Nawazuddin Siddiqui's film Costao  Dainik Gomantak
गोवा

Costao Movie: चर्चिलचा वाढदिवस, केनेडीचे लग्‍न अन् आल्‍वेर्नाझचा मृत्‍यू! ‘कॉस्‍तांव’ सिनेमामुळे 34 वर्षांपूर्वीच्‍या घटनांना उजाळा

Costao Gold Smuggling Case: चर्चिल यांचे कनिष्‍ठ बंधू केनेडी आलेमाव यांचे त्‍या दिवशी लग्‍न होेते. त्‍यामुळे आलेमाव कुटुंबीयांसाठी हा आनंदाचा दिवस हाेता.

Sameer Panditrao

मडगाव: १६ मे १९९१ हा दिवस संपूर्ण गोवेकरांच्‍या लक्षात जसा ठळकपणे कोरला गेला तसाच तो आलेमाव कुटुंबीयांसाठीही. त्‍या दिवशी डॉ. लुईस प्रोत बार्बोझा यांच्‍या मंत्रिमंडळात क्रीडामंत्री असलेले चर्चिल आलेमाव यांचा वाढदिवस होता.

चर्चिल यांचे कनिष्‍ठ बंधू केनेडी आलेमाव यांचे त्‍या दिवशी लग्‍न होेते. त्‍यामुळे आलेमाव कुटुंबीयांसाठी हा आनंदाचा दिवस हाेता. मात्र, चर्चिल बंधू आल्‍वेर्नाझ आलेमाव यांचे निधनही त्‍याच दिवशी झाले. नुकत्‍याच प्रदर्शित झालेला नवाजुद्दीन सिद्दीकी यांच्‍या ‘कॉस्‍तांव’ या चित्रपटामुळे या जुन्‍या घटनांना पुन्‍हा उजाळा मिळाला आहे.

१ मे रोजी ‘झी-५’ या ओटीटी प्‍लॅटफॉर्मवर हा चित्रपट प्रदर्शित झाला. हा चित्रपट काल्‍पनिक असल्‍याचे सांगितले असले, तरी प्रत्‍यक्षात या चित्रपटात जो घटनाक्रम दाखविला आहे, तो आणि चित्रपटाचे नाव पाहिल्‍यास यातील बऱ्याच घटना फात्राडेच्‍या त्‍या कथित तस्‍करी घटनेशी साम्‍य आहेत.

असे नेमके त्‍या दिवशी काय घडले? ज्यामुळे हा दिवस गाेवेकरांच्‍या स्मृतीतून अजुनही जात नाही? १६ मे १९९१ राेजी गोवा मंत्रिमंडळात क्रीडामंत्री असलेले चर्चिल आलेमाव यांच्‍या वाढदिवसानिमित्त रात्रीच्‍यावेळी पार्टीचे आयाेजन केले होते. त्‍यामुळे वार्का गावात एकप्रकारची लगबग चालू होती. अशातच सकाळी ११ वाजण्‍याच्‍या सुमारास ती दु:खद गोष्‍ट ‘आलेमाव मेन्‍शन’मध्‍ये येऊन धडकली. चर्चिलची कॉन्‍टेसा गाडी घेऊन फात्राडे समुद्र किनाऱ्यावर गेलेल्‍या आल्‍वेर्नाझ याला कस्‍टम अधिकारी कॉस्‍तांव फर्नांडिस याच्‍याशी झालेल्‍या झटापटीत मृत्‍यू आला होता. या बातमीने फक्‍त आलेमाव कुटुंबातच नव्‍हे, तर संपूर्ण वार्का गावात जणू एक बाँबस्‍फोटच होता.

तो काळच असा होता की, त्‍यावेळी साेने आणि चांदी त्‍याचप्रमाणे विदेशी कपडे आणि इलेक्‍ट्रॉनिक वस्‍तूंची तस्‍करी केली जायची. गोव्‍यातील कित्‍येक जागा या तस्‍करीच्‍या लँडींगसाठी वापरल्‍या जात असत. त्‍यापैकीच एक जागा म्‍हणजे फात्राडेची किनारपट्टी.

सध्‍या मुंबईत वास्‍तव करून असलेले आणि त्‍यावेळी गोव्‍याच्‍या कस्‍टममध्‍ये अधिकारी म्‍हणून काम करणारे कॉस्‍तांव फर्नांडिस यांना विचारले असता ते म्‍हणाले, ‘मी त्‍यावेळी आके - मडगाव येथे रहात हाेताे. १६ मे रोजी फात्राडे समुद्र किनाऱ्यावर तस्‍करीचे सोने लँड होणार याची मला कुणीतरी टीप दिली. मला त्‍यावेळी कार चालवायला कळत नव्‍हती.

त्‍यामुळे माझी बुलेट माेटारसायकल घेऊन मी फात्राडेच्‍या दिशेने निघालो. माझ्‍याकडे फारसा वेळही नव्‍हता. त्‍यामुळे मी माझ्‍याबरोबर अन्‍य कुणाला घेऊन जाऊ शकत नव्‍हतो. मी जेव्‍हा फात्राडे समुद्र किनाऱ्यावर पोचलो, तेव्‍हा आल्‍वेनार्झ कॉन्‍टेसात बसून जायच्‍या तयारीत होता.

त्‍यावेळी मी त्‍याच्‍या गाडीसमोर माझी बुलेट आडवी घालून त्‍याला अडविण्‍याचा प्रयत्‍न केला, पण त्‍याने तिथे न थांबता माझ्‍या बुलेटला गाडीचा धक्‍का देऊन पळून जाण्‍याचा प्रयत्‍न केला. मात्र, मी त्‍याला कुठल्‍याही प्रकारे राेखणारच असे ठरविले हाेते. त्‍यामुळे मी पटदिशी उठून त्‍याच्‍या गाडीवर झेप घेतली. एका हाताने गाडीचा दरवाजा उघडण्‍याचा प्रयत्‍न करत असतानाच एका हाताने आल्‍वेनार्झची मान घट्ट पकडून मी त्‍याला रोखण्‍याचा प्रयत्‍न करत होतो.’

त्‍यावेळी या घटनेचे काही प्रत्‍यक्ष साक्षीदार होते. त्‍यांनी त्‍यावेळी जी माहिती दिली त्‍यानुसार कॉस्‍तांवच्‍या हातात धारदार नकल डस्‍टर होता. तोच आल्‍वेर्नाझच्‍या गळ्याला लागल्‍याने त्‍याचा गळा चिरुन रक्‍तस्‍त्राव सुरू झाला. त्‍यामुळे तो गतप्राणही झाला. त्‍यावेळी घटनास्‍थळाकडे लोकांची गर्दी होत असल्‍याचे पाहिल्‍यावर कॉस्‍तांवने गाडीतून बाहेर येऊन गाडीची डिकी उघडली त्‍यावेळी कॉस्‍तांवने जो दावा केला होता त्‍याप्रमाणे त्‍या डिकीत ठेवलेल्‍या बॅटरीमध्‍ये तस्‍करीचे सोने होते. कॉस्‍तांवने त्‍यातील एक चीप काढून लोकांना दाखवली.

हे सर्व नाट्य घडत असताना, कॉस्‍तांवची स्‍थिती नेमकी काय होती? यासंदर्भात विचारले असता कॉस्‍तांव म्‍हणाले, ‘त्‍यावेळी वार्का परिसरात आलेमाव या नावाची एक प्रकारची दहशत हाेती. मी जमलेल्‍या लाेकांना त्‍यावेळी माझ्‍या मदतीसाठी बोलावले. मात्र, मदत करण्‍यासाठी एकटाही पुढे आला नाही. मी तिथे एकटाच होतो. आणि मला संरक्षण देण्‍यासाठी कुणीच नव्‍हते. त्‍यामुळे मी डिकी बंद करून आणि कॉन्‍टेसा गाडीच्‍या चाकातील हवा काढून तिथून निघून जाण्‍याचाच निर्णय घेतला.

तोपर्यंत या घटनेची माहिती कोलवा पोलिसांना मिळाली होती. निवृत्त पाेलिस अधीक्षक मोहन नाईक हे त्‍यावेळी काेलवा पाेलिस स्‍थानकावर निरीक्षक होते. नाईक यांच्‍याशी संपर्क साधला असता ते म्‍हणाले, ‘मी आणि माझे सहकारी ज्‍यावेळी घटनास्‍थळावर पोचलो त्‍यावेळी कॉन्‍टेसामध्‍ये कुणीच नव्‍हते.

त्‍यापूर्वीच आल्‍वेर्नाझ यांना उपचारासाठी इस्‍पितळात नेण्‍यात आले होते. गाडीच्‍या समोर कॉस्‍तांवची बुलेट खाली पडलेली हाेती. दुपारी १.३० वाजण्‍याच्‍या सुमारास कस्‍टमचे अन्‍य अधिकारी घटनास्‍थळी पोचले. त्‍यांच्‍या उपस्‍थितीत कॉन्‍टेसाची डिकी उघडली असता, त्‍यात फक्‍त काही फुटबॉल आणखी काही खेळाचे सामान एवढेच होते’ असे ते म्‍हणाले.

Nawazuddin Siddiqui's film Costao

तस्‍करीचे सोने गेेले कुठे?

कस्‍टमच्‍या दाव्‍याप्रमाणे त्‍यावेळी तब्‍बल ८ कोटींचे साेने त्‍या कॉन्‍टेसा गाडीच्‍या डिकीत होते. कॉस्‍तांवने गाडीची डिकी लॉक करून ताे तिथून निघून गेल्‍यानंतर काहीजणांनी येऊन त्‍या डिकीचे लॉक तोडून ती उघडली आणि एका स्‍कुटरवरून ते तस्‍करीचे सोने खारेबांद येथे पाेहाेचते केले. मात्र, या प्रकरणात चर्चिल आलेमाव आणि इतरांवर जो खटला चालला त्‍या खटल्‍यात ही गोष्‍ट सिद्ध होऊ शकली नाही. या प्रकरणातील त्‍यावेळचे तपास अधिकारी असलेले मोहन नाईक यांना विचारले असता ते म्‍हणाले, खारेबांद येथे एका ठिकाणी हे सोने नेऊन ठेवल्‍याची माहिती आम्‍हाला दिली होती. मी स्‍वत: तिथे जाऊन चाैकशी केली. मात्र, तसे काही झाल्‍याचे आम्‍हाला आढळून आले नाही, असे त्‍यांनी सांगितले.

अर्धा दिवस समुद्रात पाेहत काढला

कॉस्‍तांव सिनेमात स्‍मगलरच्‍या भावाकडे झालेल्‍या झटापटीत कस्‍टम अधिकारीही जबर जखमी झाल्‍याचे दाखविण्‍यात आले आहे. मात्र, प्रत्‍यक्षात त्‍या दिवशी कॉस्‍तांवला फारशा जखमा झाल्‍या नव्‍हत्‍या. सिनेमात स्‍मगलरचे गुंड कस्‍टम अधिकाऱ्याच्‍या मागे लागतात आणि तो जंगलात पळून जातो असे दाखविण्‍यात आले आहे, पण कॉस्‍तांव फर्नाडिस यांना विचारले असता, त्‍या दिवशी संपूर्ण संध्‍याकाळ मी समुद्राच्‍या पाण्‍यात पोहत काढली आणि रात्र झाल्‍यावरच किनाऱ्यावर आलो. त्‍यानंतर दुसऱ्या दिवशी मी पणजीत जाऊन पोलिसांना शरण आलो, असे त्‍यांनी सांगितले. अर्धा दिवस तुम्‍ही समुद्रात का पोहत हाेता? असे विचारल्‍यावर कॉस्‍तांव हसत म्‍हणाले, माझा जन्‍मच पाळोळेच्‍या समुद्र किनाऱ्याजवळचा. समुद्रात दिवसेंदिवस डुंबत रहाणे हे माझ्‍यासाठी नेहमीचे होते.

शेवटी सर्वोच्‍च न्‍यायालयाकडून दिलासा

आल्‍वेर्नाझ आलेमाव यांचा खून केला या आरोपाखाली १९ मे रोजीच कॉस्‍तांवच्‍या विरोधात कोलवा पोलिसात गुन्‍हा नोंद झाला होता. त्‍यानंतर हे प्रकरण सुरुवातीला क्राईम ब्रँचकडे व त्‍यानंतर सीबीआयकडे तपासासाठी देण्‍यात आले. सीबीआयने मडगाव न्‍यायालयात कॉस्‍तांवच्‍या विरोधात खुनाच्‍या आरोपाखाली आरोपपत्रही दाखल केले होते. मात्र, आपल्‍या हातून जे कृत्‍य झाले ते आपण अधिकृतपणे सेवा बजावतानाचे होते आणि कस्‍टम कायद्याप्रमाणे, कुणीही जर तस्‍करी करत असेल तर त्‍याला रोखण्‍याचे सर्व अधिकार कस्‍टम अधिकाऱ्यांना असतात, असा दावा कॉस्‍तांवच्‍यावतीने करण्‍यात आला होता. मात्र, सत्र न्‍यायालयाने तो अमान्‍य करत त्‍याच्‍या विराेधात आरोप दाखल करण्‍यात आले. सर्वोच्‍च न्‍यायालयाने या प्रकरणात कॉस्‍तांवला दिलासा देताना कॉस्‍तांवने जी कुठली कृती केली ती एका धाडसी कस्‍टम अधिकाऱ्याला शोभेशी होती असे नमूद करत त्‍याला ‘क्‍लीन चीट’ दिली. कॉस्‍तांव चित्रपटात हाही सर्व घटनाक्रम नाट्यपूर्णरित्‍या सादर करण्‍यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rahul Keni: गोव्याचे राहुल केणी बनले BCCIचे सामनाधिकारी! पंच परीक्षेत मिळवला सहावा क्रमांक

Goa Crime: रिचार्ज पॅक साठी फोन केला, 44 हजार रुपये केले लंपास; गोकुळवाडी-साखळीतील महिलेला गंडा

Comunidade: 30 कोमुनिदादींची निवडणूक घ्या! सदस्यांची मागणी; गणपूर्तीअभावी रखडल्या प्रक्रिया

Marcel: माशेल बाजारात पोदेरांमुळे वाहतूक कोंडी! बेशिस्त प्रकार; पंचायतीच्या सूचनांकडे दुर्लक्ष

Arambol Bamanbhati: बामणभाटीत शेतजमीन पाण्याखाली! प्रशासनाचे दुर्लक्ष; उपाययोजना न आखल्याने शेतकरी नाराज

SCROLL FOR NEXT