बार्देश: शिवोलीमध्ये एका शेतात जपानमधील प्रसिद्ध आणि दुर्मिळ मियाझाकी आंब्यांचे यशस्वी उत्पादन घेण्यात आले आहे. तेजस्वी लाल रंग आणि अतिशय गोड चव यासाठी ओळखले जाणारे हे आंबे जगभरात ‘लाल सोने’ म्हणून प्रसिद्ध आहेत.
जपानी हवामानाशी जुळणारे वातावरण तयार करत शिवोली मधील शेतात या विदेशी जातीचे आंबे वाढवण्यात यश मिळाले आहे. अभियंते राजेश धारगळकर म्हणाले, ‘मियाझाकी आंबे भारतीय शेतीसाठी एक ‘गेम-चेंजर’ ठरू शकतात. त्यांची चव, रंग आणि बाजारमूल्य अतुलनीय आहे. भारतात त्यांचे उत्पादन यशस्वी होणे, ही फार मोठी गोष्ट आहे.’
या कामगिरीचे कौतुक करत कोलवाळ तुरुंगाचे अतिरिक्त महानिरीक्षक डॉ. स्नेहल गोलतेकर यांनी म्हटले, ‘भारतात मियाझाकी आंब्यांची लागवड ही एक महत्त्वाची पायरी आहे. ही कामगिरी नाविन्यपूर्ण शेती पद्धतींचे उत्तम उदाहरण आहे. जपानमध्ये भारतीय चलनानुसार रु.१ लाख ५७ हजारला एक किलो आंबे मिळतात.
मियाझाकी आंबे उगमस्थानाप्रमाणेच इथेही वाढवण्यासाठी २५°अंश ते ३५°अंश तापमान, तसेच ५.५ ते ७.५ पीएच असलेली सुपीक माती आवश्यक असते. अत्यंत काटेकोर निगराणी आणि काळजी घेऊनच या आंब्यांचे उत्पादन शक्य होते. ‘ही यशोगाथा आमच्या नाविन्यपूर्ण दृष्टिकोनाचे आणि उत्कृष्ट शेतीसाठी घेतलेल्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे. भारताच्या कृषी क्रांतीत भागीदार होण्याचा आम्हाला अभिमान आहे,’ असे या धारगळकर यांनी सांगितले.
पश्चिम बंगालमधून आणली कलमे
मियाझाकी आंब्याची जपानी कलमे डॉ.स्नेहल गोलतेकर व राजेश धारगळकर यांनी २०२१ मध्ये पश्चिम बंगालहून एका नर्सरीतून आणली होती. आता धारगळकर यांच्या कलमांना आंबे लागलेत. तसेच आपण आणलेल्या कलमांना काही प्रमाणात लागले ,अशी माहिती गोलतेकर यांनी दिली. गोव्यात ही कलमे आणेपर्यंत आम्हाला रु.३१००ला एक कलम पडले.
मियाझाकी’ आंब्यांमध्ये भारताच्या आंबा उत्पादन उद्योगात नवे पर्व सुरू करण्याची क्षमता आहे. त्यांनी शेतकऱ्यांसाठी नवीन बाजारपेठा आणि संधी निर्माण केल्या आहेत.’ प्रीमियम फळांची मागणी भारतात झपाट्याने वाढत आहे. अशा वेळी मियाझाकी आंब्यांचे स्थानिक उत्पादन शेतीच्या क्षेत्रातील एक मोठे पाऊल ठरू शकते. -राजेश धारगळकर, अभियंते
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.