Narve Ghat Arati controversy : नार्वे येथील पंचगंगेच्या तीरावर होणाऱ्या नियोजित ‘घाट आरती’ प्रकल्पाला दिवाडीसह परिसरातील काही व्यक्तीसमूहांनी विरोध केला होता. आमदार राजेश फळदेसाई यांनी प्रकल्प होणार नाही, असे सुतोवाच केले असतानाच मंगळवारी प्रकल्प समर्थनार्थ नार्वे गाव एकवटला. लोकांनी प्रकल्पस्थळी शक्तीप्रदर्शन केले.
गावाच्या वैभवात भर घालणारा ‘घाट आरती’ प्रकल्प आम्हाला हवाच, अशी मागणी लोकांनी केली. ''घाट आरती'' प्रकल्पाला गावाबाहेरील लोकांकडून जर विरोध होत असेल, तर तो मुळीच खपवून घेणार नाही, असा सज्जड इशाराही नार्वेवासियांनी दिला. आमच्या स्मशानभूमीची जागा प्रकल्पासाठी सोडायला आम्ही तयार आहोत, असे नार्वेतील जनतेने स्पष्ट केले.
मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी घाट आरती प्रकल्प रद्द केला आहे, असे कुंभारजुवेचे आमदार राजेश फळदेसाई यांनी जे वक्तव्य केले आहे, ते पूर्णतः दिशाभूल करणारे आहे. असे स्पष्ट करुन नार्वेवासियांनी या वक्तव्याचा निषेध केला. पंचगंगा तीरावरील स्मशानभूमीला हात लावू देणार नाही. प्रसंगी ''घाट आरती'' प्रकल्पाच्या विरोधात रस्त्यावर उतरणार, असा इशारा पैलतिरी असलेल्या दिवाडी, आखाडा, वाशीसह अन्य भागातील लोकांनी दिला असतानाच, नार्वेतील लोक एकवटल्याने हा विषय आता तापण्याची शक्यता आहे.
श्री सप्तकोटीश्वर मंदिरामुळे नार्वेची जगभर ख्याती आहे. गावातील पंचगंगेच्या तीरावर भरणारी ‘अष्टमी’ प्रसिद्ध आहे. पंचगंगा तीरावर ''घाट आरती'' प्रकल्प झाल्यानंतर नार्वे गावचे वैभव आणि सौंदर्य फुलणार आहे. पर्यटनदृष्ट्या विकास होतानाच आर्थिक विकासाची दारे खुली होणार आहे. त्यामुळे आम्हाला हा प्रकल्प हवा आहे, असे सरपंच तुकाराम गावडे यांच्यासह संदीप पार्सेकर आणि संदेश पार्सेकर यांनी सांगितले.
पंचगंगेच्या तीरावर असलेली स्मशानभूमी आमचीच आहे. या स्मशानभूमीशी अन्य कोणत्याही गावाचा संबंध जोडलेला नाही. घाट आरती प्रकल्पस्थळी अनिष्ट कृत्ये नको आहेत. त्यामुळे आम्ही स्मशानभूमीचा त्याग करायला तयार आहोत, असे नार्वेतील ज्येष्ठ नागरिक नामदेव मालवणकर आणि दामोदर मोरजकर यांनी स्पष्ट केले.
नार्वे येथील नियोजित ‘घाट आरती’ प्रकल्पस्थळी असलेली स्मशानभूमी आमची असून, तिला शेकडो वर्षांचा इतिहास आहे, असा दावा करीत आखाडा, दिवाडी, वाशीसह परिसरातील लोकांनी गेल्या रविवारी (ता. २२) नार्वे येथे पंचगंगेच्या तीरावरील स्मशानभूमी वाचवा, अशी मागणी केली होती. या इशाऱ्यानंतर नार्वे गावात खळबळ माजली आहे.
मंगळवारी सायंकाळी नार्वे गावातील महिला आणि ज्येष्ठ नागरिक मिळून दोनशेहून अधिक लोक नार्वे येथील पंचगंगेच्या तीरावर एकत्रित झाले. नार्वेचे सरपंच तुकाराम गावडे, माजी सरपंच संदेश पार्सेकर,भाजप मंडळाचे अध्यक्ष संदीप पार्सेकर, नामदेव मालवणकर, दामोदर मोरजकर आदींसह गावच्या प्रतिष्ठित लोकांचा समावेश होता. गावच्या विकासासाठी आम्हाला ‘घाट आरती’ प्रकल्प हवाच, अशी मागणीही या लोकांनी लावून धरली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.