Goa Education News Dainik Gomantak
गोवा

Goa Education: नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात! 9वी, 10वीला एनईपी, 6वीसाठी ‘ब्रिज’ अभ्यासक्रम; काय आहेत महत्त्वाचे बदल? वाचा..

New Academic Year Goa: या नव्या शैक्षणिक वर्षाला आडकाठी आणण्याचा प्रयत्न होऊनही विद्यार्थ्यांचे हित समोर ठेवून सरकारने हा निर्णय सार्थ ठरविला आहे.

Sameer Panditrao

Goa schools implement NEP 2025

पणजी: राज्यात राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या (एनईपी) कार्यवाहीसाठी सोमवारपासून (७ एप्रिल) सहावी ते बारावीच्या (अकरावी वगळता) नव्या शैक्षणिक वर्षाला प्रारंभ होत आहे. नववी व दहावीच्या इयत्तेसाठी ‘एनईपी’ लागू होत आहे, तर सहावीच्या वर्गासाठी ब्रिज (ॲक्टीव्हिटी बेस्ड लर्निंग) अभ्यासक्रमाने शैक्षणिक वर्षाचा अध्याय सुरू आहे.

यावर्षी या नव्या शैक्षणिक वर्षाला आडकाठी आणण्याचा प्रयत्न होऊनही विद्यार्थ्यांचे हित समोर ठेवून सरकारने हा निर्णय सार्थ ठरविला आहे. गोव्याच्या इतिहासात पहिल्यांदाच एप्रिल महिन्यात शैक्षणिक वर्षाला सुरुवात होत असून उद्याचा ऐतिहासिक दिवस आहे. विद्यार्थ्यांच्या उपस्थितीने वर्ग गजबजणार आहेत.

नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीला सुरुवात झाल्यानंतर शैक्षणिक क्षेत्रात अनेक नवीन निर्णय घेण्यात आले; परंतु गोव्याच्या शैक्षणिक क्षेत्रात आमूलाग्र बदल घडविणारा, परंपरागत चालत आलेल्या शाळेच्या वेळा आणि शैक्षणिक वर्षात बदल घडविणारा हा निर्णय आहे. नवीन शैक्षणिक धोरणाद्वारे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी सरकारकडून महत्त्वपूर्ण पावले उचलली जात आहेत. विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात व्यावसायिक कौशल्य, स्पर्धात्मक आव्हाने, क्षमता आधारित स्पर्धा आदींचा समावेश करण्यात आला आहे.

त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी केवळ पुस्तकी अभ्यासक्रमाला प्राधान्य न देता त्‍यांची आवड, कौशल्य वाढीचा प्रयत्न केला जात आहे. जुन्या शैक्षणिक धोरणाच्या तुलनेत नवीन धोरणाद्वारे हसत-खेळत आणि विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार शिकवण्याला प्राधान्य देण्यात येत आहे.

इयत्ता सहावी ते बारावीमध्ये (अकरावी वगळता) राज्यातील सुमारे १ लाख ३० हजार विद्यार्थी शिकत आहेत. या विद्यार्थ्यांना पहिल्यांदाच एप्रिलमध्ये शैक्षणिक वर्ष सुरू होण्याच्या अनुभवाला सामोरे जावे लागत आहे. या विद्यार्थ्यांसाठी, शिक्षकांसाठी देखील हा अनुभव नवा असणार आहे. दरवर्षी शैक्षणिक वर्ष एप्रिलच्या अखेरीस संपते. मात्र, या महिन्यात विद्यार्थ्यांचे वर्ग नसतात. शाळेतील कर्मचारी व शिक्षक मात्र काम करतात. आता भर एप्रिलमध्ये विद्यार्थीही शाळेमध्ये दिसणार आहेत.

पुरेशी पुस्तके उपलब्ध, शेटगावकर

अभ्यासासाठी लागणारी सर्व पुस्तके आम्ही शाळांपर्यंत पोहोचविली आहे. प्रत्येक शाळेला पत्र पाठवून अभ्यासक्रमाची पुस्तके तालुका स्तरावर देण्यात आली असून तेथून ती घेण्यास सांगितले आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना पुस्तके मिळाली आहेत. अजून तरी एकही शाळेकडून पुस्तके मिळाली नसल्याची तक्रार आलेली नाही, असे राज्य शिक्षण संशोधन व प्रशिक्षण मंडळाच्या संचालक मेघना शेटगावकर यांनी सांगितले.

आजपासून होणारे बदल

नवीन शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने सहावी ते दहावी आणि बारावीचे नवे शैक्षणिक वर्ष ७ एप्रिलपासून सुरू होत असून वर्ग सकाळी ११.३० वाजेपर्यंतच असतील.

यंदापासून नववीतील विद्यार्थ्याला अंतिम निकालापूर्वीच एप्रिलपासून दहावीच्या वर्गाचा अभ्यासक्रम शिकविण्यात येईल.

जे विद्यार्थी नववीच्या अंतिम निकालात नापास होतील, त्यांच्यासाठी जुलैमध्ये पुरवणी परीक्षा असेल.

इयत्ता सहावी ते आठवीसाठी वर्षातील दहा दिवस हे विनादप्तर शाळा असेल.

शिकविण्याचा तास ४० मिनिटांचा असेल. त्यासोबतच विषयानुरूप तासांची विभागणी केली आहे.

काही महत्त्वाचे बदल

१. इयत्ता सहावी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिकविण्याचे माध्यम इंग्रजी असेल. परंतु, ज्या शाळा इतर भाषांमधून शिकवितात, त्यांच्यासाठी नियमात शिथिलता असेल.

२. नवीन शिक्षण धोरण लागू झालेल्या विद्यार्थ्यांना दोन सत्रांत शिकविण्यात येईल. विद्यार्थ्यांचे मूल्यांकन हे प्रात्यक्षिक आणि सैद्धांतिक परीक्षा अशा दोन्ही माध्यमांतून करण्यात येणार आहे.

३. आठवीपर्यंतच्या परीक्षांच्या प्रश्‍नपत्रिका राज्य शिक्षण संशोधन व प्रशिक्षण मंडळाकडून (एससीईआरटी) काढण्यात येतील, तर नववीपासून बारावीपर्यंतच्या प्रश्‍नपत्रिका गोवा मंडळातर्फे काढण्यात येतील. परंतु, उत्तरपत्रिका चाचणी शालेय पातळीवरच होईल.

४. इयत्ता दहावीची एकमेव अंतिम परीक्षा असेल. विद्यार्थ्यांचे मूल्यांकन २० गुणांची अंतर्गत आणि ८० गुणांची वार्षिक परीक्षा असेल. विद्यार्थ्यांना अंतर्गत आणि वार्षिक परीक्षेतही उत्तीर्ण व्हावे लागेल.

तो प्रश्न पालक आणि शाळेचा, झिंगडे

सहावी ते आठवीपर्यंत ‘एससीईआरटी’चा अभ्यासक्रम शिकविला जाणार आहे, तर नववी ते दहावी आणि बारावीला उद्यापासून गोवा शालान्त मंडळाचा अभ्यासक्रम शिकविला जाईल. सकाळी ११.३० वाजेपर्यंतच वर्ग सुरू ठेवण्याचे आम्ही शाळा व्यवस्थापनांना कळविले आहे. यापूर्वी दहावीचे वर्ग देखील शाळा घेत होती. त्यामुळे आता जर काही उपक्रम शाळा सुरू करू पाहत असतील तर तो पालकांचा आणि शाळेचा प्रश्न आहे. त्यात आम्ही दखल देणार नाही, असे शिक्षण संचालक शैलेश झिंगडे यांनी स्पष्ट केले.

इयत्ता दहावीचा आज निकाल

मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या दहावीच्या शालान्त परीक्षेचा निकाल सोमवार, ७ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता जाहीर करण्यात येणार असल्याचे गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केले आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर www.gbshse.in या संकेतस्थळावरून पाहता येईल. ९ एप्रिलनंतर निकालाची प्रत शाळेच्या संकेतस्थळावर तसेच डिजिलॉकरच्या माध्यमातून उपलब्ध होईल.

शाळा सकाळी ११.३० वाजेपर्यंतच

उष्म्या सुसह्य होण्यासाठी शाळांमध्ये साधनसुविधा उपलब्ध असल्याचा आढावा घेण्यात आला आहे. साहाय्यक शिक्षण निरीक्षकांना त्याची माहिती घेण्याची सूचना केली आहे. शाळा सकाळी ११.३० वाजेपर्यंतच असल्याने तशी उष्म्याची झळ विद्यार्थ्यांना बसणार नाही. पावसाळ्यापूर्वी सुविधा उपलब्ध करण्याबाबत शाळा व्यवस्थापनांना कळविले आहे, अशी माहिती शिक्षण संचालक शैलेश झिंगडे यांनी दिली.

पालकांचे आज आंदोलन

उच्च न्यायालयाने नवीन शैक्षणिक वर्ष एप्रिलमध्ये सुरू करण्याच्या सरकारच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करून पालकांची याचिका फेटाळल्यानंतरही नवीन शैक्षणिक वर्षाला काही पालक विरोध करत आहेत. ज्या पालकांना एप्रिलमध्ये शाळा सुरू झालेली नको आहे, ते ७ एप्रिल रोजी शिक्षण संचालनालय, पर्वरी येथे आंदोलन छेडणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Konkan Culture: कोकणातली अनोखी परंपरा! नागपंचमीला लहानथोर रंगतात 'भल्ली भल्ली भावय'च्या खेळात, रंगतो वाघ-नागाचा खेळ

कोल्हापूर-गोवा मार्ग तिसऱ्यांदा वाहतुकीस बंद, पावसामुळे खोळंबा; प्रवाशांची मोठी गैरसोय!

Goa Waterfall Ban: दक्षिण गोव्यात 'नो एंट्री' झोन! नद्या, धबधबे आणि खाणींमध्ये पोहण्यास बंदी; जिल्हाधिकाऱ्यांकडून आदेश जारी

SBI Manager कामासाठी गोव्यात आली अन् मुंबईच्या घरातून चोरी झाली लाखोंची थार

Ganesh Idol: '..फिरत्या चाकावरती देशी मातीला आकार'! पार्सेतील कुटुंब रंगलंय चित्रशाळेत; श्री गणरायाच्या आगमनाची लगबग

SCROLL FOR NEXT