पणजी: गोव्याच्या किनारी भागात शॅक धोरणाच्या अटींचा भंग करणाऱ्या परवानाधारकांवर गोवा पर्यटन विभागाने कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. गोमंतकीयांना व्यवसायासाठी शॅक उपलब्ध करून देताना सर्व शॅक असोसिएशनच्या मागण्या मान्य करून धोरण बनवले होते. तरीही शॅक भाड्याने देण्याचे प्रकार सुरूच ठेवले आहे. ज्यांनी आपले शॅक भाड्याने दिले आहेत, त्यांचे परवाने रद्द होणार असून त्यांना दंड ठोठावला जाईल, असा सज्जड इशारा पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनी दिला.
मंत्री खंवटे यांनी सांगितले की, यावर्षी पर्यटन हंगाम (Tourist Season) सुरू होण्यापूर्वीच शॅक सुपूर्द केले होते. गोमंतकीयांनी आपल्या नावावर शॅक घेतल्या आणि त्यातील काहींनी त्या भाड्याने देखील दिल्या. अशांवर आता कारवाई होईल. आता आम्ही सर्व शॅक तपासणी मोहीम सुरू करत असून ज्यांनी नियमांचा भंग केला आहे, त्यांच्यावर कठोर पावले उचलली जातील.
आता कुणीही शॅक भाड्याने देणार नाही याची खात्री करण्यास आम्ही विशेष यंत्रणा तयार करत आहोत. परंतु, स्थानिक पंचायत, पोलिसांनीही शॅकधारकांचे परवाने तपासावेत. आम्ही परवाना मंजूर करताना सर्व कागदपत्रे तपासतो, मात्र गैरवापर होत असेल तर पंचायतीने गप्प राहू नये, असे खंवटे म्हणाले.
मांद्रेचे आमदार जीत आरोलकर (Jit Arolkar) यांनी अधिकाऱ्यांना ‘तुम्ही येथे येऊ नका’ असा इशारा दिल्याच्या संदर्भात विचारले असता मंत्री खंवटे म्हणाले की, मी मुख्यमंत्री सावंत यांच्याशी पर्यटन विषयासंदर्भात चर्चा केली आहे. आम्हाला गोमंतकीय आणि किनारी भागातील उपक्रमांवर कठोर लक्ष ठेवायचे आहे. कुणीही अडथळा आणण्याचा प्रयत्न केला तर आम्ही गप्प बसणार नाही.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.