Usgao Murder News Dainik Gomantak
गोवा

Usgao: संतापजनक! शेजारच्‍या चिमुकलीचा बळी घेऊन मृतदेह पुरला जमिनीत; संततीसाठी कसलये तिस्क येथे नरबळीचा संशय, दाम्‍पत्‍य ताब्‍यात

Usgao Tisk Murder: कसलये-तिस्क (फोंडा) येथे एका घराच्या बाजूला ५ वर्षीय मुलीचा मृतदेह जमिनीत गाडलेल्या स्थितीत आढळल्याने खळबळ उडाली आहे.

Sameer Panditrao

Usgao Tisk Murder Case

फोंडा: कसलये-तिस्क (फोंडा) येथे एका घराच्या बाजूला ५ वर्षीय मुलीचा मृतदेह जमिनीत गाडलेल्या स्थितीत आढळल्याने खळबळ उडाली आहे. मयत मुलीचे नाव अमैरा ज्युडान अन्वारी असे आहे. ज्या घराच्या शेजारी हा मृतदेह गाडला गेला होता, त्या घरमालकाला पत्नीसह फोंडा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी हा प्रकार खुनाचा गुन्हा म्हणून नोंद केला आहे. दरम्‍यान, हा जादूटोण्याचा प्रकार असल्याचा संशय स्थानिकांकडून व्यक्त होत आहे. गुरुवारी रात्री उशिरा अमैराचा मृतदेह खड्ड्यातून बाहेर काढण्‍यात आला.

कसलये-तिस्क येथील अमैरा अन्वारी ही चिमुरडी काल बुधवारी सकाळपासून बेपत्ता होती. याबाबत फोंडा पोलिस स्थानकात तक्रार नोंदविण्‍यात आली होती. अमैरा ही आपल्या आईसमवेत राहत असलेल्या घरासमोरील सुमारे ५० मीटर अंतरावरील अलाट कुटुंबीयाच्या घरी येजा करत होती. त्‍यामुळे पोलिसांनी अलाट पती-पत्नीकडे चौकशी केली असता हा प्रकार उघडकीस आला.

या मुलीला मारून घराच्या बाजूलाच पुरल्याचे अलाट दाम्‍पत्‍याने कबूल केले. त्यामुळे संशयित पप्पू ऊर्फ बाबासाहेब अलाट व त्याची पत्नी पूजा अलाट या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

उपलब्ध माहितीनुसार, अन्सारी आणि अलाट ही दोन्‍ही कुटुंबे परप्रांतीय असून गेल्‍या अनेक वर्षांपासून गोव्यात राहत आहेत. पप्पू आणि त्याची पत्नी पूजा या दाम्‍पत्याला मूलबाळ नव्‍हते. आपल्‍याला मूल व्‍हावे तसेच समृद्धी मिळावी या हेतूनेच हा नरबळी दिल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

पोलिस निरीक्षक विजयनाथ कवळेकर व उपअधीक्षक शिवराम वायंगणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. पोलिस अधीक्षक टिकम सिंग यांनीही घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. तसेच फोंडा उपजिल्हाधिकारी शुभम नाईक, मामलेदार राजेश साखळकर, डॉ. मधू घोडकिरेकर हे स्वतः फॉरेन्सिक पथकासह घटनास्थळी उपस्थित होते.

पप्‍पूच्‍या घरी असायचे अमैराचे येणे-जाणे

अमैरा अन्वारी ही आपली आई आणि एका भावंडासह कसलये येथे राहत होती. अमैराच्‍या आईला लग्न करून रत्नागिरीला दिली होती, पण नवरा मारझोड करत असल्याने ती दोन्ही मुलांसमवेत कसलये येथे आपल्या आईच्या घरी वर्षभरापूर्वी राहायला आली होती. अमैरा ही अधूनमधून शेजारी राहणाऱ्या पप्‍पू ऊर्फ बाबासाहेब अलाट याच्या घरी जायची. त्यामुळे दोन्ही कुटुंबात चांगले संबंध होते. मात्र या संबंधांचा वापर पप्‍पूने वाईट आणि एकदम खालच्‍या दर्जाच्‍या कामासाठी केल्‍याबद्दल स्थानिकांत तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.

खून करून रात्रीच पुरला अमैराचा मृतदेह

वास्तविक काल बुधवारीच पप्‍पूने आपल्या पत्नीच्या सहकार्याने अमैरा हिला ठार मारून तिचा मृतदेह घरातच ठेवला होता. मात्र पोलिस चौकशीला आल्यानंतर रात्रीच खड्डा खणून त्यात तो मृतदेह पुरला. आज सकाळी पोलिस चौकशीत त्याने ही कबुली दिली आणि अमैराच्या गायब होण्याच्या प्रकाराचा उलगडा झाला.

ती होती बेपत्ता

अमैरा काल बुधवारी सकाळपासून बेपत्ता झाल्यानंतर तिचे कुटुंबीय आणि शेजाऱ्यांनी कसलये वस्तीत शोधाशोध सुरू केली. त्यानंतर अमैराच्या आईने आपली मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार फोंडा पोलिसांत दाखल केली. पोलिसांनी तपासाला वेग देताना वस्तीत घरोघरी सखोल चौकशीला प्रारंभ केला. पप्‍पू ऊर्फ बाबासाहेब याच्‍याकडे काल बुधवारी चौकशी केली असता तो थोडा गडबडला होता. आज गुरुवारी पुन्हा त्याची चौकशी केली असता तो असंबद्ध उत्तरे देऊ लागला आणि तेथेच अडकला.

घरात २० वर्षे हलला नव्‍हता पाळणा

पप्‍पू ऊर्फ बाबासाहेब हा एक उत्कृष्ट वेल्डर आहे. कसलये येथे राहण्यापूर्वी तो धारबांदोडा संजीवनी साखर कारखान्याजवळ राहत होता. लग्नाला २० वर्षे उलटली तरी त्‍याच्‍या घरात पाळणा हलला नव्‍हता. त्यामुळे त्याने आपल्‍याला जादूटोण्याने मूल व्हावे व घरात समृद्धी यावी यासाठी हे अघोरी कृत्य केले असावे असा कयास व्यक्त करण्यात येत आहे. पोलिस त्या दृष्टीने चौकशी करत आहेत.

अशा प्रकारे अघोरी कृत्य करणाऱ्याला कडक शासन झालेच पाहिजे. हे गुन्‍हेगार कोणत्‍याही परिस्‍थितीत सुटता कामा नयेत. एका चिमुरडीचा हकनाक बळी गेला हे दुर्दैवी आहे.
रामनाथ डांगी (सरपंच, उसगाव-गांजे)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Hitler DNA Analysis: गंभीर लैंगिक आणि मानसिक आजाराचा सामना करत होता 'हिटलर'; DNA चाचणीतून झाला खळबळजनक खुलासा

चित्रपट हिट, रेहमानचा डान्स सुपरहिट, पण अक्षय खन्ना म्हणतो 'फरक पडत नाही'; धुरंधरच्या यशावर दिलं 3 शब्दांत उत्तर!

IND vs SA 5th T20: मालिकेचा फैसला अहमदाबादमध्ये! पाचव्या टी-20 सामन्यावर हवामानाचं सावट की पावसाची खेळी? जाणून घ्या खेळपट्टी आणि वेदर रिपोर्ट

हडफडे अग्नितांडव प्रकरण! 'बर्च बाय रोमिओ लेन'च्या मालकांचे धाबे दणाणले; अजय गुप्ताची जामिनासाठी कोर्टात धाव

Goa Raj Bhavan Name Change: गोव्यात ऐतिहासिक निर्णय! 'राजभवन' आता ओळखले जाणार 'लोकभवन' नावाने; राज्यपालांनी पुसली वसाहतवादी ओळख

SCROLL FOR NEXT