सरकार एकाबाजूने व्यवसाय सुलभता आणल्याचे सांगते तर दुसरीकडे आमदार आमोणकर बंदरातील व्यावसायिकांना धमकावतात, असा आरोप फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई यांनी विधानसभेत शून्य तासाला केला. आपल्या म्हणण्याच्या समर्थनार्थ त्यांनी वर्तमानपत्रे फडकावली. धमकी देऊन पैसे गोळा केले जातात, असेही त्यांनी नमूद केले.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मुरगाव बंदर प्रशासनाच्या अध्यक्षांनी तसे काही होत नाही असे सांगितल्याने तो विषय मिटला, असे सांगत हा विषय गुंडाळला.
सरदेसाई म्हणाले, आमदारांकडून सतावणूक केली जाते. यामुळे काहींनी कारवारमध्ये तर काहींनी महाराष्ट्रात व्यवसाय हलवणे सुरू केल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. हा प्रकार गंभीर आहे. सरकारने याची दखल घ्यावीच लागेल. सरकारला यामुळे वार्षिक १६ कोटी रुपयांच्या महसुलाला मुकावे लागणार आहे.
त्यावर मुख्यमंत्री म्हणाले, वर्तमानपत्रांतील बातम्यांच्या आधारे आरोप करता येत नाही. तो विषय आता मागे पडला आहे. मुरगाव बंदर प्राधिकरणाच्या अध्यक्षांनीच तसे काही झाले नसल्याचा खुलासा केला आहे.
सांताक्रुझचे आमदार वीरेश बोरकर यांनी धोकादायक झाडे पावसाळापूर्व कापली न गेल्याने आता आपत्तीला तोंड द्यावे लागत असल्याकडे सरकारचे लक्ष वेधले. ते म्हणाले, पंचायतींकडे हे काम सरकारने सोपवले तरी प्रत्यक्षात धोकादायक वृक्ष कापलेच गेले नाहीत.
केपेचे आमदार एल्टन डिकॉस्ता यांनी राज्यभरात डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढल्याने काळजी घेण्याची गरज व्यक्त केली. बाणावलीचे आमदार व्हेन्झी व्हिएगश यांनी विद्यार्थ्यांच्या तुलनेत शिक्षकांची संख्या अपुरी असल्याचा विषय मांडला. ते म्हणाले, कंत्राटी शिक्षकांना कमी मानधनात जास्त काम दिले जाते. त्यावर याची नोंद घेतल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
वेळ्ळीचे आमदार क्रुझ सिल्वा यांनी कमी दाबाच्या वीजपुरवठ्यामुळे लोकांची उपकरणे निकामी होत असल्याचे सांगितले. पावसाळ्यात वारंवार वीजपुरवठा खंडित होतो याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
वास्कोचे आमदार दाजी साळकर यांनी मच्छीमार धक्का मोडकळीस आल्याकडे सरकारचे लक्ष वेधले. तेथे तरंगता धक्का उभारावा; पण पारंपरिक मच्छीमारांच्या २५० नौकांसाठी असलेला धक्काही दुरुस्त करावा, अशी मागणी त्यांनी केली.
कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांनी लोंबकळणाऱ्या तारा धोकादायक व अपघातास निमंत्रण देणाऱ्या ठरत असल्याचे निदर्शनास आणले. माहिती तंत्रज्ञानमंत्री रोहन खंवटे यांनी यासाठी धोरण आहे. त्याचा अवलंब केल्यास काही ठिकाणी इंटरनेट बंद पडेल, अशी भीती व्यक्त केली.
सांताक्रुझचे आमदार रुडाल्फ फर्नांडिस यांनी ४० वर्षे जुन्या; पण लोकवस्तीत असलेल्या भंगारअड्ड्यातून झालेल्या क्लोरीन वायू गळतीमुळे अनेक महिला आजारी पडल्याचा विषय मांडला. ते म्हणाले, त्या महिलांची नियमित तपासणी करावी व लोकवस्तीतील भंगारअड्डे दुसरीकडे हलवावेत.
मांद्रेचे आमदार जीत आरोलकर यांनी आगरवाडा सरकारी हायस्कूल व पेडण्याच्या सरकारी उच्च माध्यमिक विद्यालयाच्या इमारती धोकादायक बनल्याचे नमूद केले. या इमारतींचे छत कधीही कोसळू शकते, असे त्यांनी सांगितल्यावर मुख्यमंत्र्यांनी ‘साबांखा’चे पथक पाठवतो व दुरुस्ती करतो, असे आश्वासन दिले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.