Khari Kujbuj Political Satire Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: खरी कुजबुज; राजकारणात खळबळ होणार?

Khari Kujbuj Political Satire: उपमुख्‍यमंत्री, मंत्री, आमदार म्‍हणून अनेक वर्षे सत्ता गाजवलेल्‍या बाबू आजगावकरांना भाजपने गत विधानसभा निवडणुकीत पेडणेतून उमेदवारी नाकारत मडगावातून उभे केले.

Sameer Panditrao

राजकारणात खळबळ होणार?

मोपा विमानतळावरील टॅक्‍सींच्‍या पार्किंग शुल्‍कात केलेल्‍या वाढीविरोधात टॅक्‍सी मालक संघटना सोमवारी मोपात एकवटल्‍या. त्‍यांना पाठिंबा देण्‍यासाठी आमदार विजय सरदेसाई आणि रिव्‍हॉल्‍यूशनरी गोवन्‍सचे अध्‍यक्ष मनोज परब हे दोन्‍ही नेते मोपात पोहोचले. विजय आणि मनोज या दोघांनी ज्‍या पद्धतीने संघटितपणे टॅक्‍सी मालकांची बाजू घेतली, या प्रश्‍‍नावरून मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेतली. याआधी गत पावसाळी अधिवेशनात सभागृहात बोलताना विजय यांनी आरजीच्‍या ‘पोगो’ विधेयकालाही पाठिंबा दिला होता. या सर्व घडामोडी पाहता, राज्‍याच्‍या राजकारणात आणखी खळबळ होणार का? असा प्रश्‍‍न अनेकांना पडला आहे. ∙∙∙

बाबूंचे दु:ख कळेल?

उपमुख्‍यमंत्री, मंत्री, आमदार म्‍हणून अनेक वर्षे सत्ता गाजवलेल्‍या बाबू आजगावकरांना भाजपने गत विधानसभा निवडणुकीत पेडणेतून उमेदवारी नाकारत मडगावातून उभे केले. मनात नसतानाही पक्षाचा आदेश मान्‍य करीत आजगावकर मडगावातून दिगंबर कामत यांच्‍याविरोधात लढण्‍यास तयार झाले. अपेक्षेनुसार त्‍यांचा मडगावातून पराभव झाला. त्‍यानंतर मात्र जिंकू शकत असलेल्‍या जागेवरून हटवण्‍यात आल्‍याचे दु:ख बाबू आपल्‍या बोलण्‍यातून वारंवार दाखवून देत आहेत. २०२७ ची निवडणूक पेडण्‍यातूनच लढवण्‍याचा चंग बांधून बाबू स्‍थानिकांच्‍या प्रश्‍‍नावरून आक्रमक होत आहेत. पण, भाजपला त्‍यांचे दु:ख कधीच कळणार नाही, अशी चर्चा त्‍यांच्‍या समर्थकांत सुरू आहे. ∙∙∙

मनोज परबच्या शपथेची विश्वसनीयता काय?

मनोज परब यांनी अनेकदा गोवा फॉरवर्ड पक्ष आणि त्यांच्या नेत्यांशी हातमिळवणी करण्यास नकार दिल्याचे आपण पाहिले आहे. त्यांनी वारंवार असा आरोप केला आहे, की २०१७ च्या निवडणुकांनंतर विजय सरदेसाई यांनी गोवेकऱ्यांची फसवणूक केली. रिव्होल्युशनरी गोवन्स पक्षाच्या सुरुवातीला बाणावली येथे झालेल्या भव्य सभेत मनोज परब यांनी स्पष्टपणे जाहीर केले होते, की ते कोणत्याही पक्षाशी, त्यात गोवा फॉरवर्डचाही समावेश आहे, युती करणार नाहीत. इतकेच नव्हे, तर त्यांनी हजारो गोवकरांसमोर आपल्या आईची शपथ घेऊन ही प्रतिज्ञा केली होती. पत्रकारांनी जेव्हा मनोज परब यांना विचारले, की ते गोवा फॉरवर्डसोबत जाण्यास तयार आहात का? तेव्हा त्यांनी उत्तर दिले की युती करण्यापूर्वी विचारसरणीवर चर्चा होणे आवश्यक आहे. यामुळे दोन महत्त्वाचे प्रश्न निर्माण होतात, जर युती झालीच, तर आरजीपी नेते गोवा फॉरवर्ड आणि त्यांच्या नेतृत्वाला पाठिंबा देतील का? आणि मनोज परब यांनी हजारो लोकांसमोर केलेल्या शपथेची विश्वसनीयता काय राहील? ∙∙∙

नव्या युतीची नांदी?

मोपा येथील टॅक्सीवाल्यांनी विमानतळ व्यवस्थापनाविरोधात आज आंदोलन केले. विमानतळावर पार्किंग शुल्कात केलेल्या भरमसाठ वाढीला टॅक्सीचालकांनी विरोध केला आहे. विमानतळासाठी जमिनी देणाऱ्या पेडणेतील तालुक्यातील स्थानिक टॅक्सीचालकांची मागणी रास्त आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई आणि रिव्होल्युशनरी गोवन्सचे मनोज परब हे उपस्थित होते, त्याशिवाय त्यांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची एकत्रित भेटही घेतली. यापूर्वी एमआरएफमधील परराज्यात होणाऱ्या कामगार भरतीविरोधात सरदेसाई आणि परब यांनी आवाज उठवला होता. परब यांची सरदेसाई यांच्याबरोबरची जवळीक ही आरजीला ‘इंडिया‘आघाडीत नेणारी ठरणार की नव्या राजकीय समीकरणानुसार तिसरी आघाडी तयार होणार हे लवकरच कळेल. ∙∙∙

नक्की कोण कोणाला घाबरले!

‘जीएसटी’कर प्रणालीत बदल केल्यानंतर, याची जागृती करण्यासाठी भाजपाकडून राज्यातील मार्केट परिसरातील व्यापारी व दुकानदारांमध्ये जागृती सुरू आहे. यातच पिर्ण गावात (बार्देश) जागृतीसाठी गेलेले मंत्री नीळकंठ हळर्णकर व आरजीपीमध्ये राजकीय कलगीतुरा रंगला होता. आरजीपी व भाजपा कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी देत, एकमेकांना डिवचण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे अस्नोडा गावात देखील भाजपा-आरजीपी हे पुन्हा आमनेसामने येतील, अशी राजकीय स्थिती निर्माण झालेली. रविवारी मंत्री हळर्णकर हे भाजपा कार्यकर्त्यांसह मोठ्या संख्येने मार्केट परिसरात फिरले. यावेळी मोठा पोलिस फौजफाटा होता. परंतु आरजीवाले फिरकलेच नाहीत. त्यामुळे नक्की कोण कोणाला घाबरले? अशी चर्चा नंतर राजकीय वर्तुळात रंगली. कारण आरजीपीच्या दाव्यानुसार, मंत्री हळर्णकर हे आरजीपीला घाबरतात म्हणून पोलिस संरक्षणात गावात येतात. तर दुसरीकडे, अस्नोड्यामध्ये भाजपाच्या कार्यकर्त्यांची संख्या मोठी होती. त्यामुळे संख्या पाहून आरजीपीवाले माघार घेतली! असा सत्ताधारी गटाचा युक्तिवाद. ∙∙∙

इंग्रजी नव्हे... कोकणीतून बोला!

फोंड्यातील कुत्र्यांच्या निर्बीजीकरण मोहिमेला धडाक्यात सुरुवात झाली. यासाठी राजीव गांधी कलामंदिरात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात व्यासपीठावरील बहुतांश वक्त्यांनी इंग्रजीतून भाषण केले. व्यासपीठावरील तब्बल सहाजणांनी इंग्रजीचा आधार घेतला. जेव्हा कृषिमंत्री रवी नाईक भाषण करण्यासाठी उभे राहिले, तेव्हा त्यांनी सर्वप्रथम इंग्रजीतून नव्हे, तर कोकणीतून बोला, असे वक्त्यांना सुनावले. गोमंतकीयांना कोकणी छान कळते, असे सांगताना कुत्र्यांना पण प्राणिमित्रांची आणि आपल्या मालकांची भाषा अर्थातच कोकणी कळते, असे रवी नाईक सांगायला विसरले नाहीत. ∙∙∙

शहा यांच्या दौऱ्याचे नियोजन

सोमवारी सायंकाळी उशिरा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या वाहनांचा ताफा भाजप कार्यालयाकडे स्थिरावला. एवढ्या उशिरा मुख्यमंत्री पक्ष कार्यालयात का आले असतील याविषयी उत्सुकता निर्माण झाली. पत्रकारांनी त्याकडे आपला मोर्चा वळवला. काहींनी तिसरा मजलाही गाठला. त्यावेळी शहा यांचा शनिवारी दौरा आहे. त्यावेळी कार्यकर्ते आणण्याचे नियोजन यासह कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी मुख्यमंत्री पक्ष कार्यालयात आल्याचे सांगण्यात आले. मुख्यमंत्री तेथून काही वेळाने निघाले पण ते माध्यमांशी मात्र आपल्या शासकीय निवासस्थानाबाहेर बोलले. तेथे मोपा विमानतळ टॅक्सी आंदोलनाबाबत त्यांनी भाष्य केले मात्र भाजप कार्यालयातील त्या बैठकीविषयी शब्दही उच्चारला नाही. ∙∙∙

...कोणाचे खिशे भरतात?

लीव्ह ॲण्ड लायसन्स आणि प्रमाणपत्रांवर (ॲफेडेव्हिट) वाहने राज्यात नोंद होतात, ही काही नवी बाब नाही. मात्र, वाहतूक खात्याची दोन कार्यालये आहेत, एक दक्षिण आणि दुसरे उत्तर गोव्यात आहेत. प्रवासी बसेस नोंदणीसाठी लाखो रुपये या कार्यालयातील अधिकारी घेत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते सुदीप ताम्हणकरांनी केला आहे. त्यामुळे ते आरोप करीत असल्याप्रमाणे अधिकारी जर एवढी मोठी रक्कम आकारत (बेकायदा) असतील, तर ती कोणा-कोणाच्या खिशात जात असणार आहे, हे त्याच अधिकाऱ्यांना माहीत. एका बाजूला पारदर्शी कारभाराची टीमकी वाजवली जात असताना सामाजिक कार्यकर्ते जे आरोप करतात, त्यावरून जनतेच्या मनात निश्चित विविध प्रश्न उपस्थित झाल्याशिवाय राहणार नाहीत. ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Opinion: गोव्याची जमीन लुटणाऱ्या प्रमुख गुन्हेगारांना ओळखून, त्यांना हरवण्यासाठी आपण एकत्र येऊ शकतो का?

गोव्यात एक काळ असा होता, हॉटेलात तुमचे पैसे विसरले तर नंतर सहज परत मिळायचे; वाढत्या हिंसक घटना आणि मानसिकता

आशिया चषकाच्या फायनलमध्ये पाकिस्तानची नांगी ठेचल्यानंतर 'सूर्यकुमार' गोव्यात, क्रिकेट मैदानाचे करणार उद्घाटन

Majorda: धीरयोत उधळलेल्या रेड्याने शिंग भोसकले, एकाचा मृत्यू; तिघे संशयित फरार, पोलिस हतबल

Mukhi Cheetah: चार बछड्यांपैकी एकच जगली, 'मुखी' झाली 3 वर्षांची; प्रजननक्षम झालेली पहिली चित्ता मादी

SCROLL FOR NEXT