मद्यविक्रेत्याला उभे करण्याचे घाटत आहे, त्या प्रभागातील नागरिकांची मात्र चंगळ असणार आहे. निवडणूक वेगवेगळ्या कारणांनी गाजणार आहे.सध्या जे निवडणूक लढवू इच्छित आहेत, ते उघडपणे काहीच सांगत नाहीत. बाबूश मोन्सेरात यांच्या पॅनलमधून कोणाला उमेदवारी मिळेल आणि कोणाचा पत्ता कट होईल, याविषयी कोणीच काही सांगू शकत नाही. बाबूश गटाकडून सध्या आठ ते दहा जणांचे चेहरेच पुन्हा रिंगणात असतील, उर्वरित नवे चेहेरे रिंगणात उतरविले जातील, असे त्यांचेच समर्थक सांगत आहेत. ∙∙∙

मडगावचे बसस्‍थानक कुणामुळे अडले!

शुक्रवारी फातोर्डा भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा झाला, त्‍यावेळी प्रदेशाध्‍यक्ष दामू नाईक यांनी अगदी झंझावती भाषण करताना, फातोर्ड्याचे सध्‍याचे आमदार आपण विकास केला असे म्‍हणतात, तर अजून मडगावात सुसज्‍ज बसस्‍थानक का उभे झाले नाही? असा सवाल करून विजयला अडचणीत आणण्‍याचा प्रयत्‍न केला. दुसऱ्या बाजूने याच कार्यक्रमात बोलताना मुख्‍यमंत्री प्रमोद सावंत यांनी आपल्‍याला संपूर्ण गोव्‍याचा विकास व्‍हायला हवा, यासाठी आपण विरोधकांच्‍याही मतदारसंघातील महत्त्वाचे विकास प्रकल्‍प अडवून ठेवत नाही, असा उल्‍लेख केला. मागची १३ वर्षे गोव्‍यात भाजपचे सरकार आहे आणि तरीही मडगावसारख्‍या दक्षिण गोव्‍याच्‍या जिल्‍हा राजधानीतील बसस्‍थानक अजून पत्र्याच्या शेडमध्‍ये आहे. यासाठी आता दोषी ठरवायचे असेल तर कुणाला बरे ठरवायचे? ∙∙∙

लोबो दाम्पत्याला मंत्रिपद?

लोबो दाम्पत्यांपैकी एकाला मंत्रिपद मिळणार अशी जोरदार चर्चा आहे. पक्षांतर्गत गटबाजीला तोंड देण्यासाठी वरिष्ठांनी खेळलेली ही खेळी आहे, असे राजकीय विश्लेषक बोलतात. गावडे यांना हटवून लोबोंना आणणार की अजून कुणाला डच्चू देणार, यावर भाजपमध्येच दोन गट पडले आहेत. एक गट म्हणतोय, लोबोंना आताच आणल्यास आगामी निवडणुकीत पक्षाला फायदा होईल, तर दुसरा गट याला एकाधिकारशाही वाढवण्याचा प्रयत्न म्हणतोय. लोबो दाम्पत्य खूश असले तरी, या मंत्रिपदामुळे पक्षात नवी राजकीय धुसफूस सुरू झाली आहे हे निश्चित! ∙∙∙

फातोर्ड्यात कमळ फुलवण्याचे स्वप्न!

फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांनी आपला वाढदिवस ज्या पद्धतीने साजरा केला आणि सर्व राजकीय पक्षातील लोकांना एकत्रित आणले, त्यातून त्यांची मतदारसंघावर पकड किती घट्ट आहे, हे दिसून आले. सरदेसाई यांना येथे आव्हान द्यायचे झाल्यास भाजपला सर्व ताकद पणाला लावावी लागेल, हेही भाजपच्या पक्षश्रेष्ठींना माहीत आहे. मतदारसंघातील कार्यकर्त्यांना पाठबळ देण्यासाठी मेळाव्यात केलेली भाषणे ही राजकीय व्यासपीठ गाजवणारी असतात. वास्तव वेगळे असते, सरदेसाई यांनी फातोर्डात आणि शेजारी मडगावात दिगंबर कामत यांनी जसे मतदारसंघात पाय रोवले आहेत, त्यावरून त्यांचे मतदारसंघातील प्राबल्य किती आहे, हे दिसून येते. परंतु दुसरीकडे अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही शक्य होतात आणि मी-मी म्हणणाऱ्या राजकारण्यांनाही मतदारांनी घरी पाठवले आहे. मात्र, मतदारांशी एकरूप झालेले आणि त्यांच्यासाठी उपलब्ध राहिल्यास त्यांच्यापासून पराभव फार दूर असतो. फातोर्डात दामू नाईकांनतर कमळ फुलवण्याचे स्वप्न नेत्यांनी दाखविले असले तरी सत्यात येईल का, हे तेथील मतदारांनाच माहीत. ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT