अनिल पाटील
आशियाई क्रीडा स्पर्धेत दुखापतीमुळे चमक दाखवू न शकलेल्या मॉडर्न पेंटॅथलॉनपटू मयांक चाफेकरने आगामी ऑलिम्पिक आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत पदक जिंकण्याचा निर्धार व्यक्त केला.
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील मॉडर्न पेंटॅथलॉनमध्ये सहा सुवर्ण आणि एक कांस्य अशी लक्षवेधी कामगिरी करणा-या मयांकचा महाराष्ट्राच्या पदकभरारीत महत्त्वाचा वाटा आहे. नुकत्याच चीनमध्ये झालेल्या एशियाडमध्ये त्याने भारताचे प्रतिनिधित्व केले होते.
याबाबत मयांक म्हणाला, ‘‘यंदाच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत मॉडर्न पेंटॅथलॉनमध्ये भारताकडून खेळणारा मी पहिला क्रीडापटू ठरलो. या स्पर्धेत पदकाबाबत मला मोठी आशा होती. कारण आशियातल्या अव्वल पाच मॉडर्न पेंटॅथलॉनपटूंमध्ये माझी गणना होते. परंतु गंभीर दुखापतीमुळे भारताच्या कामगिरीवर परिणाम झाला आणि माझे पदकाचे स्वप्न अधुरे राहिले. हे जर सकारात्मक झाले असते तर ऑलिम्पिक पात्रताही साध्य झाली असती.’’
‘‘२०२४चे पॅरिस आणि २०२८चे लॉस एंजेलिस ऑलिम्पिक तसेच २०२६ आणि २०३०च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी होऊन पदक जिंकायचे स्वप्न मी जोपासले आहे,’’ असे मयांकने आत्मविश्वासाने सांगितले.
यशाचे श्रेय कुणाला देशील, याबाबत मयांक म्हणाला, ‘‘माझ्या यशामागे मोठे पथक पाठीशी आहे. यात माझे आई-वडील आहेत. आमची संघटना, मार्गदर्शक विठ्ठल शिरगावकर, प्रशिक्षक सुनील पूर्णपात्रे, संघाचा प्रेरक विराज परदेशी यांचे महत्त्वाचे योगदान आहे. याशिवाय सौरभ पाटील, शिवतेज पवार, शहाजी सरगर, विजय फुलमाळी, मुग्धा वव्हाळ, अहिल्या चव्हाण या सर्वांची कामगिरी मॉडर्न पेंटॅथलॉनमधील महाराष्ट्राच्या यशात मोलाची ठरली. माझ्या तीन पदकांमध्येही त्यांचे साहाय्य उपयुक्त ठरले.’’
मयांक ठाणे जिल्ह्याातील कळव्याचा रहिवाशी. समाजशास्त्र विषयातून कला शाखेच्या पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर आता लंडन विद्याापीठाकडून क्रीडा व्यवस्थापनात पुढील शिक्षण घेणार आहे. मॉडर्न पेंटॅथलॉन कधीपासून खेळतोयस? या प्रश्नाला उत्तर देताना मयांक म्हणाला, ‘‘मी दीर्घ पल्ल्याचे जलतरण करायचो.
२०१५मध्ये माझे जलतरणाचे प्रशिक्षक कैलाश आखाडे यांनी मॉडर्न पेंटॅथलॉनकडे वळवले. त्यांचा तो सल्ला आयुष्यात महत्त्वाचा ठरला. भारतात हा तसा नवा क्रीडा प्रकार होता. बायथले, ट्रायथले यात सहभागी होऊ लागलो. मग तलवारबाजी, घोडेस्वारी, नेमबाजी, आदी खेळसुद्धा उत्तमपणे शिकलो. २०१८पासून माझी मॉडर्न पेंटॅथलॉनमधील वाटचाल सुरू झाली.’’
-मॉडर्न पेंटॅथलॉन संघाचे प्रशिक्षक सुनील पूर्णपात्रे यांची प्रतिक्रिया
महाराष्ट्राच्या संघाचे नाशिकमध्ये शास्त्रशुद्ध सराव शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरातील सरावानुसार आम्ही योग्य रणनीती आखली. महाराष्ट्राच्या यशात आम्ही सिंहाचा वाटा उचलू, हे लक्ष्य आम्ही आधीच निश्चित केले होते. त्यानुसार दिमाखदार कामगिरी करीत मॉडर्न पेंटॅथलॉन क्रीडा प्रकारातील महाराष्ट्राचे वर्चस्व दाखवून दिले आहे, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्राच्या मॉडर्न पेंटॅथलॉन संघाचे प्रशिक्षक सुनील पूर्णपात्रे यांनी व्यक्त केली.
महाराष्ट्राने मॉडर्न पेंटॅथलॉन क्रीडा प्रकारात १५ सुवर्ण, ५ रौप्य, ४ कांस्य अशी एकूण २४ पदके कमावली. मेहनतीने पदक जिंकणारे क्रीडापटू, माझे साहाय्यक प्रशिक्षक, तांत्रिक साहाय्यक, शासकीय अधिकारी या सर्वांना यशाचे श्रेय जाते, असे पूर्णपात्रे यांनी सांगितले.
‘‘३७व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत मॉडर्न पेंटॅथलॉनचा प्रथमच समावेश करण्यात आल्याबद्दल केंद्रीय क्रीडा मंत्रालय, भारतीय ऑलिम्पिक संघटना आणि संयोजकांचा मी आभारी आहे. महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार, सरचिटणीस नामदेव शिरगावकर, क्रीडा अधिकारी गोविंद गावडे यांची भूमिका महाराष्ट्राच्या यशात महत्त्वाची आहे,’’ असे पूर्णपात्र यावेळी म्हणाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.