Ministerial post to Sudin Dhavalikar Dainik Gomantak
गोवा

सुदिन ढवळीकरांना मंत्रिपद: अनेकांना मोठा धक्का

भाजपची चाल: लोकसभा निवडणुकीसाठी व्‍यूहरचना; फोंडा तालुक्याला 4 मंत्रिपदे

दैनिक गोमन्तक

फोंडा: मंत्रिमंडळाच्या दुसऱ्या टप्‍प्‍यातील विस्तारात मडकईचे आमदार व मगोपचे नेते सुदिन ढवळीकर यांची मंत्रिपदी वर्णी लावून भाजपने बऱ्याच जणांना धक्का दिला आहे. वास्तविक सुदिन यांना मंत्रिपद मिळू नये म्हणून अनेकांनी ‘फिल्‍डिंग’ लावली होती. मात्र, आगामी लोकसभा निवडणूक नजरेसमोर ठेवून भाजपच्‍या केंद्रीय नेत्‍यांनी ही धूर्त चाल खेळली आहे. ती खेळताना त्‍यांनी विरोध करणाऱ्या आमदार, मंत्री व कार्यकर्त्यांना काडीचीही किंमत दिलेली नाही, हे विशेष.

माजी मुख्यमंत्री रवी नाईक, कला-संस्‍कृतीमंत्री गोविंद गावडे, सहकारमंत्री सुभाष शिरोडकर, महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात यांनी सुदिन यांची भाजपला गरज नाही अशा प्रकारचा आवाज उठविला होता. त्याचबरोबर फोंडा, मडकई, प्रियोळ भाजपने सुदिन यांच्याविरोधात ‘एल्गार’ उठवला होता. गोमंतकीय बहुजन महासंघानेही सुदिनना मंत्रिमंडळात घेण्यास विरोध दर्शविला होता. तर, अखिल गोमंतक भंडारी समाजाने मगोच्या आमदाराला मंत्रिपद द्यायचे असल्यास मांद्रेच आमदार जीत आरोलकर यांना मंत्रीपद द्यावे अशी मागणी करून सुदिन यांचा पत्ता कट करावी अशी उघड भूमिका घेतली होती. असा सर्व थरांतून विरोध असूनही शेवटी सुदिन यांची मंत्रिपदावर वर्णी लागलीच. यामुळे फोंडा तालुक्‍यातील चारही आमदार मंत्री बनले आहेत.

विरोध असूनही सुदिन यांना मंत्रिमंडळात घेण्याचे कारण म्हणजे ‘मिशन लोकसभा २०२४’ हे होय. मागच्या वेळी भाजपच्या नरेंद्र सावईकरांचा पराभव केवळ ९ हजार मतांनी झाला होता. मडकईत झालेले कमी मतदान हे त्यामागचे मुख्य कारण ठरले होते. यावेळी भाजपला हा धोका पत्करायची इच्छा नसल्यामुळे सुदिन यांना मंत्रिपदावर विराजमान केले असल्याचे बोलले जात आहे. त्‍यांची मडकईतच नव्हे तर प्रियोळ व फोंड्यातही बऱ्यापैकी ताकद आहे. त्याचा परिणाम लोकसभा निवडणुकीवर होऊ शकतो. म्‍हणूनच भाजपने ‘सेफ गेम’ खेळला असल्याचे राजकीय विश्‍लेषकांचे मत झाले आहे. पण आता सुदिन यांच्या मंत्रिपदाला विरोध करणारे भाजपचे कार्यकर्ते कसा काय प्रतिसाद देतात, हेही बघावे लागेल.

फोंड्यात राजकीय संघर्षाची शक्‍यता

एका तालुक्‍यातील चार आमदार मंत्री बनण्‍याची गोव्यातील ही पहिलीच वेळ आहे. भाजप श्रेष्‍ठींनी फोंडा तालुक्याला भरभरून देतानाच पेडणे, सासष्टीसारखे तालुके मात्र मंत्रिपदापासून वंचित ठेवले आहे. सासष्‍टी तालुक्यात आठ मतदारसंघ येतात. मात्र तिथे एकाही आमदाराला मंत्रिपद देण्यात आलेले नाही. खरेतर तीन वेळा निवडून आलेले कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्‍स यांचे नाव अग्रस्थानी होते. पण शेवटच्या क्षणी त्यांचा पत्ता कट केला गेला. आता फोंडा तालुक्याचा विकास जलद होऊ शकतो असे वाटत असले तरी चारपैकी तीन मंत्री एकीकडे व सुदिन दुसरीकडे असा प्रकारही होऊ शकतो. रवी नाईक, गोविंद गावडे यांचे सुदिन यांच्‍याशी पटत नाही. त्‍यामुळे राजकीय संघर्षाची शक्यता आहेच.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

43.20 कोटींच्या कोकेन प्रकरणात आरोपीला सशर्त जामीन मंजूर; दक्षिण गोवा जिल्हा सत्र न्यायालयाचा मंगेश वाडेकरला दिलासा

Goa Crime: 17 वर्षीय मुलीला पळवून नेऊन केला लैंगिक अत्याचार, डिचोलीतील घटनेनं खळबळ; कणकवलीच्या तरुणाला अटक

Makharotsav: ..उत्सवमूर्ती जिवंत झाल्याचा आभास देणारा 'मखरोत्सव', गोव्यातील लोकसंस्कृतीचे दर्शन

Viral Video: 'खतरों के खिलाडी' वाली स्टंटबाजी, पठ्ठ्याचा सोशल मीडियावर व्हिडिओ तूफान व्हायरल; नेटकरी म्हणाले...

मनोज परबांच्या कार्यकर्त्यावर मंत्री नीलकंठ हळर्णकर धावून गेले; कोलवाळमध्ये आरजी आणि भाजप समर्थक आमने-सामने Watch Video

SCROLL FOR NEXT