कोल्हापूर : 5 ते 25 मार्च दरम्यान गोव्यातील उत्तर आणि दक्षिण अशा 8 जिल्ह्यातील तसच महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर येथिल पात्र उमेदवारांची सैन्यभरती शिवाजी विद्यापीठाच्या क्रीडांगणावर होणार आहे. ही भरती सुरळीत पार पाडण्यासाठी संबंधित विभागांनी नियोजन करावे, अशी सूचना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आजच्या बैठकीत दिली आहे.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलांडे, पालिकेचे अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, कर्नल विक्रमादित्यासिंह पाल, प्रांताधिकारी वैभव नावाडकर, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी निवृत्त कर्नल प्रदीप ढोले उपस्थित होते.
मार्चमध्ये होणाऱ्या भरतीसाठी नोंदणी झालेल्या परंतु, प्रवेश पत्र मिळालेल्या उमेदवारांनाच भरती प्रक्रियेत सहभागी होता येणार असल्याने त्याबाबत भरती प्रक्रियेचे नियोजन करावे लागणार आहे. अशी माहिती कर्नल श्री. पाल यांनी यावेळी दिली.
"महापालिकेने उमेदवारांना भरतीच्या ठिकाणी जाण्यासाठी के.एम.टी.बसच्या फेऱ्या सुरु ठेवाव्यात, आरोग्य विभागाने आवश्यक मनुष्यबळासह पथके नियुक्त करावीत. रुग्णावाहिका, फिरते शौचालये, आवश्यक पोलिस बंदोबस्त, ब्रॉडबॅंड सुविधा, पिण्याच्या पाण्याची सुविधा, विद्युत दिव्यांची सोय याबाबत संबंधित विभागाने नियोजन करावे,'' असे आदेश जिल्हाधिकारी देसाई यांनी दिले.
बैठकीला शिवाजी विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ. पी. टी. गायकवाड, पोलिस निरीक्षक सीताराम डुबल, शहर वाहतूक शाखेच्या पोलीस निरीक्षक स्नेहा गिरी, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पी. एन. देवकर, उपमुख्य अग्निशमन अधिकारी तानाजी कवाळे, पोलीस निरीक्षक शशिराज पाटोळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता अविनाश पोळ आदी उपस्थित होते.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.