Monsoon Update Dainik Gomnatak
गोवा

Monsoon Update: गोव्यात 'यलो अलर्ट'! पश्चिम राजस्थानातून मॉन्सूनचा परतीचा प्रवास सुरू; बंगालच्या उपसागरात वर्षातील पहिल्या चक्रीवादळाची शक्यता

Monsoon Withdrawal From Rajasthan: यंदाच्या नैर्ऋत्य मॉन्सूनचा पश्चिम राजस्थानातून परतीचा प्रवास सुरू झाल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) शनिवारी जाहीर केले.

गोमंतक ऑनलाईन टीम

पुणे: यंदाच्या नैर्ऋत्य मॉन्सूनचा पश्चिम राजस्थानातून परतीचा प्रवास सुरू झाल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) शनिवारी जाहीर केले. दुसरीकडे बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून, त्याची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. या क्षेत्राच्या प्रभावामुळे महाराष्ट्रासह गोव्यात येत्या आठवड्यात पावसाची शक्यता विविध हवामानशास्त्रीय मॉडेलमधून वर्तविण्यात आली आहे.

पश्चिम राजस्थानातून मॉन्सूनचा परतीचा प्रवास सुरू होण्याची सर्वसाधारण तारीख १७ सप्टेंबर असून, यंदा त्या तुलनेत दोन दिवस उशिराने मॉन्सून बाहेर पडण्यास सुरुवात झाली. ‘आयएमडी’ने दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम राजस्थानवर सध्या अँटी सायक्लोनची (जास्त दाबाची) स्थिती असून, या भागात सलग पाच दिवस कोरडे हवामान नोंदले गेले आहे. उपग्रहीय चित्रामधून या भागावरील वातावरणात बाष्पाचे प्रमाणदेखील कमी झाले आहे.

परतीच्या मॉन्सूनची दक्षिणसीमा सध्या रामगड, मोहनगड, फलोदी, खाजुवाला येथून जात आहे. पुढील तीन ते चार दिवसांत मॉन्सून राजस्थानच्या आणखी काही भागांसह सौराष्ट्र, कच्छ आणि पंजाबच्या काही भागांतून बाहेर पडण्याची शक्यता आहे. दुसरीकडे शनिवारी रात्री उत्तर अंदमानच्या समुद्रात कमी दाबाच्या क्षेत्राची निर्मिती झाली. वायव्येकडे सरकताना येत्या २१ सप्टेंबरपर्यंत हे क्षेत्र तीव्र (डिप्रेशन) होणार असून, २२ सप्टेंबरला त्याचे डीप डिप्रेशनमध्ये रूपांतर होऊ शकते.

गोव्यात उद्यापासून ‘यलो अलर्ट’

वातावरणाच्या खालच्या थरात मराठवाड्यापासून दक्षिण-पूर्व अरबी समुद्रापर्यंत कमी दाबाची रेषा तयार झाली आहे. ही हवामान प्रणाली अरबी समुद्रावरून मोठ्या प्रमाणात बाष्प आणि आर्द्रता खेचून कोकण किनारपट्टीच्या दिशेने ढकलत आहे. यामुळे राज्यात सोमवार (ता. २१) ते २३ सप्टेंबर या कालावधीत मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता गोवा वेधशाळेने वर्तविली आहे.

या पार्श्वभूमीवर सोमवारपासून तीन दिवस ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. या तीन दिवसांच्या कालावधीत राज्यातील काही भागांत विजांच्या कडकडाटासह ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. नागरिकांनी या कालावधीत योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ranji Trophy Cricket: घरच्या मैदानावर गोव्याची रणजी मोहीम सुरू; अनुभवी बडोद्याशी पहिल्यांदाच रणजी लढत

Indian Super League: चेन्नईयीनचा विजय एफसी गोव्याने हिरावला; फातोर्ड्यात सामना 1-1 गोलबरोबरीत

Marathi Language: मराठीच्या नावाने गर्दी नको, गुणवत्तेची लाट हवी! भाषा टिकवण्यासाठी पाच धोरणात्मक बदलांची गरज

Wisdom of the Fourth Tree: तीन झाडांचा अहंकार मोडला, चौथं झाड मात्र आनंदात जगलं; आयुष्याचा मोठा धडा शिकवणारी गोष्ट!

Goa Politics: काँग्रेसच्या 'गोंय राखण' यात्रेचा भाजपच्या 'सेवा ज्योती'समोर निभाव लागणार?

SCROLL FOR NEXT