सासष्टी: मांस विक्रेते त्यांचा कचरा संबंधित गोवा मांस कॉम्प्लेक्सला नेऊन देतात असे सांगतात. आम्ही त्यांना त्याबद्दल पुरावा आणण्यास सांगितले आहे. शिवाय ‘एसजीपीडीए’ही लवकरात लवकर ‘ईटीपी प्लांट’ उभारणार आहे. या सर्व मांस विक्रेत्यांना गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून सात दिवसांच्या आत परवाना आणण्यासाठी सांगितल्याचे पर्यावरणमंत्री आलेक्स सिक्वेरा यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
मडगावच्या एसजीपीडीए मार्केटमधील मांस विक्रेत्यांनी पर्यावरण व कायदा मंत्री आलेक्स सिक्वेरा यांची आज जिल्हा प्रशासन कचेरीत भेट घेतली व त्यांच्यासमोर आपली कैफियत मांडली. मांस विक्रेत्यांनी स्पष्ट केले की आमच्यापैकी एकही मांस विक्रेता रस्त्याच्या बाजूला खराब झालेले मांस फेकत नाही, जर कोणी तसे करताना सापडला तर आम्ही लगेच ही बाब संबंधित अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून देऊ.
आज आपल्याला अनेक लोक येऊन मिळाले. काहींचे म्युटेशनचे तर काहींचे रस्ता अडथळ्याचे प्रश्न होते. काही लोक गणेश विसर्जनाच्या जागा स्वच्छ करण्याबाबत विनंती करीत होते. गणेश विसर्जनाच्या जागा जलस्रोत किंवा सिंचन खात्यामार्फत स्वच्छ करून दिल्या जाणार असल्याचे मंत्री सिक्वेरा यांनी सांगितले.
एसजीपीडीए मार्केटमधील मांस विक्रेत्यांनी एसजीपीडीएचे सदस्य सचिव शेख अली यांची भेट घेऊन आपली दुकाने बंद केली जाण्याची शक्यता व्यक्त केली होती. त्याचप्रमाणे ते मलनिस्सारण जोडणीसाठी वाहिनी नसल्याने जोडणी अशक्य असल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून दिले होते.
मांस विक्रेत्यांतर्फे बोलताना मुनीर खान यांनी सांगितले की, आमचा कचरा पिसुर्ले येथील गोवा प्रोट्युनला पाठवला जातो. आम्ही तसे मंत्र्यांना सांगितले आहे व त्यांनी त्याबद्दल पुरावा आणण्यास सांगितले आहे व पुढील आठवड्यात आम्ही ते सादर करू. ‘एसजीपीडीए’नेही आम्हाला सहकार्य देणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
सासष्टी मामलेदार कचेरीतील अधिकाऱ्यांनी एसजीपीडीए मार्केटमधील मांस विक्रेत्यांना नाशवंत मांस आपल्या दुकानात ठेवू नये, असे बजावले होते. गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आदेशानुसारच आम्हाला ही कारवाई करावी लागते, असे जिल्हाधिकारी कचेरीतील अधिकाऱ्यांनी या विक्रेत्यांना स्पष्टपणे सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.