6th Manohar Parrikar Science Festival
पणजी: मनोहर पर्रीकर विज्ञान महोत्सव गोव्याला विज्ञान हब बनविण्यात महत्त्वाची भूमिका निभावेल, अशी आशा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केली. ते एनआयओ दोनापावला येथे आयोजित ६ व्या मनोहर पर्रीकर विज्ञान महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. प्रा. हबिल लुसायना वोझ्नियाक, डॉ. अनिल काकोडकर, जुजे मान्युयल नोरोन्हा, डॉ. सुनिलकुमार सिंग, ज्येष्ठा यादव आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. सावंत म्हणाले, राज्यातील विद्यार्थ्यांनी विज्ञानाकडे वळावे, त्यांच्या विज्ञानाप्रती रूची वाढावी या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्न पाहावीत, ती पूर्ण करण्यासाठी कष्ट घ्यावेत. विद्यार्थांनी मोठ्या प्रमाणात विज्ञानाकडे वळण्याची गरज आहे. यावेळी मनोहर पर्रीकर युवा शास्त्रज्ञ पुरस्कार प्रदान करण्यात आला.
बायोइंजिनियरिंग विभाग, आयआयएससी बंगळूर येथे कार्यरत असलेले प्रा. मोहित कुमार जॉली यांना यंदाचा मनोहर पर्रीकर युवा शास्त्रज्ञ पुरस्कार मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांच्याहस्ते देऊन गौरविण्यात आले. प्रा.जॉल कर्करोग सारख्या दुर्धर आजारावर संशोधन करत असून त्यांच्या कार्यामुळे निश्चितपणे अनेकांच्या जीवनात बदल घडेल, असे गौरवोद्गार यावेळी मुख्यमंत्री सावंत यांनी काढले.
राष्ट्राकडे सैन्यबल, अर्थिक सुबकता असते तेव्हा ते प्रगत राष्ट्र ठरतही असेल, परंतु ज्यावेळी नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान निर्माण करण्याची क्षमता असते, त्यावेळी ते राष्ट्र निश्चितपणाने प्रगत बनते. आज आपला देश विज्ञानाच्या अनुषंगाने अतिशय आधुनिक आहे. इतर कोणत्याही राष्ट्राने जे कार्य केले नाही, ते आम्ही केले आहे. त्याचा लाभ सर्वसामान्यांनाही होत आहे, असे शास्त्रज्ञ डॉ. काकोडकर यांनी सांगितले.
गोव्याचा विकास करणे हाच मनोहर पर्रीकरांचा ध्यास होता. राज्याच्या पायाभूत सुविधांच्या विकासात त्यांचा वाटा मोठा आहे. त्यांनी आपल्या काळात दूरदृष्टीने राज्यात पायाभूत प्रकल्पांना सुरुवात केली. त्यांनी योजलेले अनेक प्रकल्प आम्ही पूर्णत्वास असून, राज्याचा सातत्याने विकास करणे हीच स्व. पर्रीकरांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे मत मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी व्यक्त केले. शुक्रवारी मनोहर पर्रीकर यांच्या जयंतीनिमित्त मिरामार येथील त्यांच्या समाधी स्थळावर जाऊन मुख्यमंत्र्यांनी आदरांजली वाहिली. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी पर्यावरण मंत्री आलेक्स सिक्वेरा, जलस्त्रोत मंत्री सुभाष शिरोडकर, उत्पल पर्रीकर व अन्य अधिकारी उपस्थित होते. दिवसभर भाजप नेत्यांनी, विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांनी, अधिकाऱ्यांनी समाधीस्थळावर येऊन त्यांना आदरांजली अर्पण केली.
मी करत असलेल्या कार्याबद्दल मला मनोहर पर्रीकर युवा शास्त्रज्ञ पुरस्कार देऊन गौरव केल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. आपल्या आयुष्यात अनेक आव्हाने येतात, परंतु आपण त्यांच्यावर एकट्याने मात देऊ शकत नाही. त्यावेळी आपण एकत्रितपणे अशा आव्हांनाना सामोरे जाणे गरजेचे असते, हाच माझा विद्यार्थ्यांना सल्ला आहे.प्रा. मोहित कुमार जॉली
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.