Khari Kujbuj Political Satire Dainik Gomantak
गोवा

खरी कुजबुज: मायकल लोबोंसाठी प्रार्थना

गोमन्तक डिजिटल टीम

मायकल लोबोंसाठी प्रार्थना

मंत्रिमंडळ फेररचना करावी लागणार असे खुद्द मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनीच सांगितले आहे. त्यामुळे कोणा कोणाला मंत्रिमंडळातून हटवणार आणि कोणाची वर्णी लागणार याविषयी राज्यभरात उत्सुकता आहे. जो तो आपापल्या परीने अंदाज व्यक्त करत आहे. यात कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांना पुन्हा मंत्रिमंडळात स्थान मिळणार का याविषयी चर्चा आहे. लोबो यांनी अलीकडेच ‘ऑल ईज नॉट वेल’चा जप करून भाजपच्या गोटात खळबळ उडवून दिली होती. प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनाही लोबो यांच्या घरी धाव घ्यावी लागली होती. लोबो यांना संधी मिळते की त्यांच्या पत्नी व शिवोलीच्या आमदार दिलायला यांना संधी मिळते हे लवकरच समजेल. लोबो यांच्यासाठी मी प्रत्येक देवाकडे प्रार्थना केली आहे असे सांगून नगरनियोजनमंत्री विश्वजीत राणे यांनी मात्र यातील रंगत वाढवली आहे. ∙∙∙

पाटकर यांचा सवाल

आसगाव परिसरातील ध्वनिप्रदूषणाचा मुद्दा गाजू लागला आहे. पर्यावरणमंत्री आलेक्स सिक्वेरा यांनी रात्री १० नंतर मोठ्याने संगीत वाजवले गेले तर कारवाईचा दिलेला इशारा हवेतच विरला गेला आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाने क्लब बंद करण्याचा आदेश बजावूनही त्याची योग्य अशी अंमलबजावणी होत असल्याचे खासदार विरियातो फर्नांडिस यांनी केलेल्या आंदोलनावेळी दिसून आले होते. आता कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी आसगाव परिसरात २७ क्लब हे बंदीचा आदेश असतानाही सुरू असल्याचा गौप्यस्फोट केला आहे. आसगाव प्रकरणावरून सत्ताधारी गोटात असलेली शांतता बरेच काही सांगून जात आहे. पाटकर यांनी सरळ आकडा सांगून याविषयीचा चेंडू सरकारच्या कोर्टात निश्चितपणे भिरकावला आहे असे जनतेला का वाटू नये? ∙∙∙

कुळेतील वार्ताहराची सतावणूक

डोंगर कापणीचे प्रामाणिकपणे वार्तांकन करणाऱ्या कुळेतील वार्ताहराला सरकारने चांगले बक्षीस दिले आहे. आता हे बक्षीस कशा स्वरूपाचे असेल याचा अंदाज वाचकांना नक्कीच आला असेल. या वार्ताहराची पत्नी गृहरक्षक म्हणून पोलिस खात्यात कुळे येथे काम करते. तिची तडकाफडकी मडगावला बदली करण्यात आली आहे. एकप्रकारे हा बदला घेण्याचाच सरकारचा प्रकार आहे. धारबांदोडा भागात डोंगर कापणी प्रकरणात अनेकांचे हात आहेत, त्यामुळेच ही तडकाफडकी बदली करून वार्ताहराला सतावण्याचा प्रयत्न सरकारने चालवला आहे. मात्र, इतर पत्रकार चवताळले असून त्यांचा पुढील निर्णय काय असेल ते मात्र अजून समजू शकले नाही. ∙∙∙

आरोप प्रत्यारोपांना अंत आहे का?

सध्या मडगावचे नगराध्यक्ष माजी मुख्याधिकाऱ्यांवर आरोपाच्या फैरी झडत आहेत. त्यामुळे या दोघांमधील संबंध किती ताणले होते याचा अंदाज येतो. माजी मुख्याधिकारीसुद्धा आपल्यापरीने त्यांच्या आरोपांचे खंडन करीत आहेत. माजी मुख्याधिकारीसुद्धा नगराध्यक्षांच्या अनेक भानगडी जाहीर करण्याच्या पवित्र्यात आहेत. शिवाय नगरपालिकेमधील सत्ताधारी गटातील काही नगरसेवकच नगराध्यक्षांच्या विरोधात आपसात बोलताना आढळत आहेत. नगराध्यक्षांची तक्रार मडगावच्या आमदारापर्यंत पोहोचल्याची चर्चा सध्या सुरू आहे. नगराध्यक्षाचे हातसुद्धा खोलात असल्याचे नगरपालिका परिसरात बोलले जात आहे. चित्रपटातील एक डायलॉग - ‘जिनके घर शिशे के होते है, वे दुसरों के घरों पर पत्थर फेका नहीं करते’ हे नगराध्यक्षांनी लक्षात ठेवण्याची गरज असल्याची चर्चा सुरू झाली आहे. ∙∙∙

नारळ काढायला गेला अन्...

माजी आमदार उदयबाब यांनी गोवा पोर्तुगीज अमलाखाली असताना तस्करी करणारेही स्वातंत्र्यसैनिक झाले असे विधान एका कार्यक्रमात बोलताना केले व सध्या त्यावर उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. काहीजणांनी तर ते ‘स्मगलर कोण?’ अशी विचारणाही सुरू केली आहे. अर्थात उदयबाब यांनी केलेले विधान सरसकट घेता येणार नाही, तसेच ते झटकूनही टाकता येणार नाही. कारण त्या काळात चोरमार्गाने सोने व अन्य काही वस्तूंचा व्यवहार चालत होता व तो करताना पकडले गेलेले काहीजण स्वातंत्र्यसैनिक बनले हेही खरे आहे, पण त्याला नेमका कोण कारणीभूत ही गोष्ट वेगळी आहे. कारण स्वातंत्र्यसैनिक संघटनेने दिलेल्या शिफारस पत्राशिवाय कोणी स्वातंत्र्यसैनिक बनत नव्हता हे लक्षात ठेवण्याची गरज आहे. दक्षिण गोव्यात तर कोणाचे तरी नारळ चोरायला माडावर चढलेल्या व्यक्तीला पोलिसांनी पकडले व तो म्हणे नंतर स्वातंत्र्यसैनिक बनला. तो कसा बनला याचीही वेगळीच कथा आहे, पण त्याचबरोबर स्वातंत्र्यसैनिक म्हणून मंजूर झालेले पेन्शन तसेच ताम्रपत्र न घेणारेही अनेकजण आहेत हेही खरे, पण त्यांचे कोणी नाव मात्र घेत नाही. ∙∙∙

वेळ का लागला?

गोमेकॉतील निवासी डॉक्टरांनी सुरक्षिततेसाठी उपाययोजनांच्या मागणीसाठी संप पुकारला. काहींना हा संप वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थिनीला न्याय देण्यासाठी होता असे वाटले. मंगळवारीही डॉक्टर कामावर परतले नाहीत तेव्हा ही गोष्ट वेगळी आहे हे सर्वांच्या लक्षात आले. मुळात या डॉक्‍टरांना आपल्या मागण्या आरोग्यमंत्र्यांपर्यंत पोचवण्यासाठी तीन दिवस का लागले हा खरा प्रश्न आहे. शनिवारी या डॉक्टरांनी आंदोलन केले. त्यानंतर सोमवारी व मंगळवारी आंदोलन केल्यामुळे बाह्यरुग्ण विभागासह इतर वैद्यकीय सेवाही प्रभावित झाल्या. सोमवारी सकाळी आरोग्यमंत्र्याशी चर्चा करून हा प्रश्न सोडवला गेला असता, तर मंगळवारी गोमेकॉतील वैद्यकीय सेवा सुरळीत झाल्या असत्या. मात्र, आरोग्यमंत्र्यांकडे पोचण्यासाठी एवढा वेळ का लागला याचे उत्तर कोणाकडे आहे का? ∙∙∙

वाहतूक खात्याचा अजब कारभार

रस्त्यांची स्थिती बिकट असून बहुतांश ठिकाणी वेगमर्यादेचे फलक चुकीच्या ठिकाणी लावल्याने वाहतूकदारांना त्रास होत आहे. हल्लीच एका ज्येष्ठ नागरिकाला अतिवेगाने वाहन चालवल्याच्या कारणास्तव वाहतूक पोलिसांनी एक हजार रुपयांचा दंड ठोठावला. ही व्यक्ती तिसवाडी वाहतूक कार्यालयात पोहोचल्यानंतर आरटीओ निरीक्षकाला चक्क पत्र देऊन बांबोळी येथे वेगमर्यादेचे फलक चुकीच्या ठिकाणी असून आपण वाहतूक कायद्याचे उल्लंघन केल्याचा युक्तिवाद केला. हे ऐकून पोलिस निरीक्षक थक्क झाला आणि जिल्हाधिकाऱ्याला पत्र लिहिण्याची सूचना केली. तेव्हा पुन्हा ते तुमचे काम असल्याचे ज्येष्ठ नागरिकाने सांगितल्यानंतर मूग गिळून गप्प बसण्याची पाळी त्या निरीक्षकावर आली, अशी चर्चा वाहतूक खात्यात ऐकू येत आहे. बांबोळी येथे चुकीच्या ठिकाणी सूचना फलक लावून वरून वाहतूक खाते दंड आकारते. त्यात नियमांचा अभ्यास असलेली एखादी व्यक्ती भेटल्यानंतर जिल्हाधिकारी किंवा पणजी स्मार्ट सिटी यांच्याकडे जाण्याची सूचना देण्यापलीकडे वाहतूक खात्याला आणखी काही येत नसल्याचे दिसते. ∙∙∙

रस्ता ठेकेदारांवर खरेच कारवाई होणार?

गत उन्हाळ्यात केलेल्या अन् पावसाळ्यात वाहून गेलेल्या रस्त्यांमुळे सर्व थरांतून तसेच विधानसभेतही सरकारवर कठोर टीका झाल्यावर दोतोर मुख्यमंत्र्यांनी हल्लीच साबांखातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन असे सर्व रस्ते त्या ठेकेदारांकडून दुरुस्त करून घेण्याची सूचना तर केलीच, शिवाय त्यात हयगय झाल्यास संबंधित अभियंत्यावर कारवाई केली जाईल असा म्हणे इशारा दिला. पण अनेकांनी हा इशारा हास्यास्पद असल्याचे म्हटले आहे. कारण अशी तरतूद संबंधित कामातच असते त्यात नवे काहीच नाही असे त्या क्षेत्रातील जाणकार सांगतात. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे असे सदोष काम केलेल्यांना ते रस्ते दुरुस्त केल्याशिवाय नवीन कामे देऊ नका असे जर मुख्यमंत्र्यांनी बजावले असते, तर त्यात काही अर्थ होता, पण तसे न करता दोतोरांनी नेहमीप्रमाणे फक्त इशारा तेवढा दिला. सर्वात महत्त्वाचे म्हणजे पणजीसह सर्व भागांतील रस्ते अशाप्रकारे खड्डेमय का झाले त्याचा शोध सरकारने घेण्याची गरज होती, पण त्या मुद्याला सरकारने वा अन्य कोणीच स्पर्श देखील का केला नाही असे हे जाणकार आता विचारू लागले आहेत. ∙∙∙

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

St Estevam Accident: 'सांतइस्तेव प्रकरण' पोहोचणार मंत्रालयात? नातेवाईकांचे देवालाही साकडे

Bhutani Infra: ‘मेगा प्रोजेक्ट’ चे अधिकार आता मुख्यमंत्र्यांकडे; 'भूतानी’ला भाजप सरकारचीच परवानगी असा काँग्रेसचा दावा

बॉलीवूड, टॉलीवूडचा प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक जानी मास्टरला गोव्यात अटक, सहकारी महिलेचा 6 वर्षापासून लैंगिक छळ केल्याचा आरोप

Ratnagiri Crime News: स्वप्नात दिसला मृतदेह, सिंधुदुर्गातील तरुण पोहोचला पोलीस ठाण्यात; तपासात उघड झाली धक्कादायक माहिती

तम्नार प्रकल्प रखडणार! कर्नाटकचे शेपूट वाकडेच, सिद्धरामय्यांनी कळसा-भांडुराचा मुद्दा केला उपस्थित

SCROLL FOR NEXT