आजवर सतत सरकारचे गुणगान करत आलेले कळंगुटमधील मायकल लोबो आता सरकारवर डाफरताना दिसत आहेत. त्या मागील कारणे काहीही असोत, पण राजकीय निरीक्षकांच्या मते सरकारने नगरनियोजन तथा जमीन रुपांतराशी संबंधित चार विधेयके मागे घेतल्यामुळे मायकल बाबांचे पित्त खवळले आहे. सरकारने ही विधेयके मागे घेतली त्या मागील खरे कारण आहे भाजपाची कोअर टीम. त्या टीममध्ये काही मायकलबाबांचा समावेश नाही, तसेच गत विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी केलेल्या पक्षत्यागापासून पक्ष त्यांच्यापासून अंतर राखून आहे. उत्तर गोवा ‘पीडीए’मधील कारभारही त्यांना महागात पडला आहे. कळंगूटमधील बांधकाम व व्यावसायिक आस्थापनांची अनेक प्रकरणे सध्या न्यायालयाच्या रोषास पात्र ठरली आहेत. तेही कारण लोबो यांच्या नाराजीचे कारण आहे. लोबो हे जरी अन्य अनेकांना घेऊन भाजपात दाखल झालेले असले तरी ते पक्षनेतृत्वाचा विश्वास पुन्हा प्राप्त करू शकलेले नाहीत, हे वास्तव आहे व त्यामुळेच मडगावच्या बाबाप्रमाणेच त्यांना मंत्रिमंडळातही पुन्हा स्थान मिळू शकलेले नाही, असे भाजपातील एक गट मानतो. तेच तर मायकलबाबांच्या रोषाचे कारण नसेल ना. ∙∙∙
मडगाव नगरपालिकेचे माजी मुख्याधिकारी गौरीश शंखवाळकर यांची तडकाफडकी बदली का करण्यात आली याचे गूढ अजूनही कायम असताना फातोर्ड्याचे आमदार सरदेसाई यांनी मात्र आज गौप्यस्फोट केला. सध्या नियुक्त केलेले मुख्याधिकारी अर्धवेळ असल्याने ते नगरपालिकेची अर्धीच कामे करतात. माजी मुख्याधिकाऱ्यांना म्हणे आके पॉवर हाऊस जवळील कोकणे रेल्वे स्टेशनवर जाण्याच्या रस्त्यावरील खाद्यपदार्थ गाड्यांच्या संख्येचा प्रश्न भोवला. एरव्ही तिथे केवळ १२ गाड्यांचीच व्यवस्था करण्यात आली होती. पण मडगावच्या आमदारांना तिथे २४ गाडे हवे आहेत, त्याला मुख्याधिकाऱ्यांचा विरोध होता. म्हणून मुख्याधिकाऱ्यांची बदली करण्यात आली. मडगावात जे मुख्याधिकारी असतात, तेव्हा त्यांच्यावर गॉडमनचा दबाव असतो, म्हणून सरकारी अधिकारी मडगाव पालिकेचे मुख्याधिकारीपदी यायला इच्छुक नसतात. आता हे अर्ध वेळ मुख्याधिकारी १२ ऐवजी २४ गाडेवाल्यांनी संमती तयार आहेत का? हे गाडे नेमके कोणासाठी? याबद्दलच चर्चा सध्या नागरिकांमध्ये सुरू झाली आहे. ∙∙∙
सध्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सरकारी कार्यालयांना भेटीचे सत्र अवलंबिले आहे. सरकारच्या कामावर सर्व स्तरातून टीका होत आहे. त्यात विधानसभेत विरोधकांनी सरकारला बॅकफूटवर नेले आहे. त्यामुळे सध्या मुख्यमंत्र्यांनी सरकारी कार्यालयांना भेटी देण्यास सुरुवात केली, ती निश्चित स्वागतार्ह बाब आहे. परंतु अशा भेटी अकस्मात घडायला हव्यात, तरच कार्यालयातील स्थिती काय आहे, कोण कामावर असतो, कोण सरकारी जावई बनलेत ते समजून येते. माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे अचानक कार्यालयास भेटी देण्यास माहीर होते. अशा भेटीवेळी ते पोलिसांचा ताफा अजिबात वापरत नसत. परंतु सध्या मुख्यमंत्री जेथे जाणार आहेत, त्यापूर्वी एक तास अगोदर पोलिसांचा ताफा तेथे जाऊन थांबतो, त्यामुळे सरकारी कार्यालयात नसणाऱ्या दांडीबहाद्दरांना कामावर येण्याची संधी मिळायला वाव आहे. त्यामुळे खरोखरच भेटी द्यायच्या असतील तर त्या गुप्त असायला हव्यात, नाहीतर पुष्पगुच्छ घेऊन उभे राहण्याची वेळ अधिकाऱ्यांवर येणार नाही. ∙∙∙
धारबांदोड्यातील डोंगर कापणीचा विषय ऐरणीवर आला आहे. केरळमधील वायनाडमध्ये अख्खा डोंगर खाली आल्याने गावेच्या गावे जमीनदोस्त झाली. सध्या गोव्यात जेथे जाईल, तिथे डोंगर कापणी सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच्या विधानसभेत डोंगर कापणी विषय चर्चेला आला होता, त्यावेळेला मुख्यमंत्र्यांनी डोंगर कापणीला तलाठ्याला जबाबदार धरले जाईल, असे सांगितले होते. आता धारबांदोड्यात अख्खा डोंगर कापला गेला आहे, त्यामुळे तलाठ्याच्या पायाखालची जमीन सरकली आहे. आता तर सरकारी अधिकाऱ्यांनी पाहणीही केली आहे, पाहुया काय होते ते...! ∙∙∙
मडगावचे स्वतःस युवा नेते म्हणविणाऱ्या काहींनी हल्लीच दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन शहरांतील वाहतूक व अन्य समस्या सोडविण्याची मागणी करणारे एक निवेदन सादर केले व प्रसारमाध्यमांनीही त्याला चांगलीच प्रसिध्दी दिली व त्यामुळे सर्वसामान्य मडगावकरांच्या भुवया मात्र उंचावल्या. कारण निवडणूक जवळ आली की, अनेकांना मडगावच्या समस्यांबाबत कळवळा येतो, असा आजवरचा अनुभव आहे. सर्वसामान्यांच्या म्हणण्याप्रमाणे बहुतेक सर्व समस्या या राजकीय इच्छाशक्तीच्या अभावांतून तयार झाल्या आहेत व त्या आजकालच्या नव्हेत तर तब्बल ऐशींच्या दशकापासून तशाच आहेत. येथे चांगले कर्तव्यदक्ष अधिकारी आले, पण राजकारण्यांनी त्यांना कधीच मुक्तहस्ते काम करू दिले नाही. त्यांतूनच मोतीडोंगर सारखी समस्या तयार झाली. गांधी मार्केटच्या , न्यू मार्केटच्या अवस्थेसही हेच नेते कारणीभूत आहेत. बैठकीत कठोर निर्णय घ्यायचे पण त्यांची कार्यवाही करायची वेळ आली की, अधिकाऱ्यांना सबुरीचा कानमंत्र वा सल्ला द्यायचा, हे सतत घडत आलेले आहे. जुना बसस्थानक मोकळा करावयाचा, बेकायदेशीर गाडे हटवावयाचे, असे अनेक अनुभव आहेत व म्हणून युवा नेत्यांनी दिलेले निवेदन किती गांभिर्याने घ्यावयाचे, अशी विचारणा मडगावांत होत आहे. ∙∙∙
पुढील सहा महिन्यात खाजन जमिनी पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न करणार, असे विधान मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले असले, तरी हे खरेच शक्य होणार याबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आहे. खाजन शेती जमिनीत नदीचे खारे पाणी शिरणार नाही, यासाठी प्रथम बांध दुरूस्त करावे लागतील. तिसवाडीत राज्यातील दोन मोठी खाजन असून येथे बिकट परिस्थिती आहे. कुंभारजुवे आणि सांतआंद्रेतील बांध कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत, तर तीन प्रमुख बांधांचे अस्तित्वच राहिलेले नाही. त्यांची पुनर्बांधणी होईल,मात्र येथील खाजन शेती पूर्ववत होणार नाही. त्यामुळे सरकारला खरेच खाजनाची चिंता असेल, तर त्यांनी पारंपरिक शेतकरी, पाळणी आणि खाजनाशी निगडित लोकांना घेऊन हे काम करावे लागेल, अशी मागणी होतेय. ∙∙∙
गोमंतक भंडारी समाजाचे अध्यक्ष अशोक नाईक यांच्या विरोधात सनग्रेस गार्डनमध्ये जाहीर स्नेहमेळावा घेतला गेला. तेव्हाच या साऱ्याचा बोलवता धनी उघड झाला आहे. समाजाचे प्रमुख आश्रयदाते म्हणून मंत्री रवी नाईक यांचा पक्ष कार्यालयातील फलकावरच उल्लेख आहे. त्यामुळे त्यांनी समाज संघटना अडचणीत असताना तेथे धाव घेणे योग्यच आहे. आता १० दिवसांची मुदत अशोक नाईक यांनी पाळली नाही, तर पुढे काय होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. नाईक यांनी सहकाऱ्यांच्या मागे जुन्या प्रकरणात पोलिस चौकशीचा ससेमिरा आता लागू शकतो, अशी चर्चा ऐकू येऊ लागली आहे. यामुळे भंडारी समाजाचे अध्यक्षपद येणाऱ्या काळात काटेरी मुकूट ठरण्याचीच चिन्हे आहेत. ∙∙∙
रोमी लिपीला मान्यता हवी यासाठी समर्थन करण्याचे ठराव सध्या गोव्यातील विविध ग्रामसभांत संमत होत आहेत. तिथं एकतेने लोक घोषणा देत आहेत, हे फोटो वृत्तपत्रात व सोशल मीडियात फिरत आहेत. रोमीनं अचानक तोंड वर काढलं आहे त्याला तोंड देणं देवनागरी कोंकणीवाद्यांना कठीणच जात आहे, असं चित्र दिसतं. कारण पुरस्कार व खुर्च्यांची आसक्ती यात सर्व म्हालगडे, बालगडे, युवागडे मश्गूल आहेत, जी शेक्सपियरीन शोकांतिका ठरावी. कोकणीच्या दोन्ही प्रमुख संस्थांना सध्या नेतृत्व नाही. रोमीचा राक्षस भविष्यात अक्राळविक्राळ, महाकाय रूप धारण करेल व त्याचे परिणाम विविध स्तरांवर काय होतील याची पर्वा देवनागरी लेखकांना नाही की आतून आदोगाशीरूपी कूटनीती चाललीय ते समजणं कठीण आहे बुवा! ∙∙∙
जेट पॅचरने राज्यातील रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजवण्यात आले. पणजी शहरात आणि परिसरातही रस्ते खड्डेमय झाले होते. त्यावर काही ठिकाणी पेव्हर ब्लॉक्स बसवण्याचा पर्याय शोधण्यात आला. मात्र, जेट पॅचरने खड्ड्यांवर चढवलेला मुलामा तकलादू निघाल्याने खड्डे पूर्ववत रुपात पहायला मिळाले, आणि खड्ड्यांवर सरकारने खर्चलेले पैसेही खड्ड्यातच गेल्याचे बोलले गेले, अगदी िवधानसभेतही यावर चर्चा झाली. पण वस्तुस्थिती पाहता खड्डे बुजवायला पूर्वी मुरुम वापरला जायचा तोच बरा होता, म्हणायची वेळ आली आहे. भाटले परिसरात जेट पॅचरने बुजवलेल्या खड्ड्यांतून खडी बाजूला उखडून पडल्याने नवे उंचवटे निर्माण झाल्याने नव्याने वेगळेच खड्डे तयार झाले आणि आधीचा मुरूमच बरा होता, म्हणायची वेळ आली. ! ∙∙∙
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.