पर्यावरण संरक्षण, जैवविविधता संवर्धन आणि निसर्गाशी नाते अधिक दृढ करणे, ही आज प्रत्येकाची जबाबदारी बनली आहे. विवेकानंद पर्यावरण जागृती फौज केरी- सत्तरी तीच जबाबदारी आपल्या कार्यकर्त्यांना साथीला घेऊन गेली काही वर्षे पार पाडत आहे. ते आयोजित करत असलेले गोव्यातील पहिले ‘निसर्ग संमेलन २०२६’ हा त्याच जबाबदारीचा एक भाग आहे.
हे एकदिवसीय भव्य पर्यावरणीय संमेलन १७ जानेवारी रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळेत तातो कुळागर, माडेल, चोडण येथे होणार आहे. संमेलनाची सुरुवात सकाळी गोवा बर्ड कन्झर्वेशन नेटवर्क (GBCN) या संस्थेच्या मार्गदर्शनाखाली आयोजित होणाऱ्या पक्षी निरीक्षण कार्यक्रमाने होईल.
डॉ. सलीम अली पक्षी अभयारण्यातील पक्ष्यांचे वैभव जाणून घेण्याची ही सुवर्णसंधी असेल. त्यानंतर उदघाटन समारंभात सरकारी प्राथमिक शाळा, पुनर्वसन-साळ, डिचोली येथील विद्यार्थ्यांच्या पर्यावरण विषयावरील नृत्य सादरीकरणात बालमनातून उमलणाऱ्या निसर्गप्रेमाचे दर्शन घडेल.
गेल्या तीन दशकांहून अधिक काळ गोव्यातील नद्या, जंगल, वन्यजीव व परिसंस्थांच्या संरक्षणासाठी कार्य करणारे ज्येष्ठ पर्यावरणप्रेमी राजेंद्र केरकर हे या संमेलनाचे अध्यक्ष असून गोवा राज्य जैवविविधता मंडळाचे सदस्य सचिव डॉ. प्रदीप सरमोकादम मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. पर्यावरण प्रशासन, जैवविविधता व्यवस्थापन व शाश्वत विकास या क्षेत्रांत सरमोकादम यांनी मोलाचे योगदान दिले आहे.
महोत्सवाच्या पहिल्या सत्रात ‘वन पुनरुज्जीवन आणि हॉर्नबिल संवर्धन’वरील डॉ. रोहित नानिवडेकर यांचे अनुभव, ‘सह्याद्रीतील व्याघ्र दालन व मानव-वन्यजीव सहअस्तित्व’ यावरील गिरीश पंजाबी यांचा प्रकाशझोत, ‘जैवविविधता समजून घेणे’ या विषयावरील सत्रात चंद्रकांत शिंदे (म्हादई नदी),
रमेश झर्मेकर (गोव्यातील पक्षी), गजानन शेट्ये (सरपटणारे व उभयचर प्राणी), पराग रांगणेकर आणि ॲड. सूरज मळीक (कीटक) तसेच विशाल सडेकर आणि सूर्यकांत गावकर (गोव्यातील वनस्पती) या तज्ज्ञांच्या विविध विषयांवरील सखोल माहितीमधून निसर्गाच्या समृद्धतेचे एक अंग जाणून घेता येईल.
दुपारच्या सत्रात ‘कोकणी रानमाणूस’ म्हणून परिचित असलेले प्रसाद गावडे हे ‘शाश्वत जीवनशैली’वर मार्गदर्शन करणार असून, त्याचवेळी चित्रकार अक्षय सावंत हे चित्रांच्या माध्यमातून शाश्वत जीवनशैली चित्रबद्ध करणार आहेत. नारायण गावस यांच्या मधुर आवाजात पर्यावरण गीतांचे सादरीकरण या सत्रात होईल. पक्ष्यांशी संवाद साधणारे पंकज लाड यांचे पक्ष्यांच्या संवादावर आधारित सत्र सायंकाळी होणार असून, महोत्सवातील हे सत्र विशेष आकर्षण ठरणार आहे.
हे संमेलन विवेकानंद पर्यावरण जागृती फौजेचे संस्थापक व ज्येष्ठ पर्यावरणप्रेमी राजेंद्र केरकर यांच्या मातोश्री कै. सत्यवती पांडुरंग केरकर यांना समर्पित केले आहे. विद्यार्थी, शिक्षक, संशोधक, पर्यावरण कार्यकर्ते व निसर्गप्रेमींसाठी हे संमेलन निश्चितच प्रेरणादायी विचारमंच ठरेल, यात शंका नाही. या संमेलनासाठी प्रतिनिधी म्हणून नोंदणी करण्यासाठी https://q.me-qr.com/1/VEAB-Nature-Conclave या लिंकला भेट द्या.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.