पणजी: गोव्याला लागून असलेल्या कारवारमधील ‘आयएनएस कदंब’ या आशियातील सर्वांत मोठ्या नौदल तळाची संवेदनशील माहिती विदेशी शक्तींपर्यंत पोचविल्याप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) तिघांना आज अटक केली. त्यात एकाला गोव्यातून ताब्यात घेण्यात आले आहे.
पाकिस्तानसह अन्य विदेशी यंत्रणांपर्यंत गोपनीय माहिती पोचवत असल्याचा आरोप या तिघांवर ठेवण्यात आला आहे. त्यांना अधिक तपासासाठी ‘एनआयए’ने मुंबई येथे नेले आहे. या साऱ्या प्रकाराची सुरवात हैदराबाद येथे गेल्या वर्षी ‘एनआयए’ने टाकलेल्या छाप्यातून झाली. तेथे दीपक व इतरांना संवेदनशील माहिती विदेशात पाठवण्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली होती.
त्यावेळी त्याच्याकडून पाकिस्तानला कारवारमधील ‘आयएनएस कदंब’मधील (INS Kadamba Karwar) युद्धनौका व इतर सुविधांची माहिती पुरविली गेल्याचे तपासादरम्यान आढळून आले होते. दीपक याला ही माहिती कुठून मिळते, याचा तपास ‘एनआयए’ने सुरू ठेवला होता. पैशाच्या मोबदल्यात हा सारा व्यवहार सुरू असल्याचेही ‘एनआयए’च्या तपासातून पुढे आले होते. त्यामुळे त्याचे धागेदोरे शोधणे सुरूच ठेवले होते.
विक्रांत ही विमानवाहू नौका कोचीन शिपयार्डमध्ये असताना या युद्धनौकेवरील पाच हार्ड डिस्क, पाच रॅम, आणखी काही मायक्रो प्रोसेसर्सची चोरी झाली होती. त्यात सर्व संवेदनशील माहिती साठवण्यात आली होती. त्याचा तपास ‘एनआयए’ करत आहे.
त्यांनी आज कोचीन शिपयार्डवर कारवारमध्ये ही कारवाई सुरू असतानाच छापा टाकला आणि एका कामगाराला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. यामुळे कारवार आणि कोचीन प्रकरणाचा परस्पर संबंध असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
धक्कादायक बाब म्हणजे, आयएनएस कदंब तळावर काम करणाऱ्यांकडूनच तळाची, युद्धनौकांची छायाचित्रे मिळतात तसेच संवेदनशील माहिती तेच पुरवत असल्याची कबुली दीपक याने दिल्यानंतर ‘एनआयए’ने कारवारमध्ये कारवाई करण्याचे ठरविले व आज छापा टाकला.
उपअधीक्षक, तीन निरीक्षकांचा समावेश असलेल्या पथकाने स्थानिक पातळीवर कोणालाही काही कल्पना न देता काही तासांतच ही कारवाई केली. ताब्यात घेतलेल्या व्यक्तींची माहिती त्यांनी जाताना कारवार पोलिसांना दिली. ते आता त्यांच्या नातेवाईकांना ‘एनआयए’च्या कारवाईबाबत कळविणार आहेत.
संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ यांनी ‘आयएनएस कदंब’ तळाला भेट दिल्यास आठवडा झाल्यानंतर हे हेरगिरीचे प्रकरण उजेडात आले आहे. २० व २१ ऑगस्ट रोजी सेठ यांनी या तळाची पाहणी केली होती. त्यांनी अमादळ्ळी येथील नौदल निवास वसाहतीला भेट दिली होती. आता या तळावर काम करणारे तिघे संशयित ‘एनआयए’च्या जाळ्यात सापडल्यामुळे संरक्षण राज्यमंत्र्यांच्या भेटीच्या वेळची गोपनीय माहिती बाह्य शक्तींच्या हाती लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
‘एनआयए’ने कदंब तळावरील युद्धनौका दुरुस्ती विभागात काम करणारे सुनील नाईक, वेतान तांडेल आणि अक्षय नाईक यांना अटक केली. अक्षय हा वास्को येथील असल्याची माहिती आहे. ‘एनआयए’च्या पथकाने सुनीलला तोडूर येथून ताब्यात घेतले, तर तांडेलला मुदगा येथून पकडले. हलावल्ली येथील अक्षय हा तपास यंत्रणेला सापडला नाही. तो वास्को येथे घरी गेल्याची माहिती मिळाल्याने त्याला गोव्यात येऊन ताब्यात घेतले.
‘आयएनएस कदंब’ हा तळ ‘सीबर्ड’ प्रकल्पाचा भाग आहे. योगायोगाने आज दिल्लीत या प्रकल्पाच्या महासंचालक पदाची सूत्रे व्हाईस ॲडमिरल राजेश धनकड स्वीकारत असतानाच कारवारमध्ये ‘आयएनएस कदंब’ येथे हेरगिरीप्रकरणी ‘एनआयए’ची कारवाई सुरू होती. नौदलाचा तळ अत्यंत महत्त्वाचा आहे.
त्याचमुळे आयएनएस दिल्ली, आयएनएस घडियालसह विमानवाहू युद्धनौका विक्रमादित्यवर कार्यकारी अधिकारी म्हणून काम केलेले धनकड यांच्याकडे सीबर्डची सूत्रे सोपविली आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.