गोमंतकीय मतदार हा सुजाण मतदार आहेत हे दक्षिण गोव्यातील मतदारांनी लोकसभा निवडणुकीत भाजपला दाखवून दिले आहे. अशा स्थितीत २०२७ च्या विधानसभा निवडणुकीत २७ जागा निवडून येतील, अशी वल्गना मुख्यमंत्र्यांनी करणे म्हणजे गोव्यातील मतदारांना त्यांनी गृहीत धरण्यासारखे आहे. असे गृहीत धरून मुख्यमंत्री गोमंतकीय मतदारांचा एकप्रकारे अपमानच करत आहेत, अशी प्रतिक्रिया गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी व्यक्त केली.
गोमंतक टीव्हीच्या ‘साष्टीकार’ या कार्यक्रमात बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. विरोधकांनी आता केलेली एकी येत्या विधानसभा निवडणुकीपर्यंत कायम राहिली तर गोव्यात भाजपला आमदारांचा दुहेरी आकडाही गाठणे कठीण होईल, असे भाकीत त्यांनी केले. ही मुलाखत ‘गोमन्तक’चे ब्यूरो चीफ सुशांत कुंकळयेकर यांनी घेतली.
सध्या लोकांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी मी संपूर्ण राज्यभर फिरत आहे. ‘अबकी बार चारसो पार’ अशा लोकप्रिय वाटणाऱ्या घोषणा करणे भाजपला आवडते. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी यावेळी मुख्यमंत्री किती मतांच्या आघाडीने जिंकून आले आहेत, ते त्यांना माहीत आहे.
अन्य काही आमदारांनाही तिहेरी आकड्यांची आघाडी मिळाली नव्हती. केवळ ‘आरजी’ पक्ष मदतीला धावून आल्यानेच भाजपचे सरकार सत्तेवर येऊ शकले. मात्र, असे चमत्कार प्रत्येकवेळी होऊ शकत नाहीत, हे मुख्यमंत्र्यांनी विसरता कामा नये, असे सरदेसाई यांनी या कार्यक्रमात बोलताना सांगितले.
‘२०२७ मध्ये २७ आमदार’ ही ‘अबकी बार चारसो पार’च्याच धर्तीची घोषणा आहे. अशा घोषणा ऐकायला बऱ्या वाटतात, पण त्या प्रत्यक्षात उतरत नाहीत, याचा प्रत्यय या लोकसभा निवडणुकीने भाजपला आणून दिला आहे. मुख्यमंत्र्यांना त्याचा कदाचित विसर पडला असावा. सध्या मी लोकांचे प्रश्न ऐकून घेण्यासाठी राज्यभर फिरत आहे. लोकांचे प्रश्न जाणून घेतल्यावर लोक या सरकारवर किती नाराज आहेत ते स्पष्ट जाणवते. लोक या सरकारला विटले आहेत. त्यांना फक्त पर्याय हवा आहे. त्यांना चांगला पर्याय मिळाला तर या सरकारातील कित्येक आमदारांना घरी बसवतील, असे सरदेसाई म्हणाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.