Mahadayi Water Dispute |
Mahadayi Water Dispute |  Dainik Gomantak
गोवा

Mahadayi Water Dispute: म्हादई प्रश्नावर केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांच्याकडून सारवासारव

दैनिक गोमन्तक

Mahadayi Water Dispute: राज्यात म्हादईचा विषय धगधगत असतानाच केंद्रीय वन, पर्यावरण आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्रसिंग यादव गोव्याच्या दौऱ्यावर आले आहेत. काल त्यांनी भाजप कार्यालयात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला अर्थसंकल्प हा देशावर दीर्घकालीन परिणाम करेल, असे सांगत विविध मुद्द्यांचा पुनरुच्चार केला.

मात्र, म्हादईचा मुद्दा सध्या ज्या मंत्रालयावर बेतलेला आहे, त्यावर त्यांनी बोलणेच टाळले.

पत्रकारांनी अक्षरश: प्रश्नांचा भडिमार करूनही ‘तथ्यांच्या आधारे अभ्यास करू’ इतकेच ते सांगत राहिले. त्यामुळे पाणी कुठे तरी मुरते आहे, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

उत्तर कर्नाटकातील शेतकऱ्यांना पाणी मिळावे, यासाठी आम्ही म्हादईचे पाणी वळवण्यासाठी परवानगी दिली असल्याचे जाहीर भाष्य केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले होते.

आता केंद्रीय पातळीवरील नेतेमंडळी आणि राज्यातील सत्ताधारी मंत्री या विषयावर चुप्पी साधून आहेत. यामुळे गोव्यात असंतोष पसरलेला असताना केंद्रीय मंत्री भूपेंद्र सिंग यादव यांनी केवळ सारवासारवच केली.

‘म्हादईचा पोपट मेला आहे का?’

केंद्रीय जल आयोगाने कर्नाटकला पाणी वळवण्यासाठी दिलेली मंजुरी, गृहमंत्र्यांनी केलेले भाष्य, त्यावर दोन्ही राज्यांत सुरू असलेला संघर्ष, याच मुद्द्यांवर सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका इतके सारे असताना केंद्रीय मंत्री केवळ अभ्यास करत आहे, असे सांगून उत्तर देणे कसे टाळू शकतात, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

की ‘म्हादईचा पोपट मेला आहे आणि ते जनतेला सांगता येत नाही’, म्हणून केंद्रीय मंत्री वेळ काढत आहेत, हे कळायला मार्ग नाही. या विषयावर सध्या विरोधकही थंड झाले असून विराेधकांनी ‘सेव्ह म्हादई’ चळवळीवर सारीच भिस्त टाकली आहे.

आमचा अभ्यास सुरू आहे !

आज यादव यांनी जागतिक पाणथळ बचाव अभियानच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांमध्ये भाग घेतला. मात्र, म्हादईचे पाणी वळवण्याचा विषय ज्या मंत्रालयाच्या अखत्यारित आहे, ते मंत्री त्याबाबत तथ्यांच्या आधारे आपण अभ्यास करत असल्याचे सांगत होते.

कोणत्याही अभयारण्यात मोठे प्रकल्प राबवणे, पाणी वळवणे, यासारख्या बाबी वन कायदा 1972 कलम 29 याचे उल्लंघन आहे. ही बाब पत्रकारांनी लक्षात आणून दिल्यानंतरही मंत्री यादव यांनी, आपण अभ्यास करत असल्याचे सांगत प्रश्नाला उत्तर देणे टाळले.

मांडवीतीरी होम हवन

म्हादई रक्षणासाठी आज सेव्ह म्हादई चळवळीच्या वतीने मांडवीच्या तीरावर होम हवन करत ‘परमेश्वरा म्हादईचे रक्षण कर, तूच तिला मार्ग दिला आहेस, ती तशीच वाहत राहू दे.

तिला वळवू देऊ नको.’ अशी प्रार्थना करण्यात आली. त्यानंतर मांडवीला श्रीफळ अर्पण करण्यात आले. यावेळी ॲड. हृदयनाथ शिरोडकर, प्रा. प्रजल साखरदांडे, प्रतिमा कुतिन्हो आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

काही लोक व्यक्तिगत स्वार्थासाठी म्हादईचे पाणी वळवू पाहात आहेत. याचा विपरित परिणाम राज्यातील पर्यावरणासह लोकजीवनावर होणार आहे. जानेवारी-फेब्रुवारीमध्येच सत्तरी तालुक्यातील अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनतो.

अनेक गावांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो. अशा स्थितीत म्हादईचे पाणी वळवले तर गोव्यावर त्याचा मोठा परिणाम होईल. - ॲड. हृदयनाथ शिरोडकर

वैज्ञानिक तथ्य आणि तज्ज्ञांच्या मतांवर निर्णय : म्हादईबाबत केंद्रीय मंत्र्यांवर प्रश्नांची सरबत्ती सुरू असताना त्यांनी कर्नाटक आणि गोवा राज्य स्तरावर चर्चा केली जात आहे, असे सांगत जेव्हा हा मुद्दा पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्रालयासमोर येईल, तेव्हा आम्ही वस्तुस्थितीचा शास्त्रोक्त अभ्यास करू आणि त्यानंतरच यावर निर्णय घेऊ, असे सांगितले. मी तज्ज्ञ नाही. वैज्ञानिक तथ्ये आणि तज्ज्ञांच्या मतांवर निर्णय घेतला जाईल, असे यादव म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mumbai Goa Highway Traffic: मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी; झाड कोसळल्याने खोळंबा!

Goa Success Story: गणेश SSC पास हो गया! गोव्यातील वानरमारे समाजातील ठरला पहिलाच विद्यार्थी

Goa 11th Admission: अवाजवी शुल्क आकारल्यास तात्काळ कारवाई; CM सावंत यांचा विद्यालयांना इशारा

Yellow Alert In Goa: गोव्यात यलो अलर्ट, पुढील दोन दिवस महत्वाचे

Goa Drugs Case: इवल्याशा गोव्यात ड्रग्जचा सुळसुळाट; 3.8 कोटींचे अमली पदार्थ जप्त

SCROLL FOR NEXT