Khari Kujbuj Dainik Gomantak
गोवा

खरी कुजबुज: लोबोंच्या दोरीउड्या...

Khari Kujbuj Political Satire: गोव्यात पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत ही मंडळी आपल्या मतदारसंघात काही भाजपला आघाडी मिळवून देऊ शकलेली नाहीत, ती महाराष्ट्रात काय दिवे लावणार ?

गोमन्तक डिजिटल टीम

लोबोंच्या दोरीउड्या...

सर्वसामान्य असो किंवा लोकप्रतिनिधी सोशल मीडियाचा पुरेपूर वापर करतात. यात कळंगुटचे आमदार मायकल लोबो हेही मागे नाहीत. ते सातत्याने आपल्या दिनक्रमातील काही व्हिडिओ व फिटनेस संबंधी रिल व व्हिडिओ टाकत असतात. नुकताच त्यांनी जीममध्ये व्यायाम करताना विशेषतः दोरीउड्या मारताना छोटासा व्हिडिओ टाकला आहे. या व्हिडिओला लोबोंनी कॅप्शन देखील टाकले आहे, ‘तंदुरुस्ती हा आरोग्याचा पाया आहे, त्यामुळे आपले आरोग्यासाठी दररोज एक तास व्यायामाला द्या’. आता लोबो हे राजकारणातील प्रभावी व्यक्तिमत्व. मुख्यमंत्र्यांनीही तशी कबुली दिली आहे. त्यामुळे लोबोंनी केलेल्या या आवाहनाला कळंगुटवासीय व त्यांचे चाहते प्रतिसाद देतील यात शंका नाही... ∙∙∙

‘आप’ने कसली आता कंबर

काँग्रेस आणि आम आदमी पार्टी यांच्‍यात लोकसभा निवडणुकीच्‍यावेळी जी युती झाली होती, ती येत्‍या विधानसभा निवडणुकीपर्यंत चालू रहाणार, असे यापूर्वी जाहीर करण्‍यात आले होते. मात्र त्‍यानंतर उत्तर गोव्‍यात मांडवी पुलाकडून आणि दक्षिण गाेव्‍यात बोरी पुलाखालून कित्‍येक पाणी वाहून गेले, असे म्‍हणावे लागेल. याचे कारण म्‍हणजे, नवी दिल्‍लीत नेतृत्‍व बदल झाल्‍यानंतर ‘आप’ने आता गोव्‍यातही कंबर कसण्‍याचे ठरविले आहे, असे वाटते. दोन दिवसांपूर्वी दक्षिण गोव्‍यात झालेल्‍या एका बैठकीत आम आदमी पक्षाने गोव्‍यातील चाळीसही मतदारसंघात आपले काम सुरू करावे, असा आदेश कार्यकर्त्‍यांना देण्‍यात आला. हा आदेश थेट दिल्‍लीहून आला आहे, असे यावेळी सांगण्‍यात आले. सुरुवातीला जिल्‍हा पंचायत निवडणुकीवर ‘आप’ लक्ष केंद्रीत करणार आहे. आणि त्‍यानंतर विधानसभेसाठी आपले नशीब अजमावणार, असे सांगण्‍यात येते. त्‍यामुळे गोव्‍यातील ‘इंडिया’ आघाडी आता संपल्‍यातच जमा, असे सांगितले जातेय. ∙∙∙

‘सनबर्न’ मंत्र्यांना धोक्याची घंटा

सनबर्नचे आयोजन थिवी मतदारसंघातील कामुर्लीत आयोजित करण्याबाबतच्या निर्णयावरून स्थानिक आमदार व मंत्री नीळकंठ हळर्णकर यांची गोची झाली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष व खासदार सदानंद तानावडे हे सुद्धा थिवी मतदारसंघातील नेते आणि माजी आमदार. त्यामुळे दक्षिण गोव्यातून हकालपट्टी केलेल्या सनबर्नला हे दोन्ही भाजप नेते कोणती भूमिका घेतात, याकडे लोकांचे लक्ष लागून आहे. मंत्री हळर्णकर यांनी या सनबर्नबाबत ठोस असे मत मांडलेले नाही. पक्षाचे ज्येष्ठ नेते तसेच सरकारने निर्णय घेत असल्यास त्यांचेही त्यापुढे काही चालणार नाही, हे त्यांना माहीत आहे. त्यांनी जर लोकांना घेऊन त्याला विरोध केला तर त्यांची खुर्ची गायब होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे त्यांनी सावधगिरीची भूमिका घेतली आहे. खासदार सदानंद तानावडे हे सुद्धा सध्या तरी काही भाष्य करत नाही. पुढील महिन्यात या सनबर्नला परवानगी द्यायची की नाही, यासंदर्भात कोमुनिदादची बैठक आहे. मंत्री हळर्णकर यांना खुर्ची टिकवून ठेवण्यासाठी या सनबर्नसंदर्भात त्यांच्या मतदारांचा जो निर्णय असेल त्यांच्या पाठिशी राहावे लागणार आहे. जर विरोध झाला तर मंत्र्यांना ती धोक्याची घंटा असेल. ∙∙∙

‘त्यांचे’ मार्गदर्शन काय कामाचे?

गोव्याशेजारच्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे ढोल वाजू लागले आहेत.अजून जरी निवडणुकीची घोषणा झालेली नसली तरी ती कधीही होऊ शकते. या निवडणुकीसाठी भाजपने गोव्यातील आपल्या नेत्यांकडे जबाबदारी सोपविली असून त्यात काही आमदारही आहेत व तेथे जाऊन तेथील भाजपावाल्यांना निवडणुकीबाबत मार्गदर्शन करू लागलेत व तत्परतेने त्याची छायाचित्रे गोव्यातील प्रसारमाध्यमांकडे पाठवून प्रसिध्दही करत आहेत. मात्र, त्याचा उलट परिणाम गोव्यात होऊन लोकांना चर्चेला एक विषय मिळू लागला आहे. कारण गोव्यात पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत ही मंडळी आपल्या मतदारसंघात काही भाजपला आघाडी मिळवून देऊ शकलेली नाहीत, ती महाराष्ट्रात काय दिवे लावणार ? अशी विचारणा त्यांचे समर्थकच करत आहेत. तिथे विरोधी पक्षांतील लोकांनी तसे प्रश्‍न केले म्हणून नवल नाही. अनेकांना केवळ अपघाताने तर काहींना विरोधी मतांची विभागणी झाल्याने विजय मिळाला होता, पण ही मंडळी आपण स्वबळावर निवडून आल्याच्या अविर्भावात त्या नंतर म्हणे वावरत आहेत, व म्हणून त्यांच्या महाराष्ट्रांतील मार्गदर्शनाबाबत प्रश्न उपस्थित करतात ते विरोधक नव्हे तर भाजपवालेच! ∙∙∙

फर्मान अन् ‘संकेत’

भाजपमध्ये काँग्रेसीवृत्तीच्या आमदार मंत्र्यांची खोगीरभरती झालेली आहे. अशात कुचंबणा होतेय ती, भाजप विचारांच्या मूळ कार्यकर्त्यांची. मात्र अशा कार्यकर्त्यांना आधार वाटतो संकेतरावांचा. ‘महालक्ष्मी’वर आलेल्यांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी त्यांची नेहमीच तळमळ असते. सत्तरी ते सांगे आणि पेडणे ते काणकोण अशा पूर्ण गोव्यातील भाजप कार्यकर्त्यांना ‘महालक्ष्मी’वर हमखास आधार वाटतो तो ‘संकेत’ रावांचा. मुख्यमंत्र्यांचा विश्वासू असा हा कार्यकर्ता. मंत्री, आमदारांना कार्यकर्ते आणि लोकांना भेटण्याचे काढलेले फर्मान हे याचेच ‘संकेत’ नाहीत ना? अशी चर्चा रंगू लागलीय. ∙∙∙

कलामंदिरात गोविंदरावांचा दणका!

कला संस्कृतीमंत्री गोविंद गावडे हे तसे दणकेबाज व्यक्तिमत्त्व. त्याचा प्रत्यय अनेकदा लोकांना आला आहे. आता हेच पहा, राजीव गांधी कलामंदिरात राज्यस्तरीय घुमट आरती स्पर्धा झाली. या स्पर्धेच्या बक्षीसवितरण कार्यक्रमावेळी काहींनी हुल्लडबाजी केली आणि कार्यक्रमाचा विचका करण्याचा प्रयत्न केला. पण गोविंद गावडे यांनी त्यांचा हा प्रकार साध्य होऊ दिला नाही. या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालिकेने थिएटरमध्ये गोंधळ घालणाऱ्यांना शांत करण्याचे आपल्यापरीने प्रयत्न केले, पण कुणी ऐकायच्या मनस्थितीत नव्हता. त्यामुळे शेवटी गोविंदरावांनी माईकचा ताबा घेतला आणि जरबेने सर्वांना हाक मारली. त्याबरोबर सगळे चिडिचूप. नंतरच्या भाषणात गोविंदरावांनी एकेकाला असे ठोकून काढले, की आवाजच बंद. शेवटी गोवा म्हणजे कला संस्कृतीचे माहेरघर आहे, आणि हे चित्र तुडवायचा प्रयत्न केला तर खबरदार, असे सुनावताच सगळेच हुल्लडबाज एकदम शांत. आवाज एकदम बंद, असा आहे,गोविंदरावांचा दणका! ∙∙∙

सांकवाळचा कचरा

कुठ्ठाळीचे आमदार आंतोन वाझ यांनी सांकवाळ कचरा प्रक्रिया प्रकल्पाची पाहणी केली. ‘गोमन्तक’ने याआधी या प्रकल्पाचे कसे बारा वाजले आहेत याचे वृत्त दिले होते. त्याची माहिती कोणीतही आमदारांपर्यंत पोचवली. आमदारांनी प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि गोवा कचरा व्यवस्थापन महामंडळाच्या अधिकाऱ्यांसोबत ही पाहणी केली. आमदारांनी स्थिती पाहिल्यावर ते चक्रावले. कचऱ्यातून घाण पाणी वाहत असल्याचे त्यांना दिसले. शिवाय कोणतीही प्रक्रिया केली जात नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी सर्वांना तंबी दिली. वाझ हे सध्या सत्ताधारी गोटात असल्यामुळे त्यांचा रुबाब कमी नाही. त्यांच्या या रुपामुळे अधिकारीही गोंधळले. अखेर काहीतरी कारण पुढे करून लवकरच ही व्यवस्था सुधारतो असे सांगत सुटका करून घेण्याची वेळ त्यांच्यावर आली. वाझ यांच्या या बदललेल्या रुपाची चर्चा मात्र सुरू झाली आहे. ∙∙∙

सरकारी मालमत्तेचे विद्रुपीकरण

नवीन बांधण्यात आलेले पूल, उड्डाणपुलांच्या खांबांवर जाहिराती किंवा पोस्टर लावल्यास कारवाई केली जाते, परंतु याची धास्ती कुणालाच नसल्याचे दिसते, कारण खुले सरकारी मालमत्तेचे विद्रुपीकरण करण्याचे काम केले जाते. अटल सेतूच्या जोडपुलाच्या खांबावर मेरशी जंक्शन जवळ ‘रिसॉर्ट’ आणि ‘हॉटेल फॉर सेल’ असे लिहिले आहे, बांबोळी येथे जोडपुलावर टॉवेलची जाहिरात कोरली गेल्याची दिसते. मुख्य म्हणजे सगळ्यांवर फोन क्रमांक दिले गेले असल्याने संबंधितांना ओळखून कारवाई करण्याची गरज आहे. सरकारी मालमत्तेचे विद्रुपीकरण करून आपला स्वार्थ साधणाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे. ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: पर्वरीत बर्निंग कारचा थरार; कार जळून खाक

Viral Video IFFI Goa: 'मिसेस'साठी सान्याची घाई तर, लापता लेडिजच्या नितांशिने चाहत्यांना केलं खूश; इफ्फीतले खास व्हिडिओ

Goa Opinion: बँका आवळतात गोव्यातील लघू उद्योगांचा गळा

Goa CM: 'एक है तो सेफ है' म्हणत गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी महायुतीला दिल्या भव्य विजयाच्या शुभेच्छा

IFFI 2024: दरवर्षी एका तरी महान गोमंतकीयांची आठवण ‘इफ्फी’त व्हायला हवी! दिग्दर्शक बोरकर यांचे रोखठोक मत जाणून घ्या..

SCROLL FOR NEXT