Marathi Literature : सर्जनशील कलाकारांच्या भोवती अनेक बंधनांचे ओझे असल्यामुळे साहित्याचे नुकसान होत आहे. एखादा लेखक वादाचा मुद्दा मांडत असेल तर त्याला सुडातून, धमक्यातून उत्तर देणे अत्यंत वाईट गोष्ट आहे. मराठी साहित्याचे नुकसान अहंकारी समीक्षकांमुळे झालेय. साहित्य व्यवहाराची परिस्थिती बिकट झाली आहे. याकडे निर्देश करून तपश्चर्या, परिश्रम पुनर्लेखन आणि परीक्षण या लेखकासाठी महत्त्वाच्या गोष्टी आहेत. मुळात लेखकांने चांगला वाचक असणे व अधाशाप्रमाणे साहित्य वाचणे गरजेचे असते, असे मत प्रसिद्ध साहित्यिक डॉ. रवींद्र शोभणे यांनी व्यक्त केले.
मुक्त सृजन साहित्य पत्रिका औरंगाबाद, इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझा (आयएमबी), माधव राघव प्रकाशन व मनसा क्रिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयएमबी सभागृहात आयोजित पहिल्या मुक्त साहित्य सृजन मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून माजी कायदामंत्री ॲड. रमाकांत खलप, समीक्षक डॉ. यशपाल भिंगे, स्वागताध्यक्ष डॉ. मुरहरी केळे, कार्यवाह डॉ. महेश खरात, आयएमबीचे अध्यक्ष दशरथ परब, संयोजक डॉ. रामकिशन दहिफळे, डॉ. संतोष देशमुख, प्रिया धारूरकर, चित्रा क्षीरसागर, प्रिया कालिका बापट, सुनीता दशरथ परब उपस्थित होते.
ॲड. रमाकांत खलप यांनी भाषांवर प्रांतरचनेमुळे सांस्कृतिकदृष्ट्या एकत्र असलेली मंडळी विभागली गेली याकडे लक्ष वेधून एका राज्यात एकापेक्षा जास्त राजभाषा असू शकतात ही कायद्यातील तरतूद आपण विसरलो आहोत आणि म्हणून मराठी भाषेवर अन्याय होत आहे असे सांगितले. ते मराठी भाषेची थोरवी ज्ञानेश्वरांनी गायली तशी फादर स्टीफननी गोव्यात गायली आहे. गोव्यातील सर्व मराठी साहित्य संस्थांनी एकत्र येऊन गोव्यात मराठी साहित्य संमेलन भरवावे.
दशरथ परब यांनीही मनोगत व्यक्त केले. महेश खरात यांनी प्रास्ताविक केले. ग्रंथदिंडीने संमेलनाला सुरूवात झाली. प्रकाश जडे यांनी ग्रंथदिंडीचे उद्घाटन केले.
साहित्यात मन बदलण्याची ताकद : श्रीपाद नाईक
समाजमन घडविण्याचे, समाजाला सुसंस्कारीत करण्याचे काम अशा साहित्य संमेलनातून होत असते. साहित्य आपल्याला सकारात्मक दृष्टिकोन देण्यासाठी आधारभूत ठरते. अध्यात्म साहित्यात मन बदलण्याची ताकद आहे. वाचनाद्वारे चांगले विचार मनावर बिंबवले जातात. म्हणून भरपूर वाचन केले पाहिजे. चांगल्या विचाराने समाज सुदृढ झाला तर अनेक आव्हानांना सामोरे जायला आपण सक्षम बनू, असे केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी सांगितले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.