Khari Kujbuj Political Satire Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: खरी कुजबुज; कॉंग्रेस आमदारांचे ‘पोस्ट लंच'' उपोषण

Khari Kujbuj Political Satire: प्रकल्‍प चिंबलमध्‍ये नकोच, असे म्‍हणत आरजीपीच्‍या नेत्‍यांनी सरकारविरोधात शड्डू ठोकला आहे. पक्षाचे अध्‍यक्ष मनोज परब यांच्‍यासह आमदार विरेश बोरकरही स्‍थानिकांसह मैदानात उतरले आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

कॉंग्रेस आमदारांचे ‘पोस्ट लंच'' उपोषण

अखिल भारतीय कॉंग्रेसच्या आदेशावरुन रविवारी देशभर वेगवेगळ्या राज्यातील प्रदेश कॉंग्रेस समितीने भाजप सरकारने ‘मनरेगा योजने‘चे नाव बदलले म्हणून मोदी सरकार विरोधात एक दिवसीय उपोषण केले. गोव्यात जुने गोवे येथे महात्मा गांधींच्या पुतळ्याकडे उत्तर गोवा जिल्हा समितीने उपोषणाचा कार्यक्रम आखला आणि प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे, सह-प्रभारी अंजलीताई निंबाळकर यांनी उपोषणात सहभाग घेतला. दक्षिण गोवा जिल्हा समितीने मडगावात लोहिया मैदानावर कॅप्टन विरीयातो फर्नांडिस, जिल्हाध्यक्ष सावियो डिसिल्वा यांच्या उपस्थितीत उपोषण केले. जुने गोवा येथे कॉंग्रेसचा एकही आमदार फिरकला नाही. मडगावात माजी अध्यक्ष गिरीश चोडणकर काहीवेळ बसून गेले. संध्याकाळी उशिरा जेव्हा माणिकराव व अंजलीताई मडगावात पोहचल्या त्यावेळी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव व केपेंचे आमदार एल्टन डिकॉस्ता हजर झाले. आता सामान्य कार्यकर्त्यांनी दिवसभर उपाशी रहावे व आमदारांनी मात्र ‘पोस्ट लंच'' उपोषण करावे, यावर कॉंग्रेस कार्यकर्त्यांमध्ये चर्चा रंगली होती.∙∙∙

फातोर्ड्यात कॉंग्रेसची ५० टक्के जागांची मागणी?

आगामी मडगाव नगरपालिका निवडणुकीत कॉंग्रेसने फातोर्डात ५० टक्के जागांची मागणी केल्याचे कळते. ज्या मतदारसंघात गोवा फॉरवर्डचे वर्चस्व आहे व त्यांच्याकडे ११ ही प्रभाग जिंकण्याची क्षमता आहे, अशा पक्षाकडून ५० टक्के जागा मागणे हे मूर्खपणाचे नाही का? असा प्रश्न राजकीय विश्लेषक विचारू लागले आहेत. कॉंग्रेसची ही मागणी गोवा फॉरवर्ड मान्य करणार नाही हे निश्चित. आता गोवा फॉरवर्ड मडगावमधील काही प्रभागांमध्ये आपले उमेदवार ठेवणार आहे. अशा परिस्थितीत कॉंग्रेसने त्यांना तसे न करता मडगावात कॉंग्रेसच्या उमेदवारांना पाठिंबा द्या असे सांगितले असते तर ते ठीक ठरले असते. जर कॉंग्रेसने आपल्या मागणीसाठी हट्ट धरला तर गोवा फॉरवर्ड व कॉंग्रेसमधील युतीला भगदाड पडेल हे निश्‍चित व भाजपचा पाडाव करण्याचा त्यांच्या उद्देशाला सुरूंग लावल्यासारखे होईल, अशी चर्चा आता रंगू लागली आहे. ∙∙∙

कोणाचा ‘इगो’ हर्ट आला?

पार्सेतील सातेरी भगवती कला सांस्कृतिक मंडळाने तुये येथे सांस्कृतिक ‘अभंग रिपोस्ट'' हा कार्यक्रम शनिवारी आयोजित केला होता, पण त्याला ना हरकत दाखला घेतला नसल्याने अग्निशामक दराने परवानगी दिली नसल्याने तो कार्यक्रम सरकारी खात्याने होऊ दिला नाही. कार्यक्रम सादर करणारे युवक आहेत आणि त्यांना अग्निशामक दलाचा दाखला आवश्यक असल्याचे सांगितल्यानंतर त्यांनी शुक्रवारी ऑनलाईन प्रक्रिया केली, पण शनिवार व रविवार सुटी असल्याने तो दाखला त्यांना मिळाला नाही. या मंडळाने त्या कार्यक्रमाची तिकीट विक्रीही केली होती, त्याशिवाय तो दाखला मिळवण्यासाठी त्या मुलांनी सर्व प्रयत्न केले, कोणाला भेटायचे ते भेटलेही पण दाखला काही मिळाला नाही. पण तो कार्यक्रम रितसर परवानगी घेऊन पुन्हा करू म्हणून युवकांनी जाहीर केले आहे. तो कार्यक्रम होईल म्हणून कोणाचा तरी ‘इगो’ हर्ट झाल्याची चर्चा पेडण्यात सुरू आहे. त्यामुळे एकीकडे हा भाग तर दुसरीकडे रविवारी सायंकाळी जागतिक मराठी संमेलनाच्या समारोपात मंत्री दिगंबर कामत यांनी गोव्यातील संस्कृतीविषयी सांगत असताना याच कार्यक्रमाविषयी आवर्जुन उल्लेख करीत कार्यक्रमाचे कोडकौतुक केले होते, हे इथे नमूद करावेच लागेल. ∙∙∙

‘आरजी’ला पैसे देतो कोण?

चिंबलमधील नियोजित युनिटी मॉल प्रकल्‍पाला सर्वाधिक विरोध रिव्‍हॉल्‍यूशनरी गोवन्‍स (आरजीपी) या पक्षाने केलेला आहे. हा प्रकल्‍प चिंबलमध्‍ये नकोच, असे म्‍हणत आरजीपीच्‍या नेत्‍यांनी सरकारविरोधात शड्डू ठोकला आहे. पक्षाचे अध्‍यक्ष मनोज परब यांच्‍यासह आमदार विरेश बोरकरही स्‍थानिकांसह मैदानात उतरले आहेत. त्‍यांच्‍याकडून होत असलेल्‍या तीव्र विरोधाची झळ बसल्‍यामुळे सांताक्रूजचे आमदार रुडॉल्‍फ फर्नांडिस यांनीही आता त्‍यांच्‍यावर आरोप करण्‍यास सुरुवात केलेली आहे. सरकारी प्रकल्‍पांना विरोध करण्‍यासाठी आरजीपीला कुणाकडून तरी पैसे मिळतात. त्‍यामुळेच ते अशा प्रकरणांत अग्रणी भूमिका घेत असल्‍याचे त्‍यांचे म्‍हणणे आहे. तसे याआधीही आरजीपी पैसे घेऊनच निवडणुका लढवत असल्‍याचा आरोप वारंवार होत आहे. त्‍यामुळे आरजीपीच्‍या नेत्‍यांना यासाठी नेमके पैसे देतो कोण? असा प्रश्‍‍न जनतेसमोर उभा आहे. ∙∙∙

निवडणुकीनंतरचे कवित्व

पश्चिम बंगालमधील तृणमूल कॉंग्रेसने गेल्या विधानसभा निवडणुकीत भाग घेतला. त्याचवेळी अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. ज्या सढळ हस्ते त्या पक्षाने खर्च केला होता त्यावरूनही अनेक चर्चा रंगल्या होत्या. त्या पक्षाला आपले खाते काही निवडणुकीत खोलता आले नाही. आता पक्ष केवळ दोन महिन्यांपूर्वी शेवटी झालेल्या पत्रकार परिषदेपुरता राहिलेला आहे. एकेक नेते सोडून गेले. आता त्या पक्षाशी सलग्न संस्थेने वापरलेल्या पैशाचा हिशेब घेणे ईडीने सुरू केले आहे आणि अनेकांच्या स्मृतींना उजाळा मिळाला. ∙∙∙

वरून ‘इंग्रजी’ आतून ‘मराठी’

जागतिक मराठी संमेलनाच्या निमित्ताने विविध सत्रांतून मराठीचा जागर कला अकादमीच्या व्यासपीठावर झाला. चित्र, शिल्प, काव्य या सत्रात ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर यांनी आपल्या मिश्‍कील शैलीत मुंबईतील मराठीजनांचा आपण किती पुढारलेले आणि इंग्राळलेले आहोत, हे दाखवणारा एक किस्सा सांगितला. दररोज काही तथाकथित पुढारलेले विकसित लोक रेल्वेतून प्रवास करताना वर इंग्रजी वर्तमानपत्र धरायचे आणि आतून मात्र, मराठी वर्तमानपत्र धरून वाचायचे, असा किस्सा सांगताच एकच हशा पिकला. मात्र,मराठी मागे पडायला हे मराठीजनांचे ढोंगही कारण ठरेल, हे अंतर्मुख करणारे नाही का? ∙∙∙

कॉपी मास्तर

प्राचीन काळात नव्हे. गोवा मुक्तीनंतर गोव्यात काही नाट्य दिग्दर्शक (मास्तर) होते, ते गावागावात जाऊन नाटकं बसवायचे. सध्याचा काळ प्रायोगिक नाटकांचा. स्मार्टफोनवर क्लीकसरशी हवी ती इंग्रजी नाटके, फिल्म मोफत मिळतात. ती कॉपी मारून ‘आधुनिक’ मास्तर आपल्या नांवाने नाटककार म्हणून मिरवतात. ही कॉपी पकडायला तितक्याच दमाचे परीक्षक हवे. वाचन असलेले. ते होत नाही म्हणून कॉपी मास्तरांचा दबदबा वाढलाय. कॉपी पकडण्यासाठी कला अकादमीने परीक्षकांसाठी ट्रेनिंग घ्यायला हवे. शेवटचं नाटक झाल्यावर लगेच दुसऱ्या दिवशी निकाल देण्याची घाई का? नाटकांची व्हिडीओग्राफी सक्तीने करायली हवी. ज्यानिशी कॉपी पकडणं सोपं जाईल. सांपडल्यावर कॉपी मास्तरावर कारवाई व संस्थेवरही तीन वर्षे बंदी घालायला हवी, तेव्हाच अयोग्य कृत्यांवर कडक चाप बसेल, कलेचा कलंक दूर होऊन पावित्र्य शाबूत राहील अशी बुजुर्ग रंगकर्मींची मागणी आहे. ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Winter Session: 'कुशावती' जिल्हा म्हणजे 'विकसित गोवा 2037' कडे टाकलेले मोठे पाऊल! राज्यपालांचे प्रतिपादन

Makar Sankranti 2026: मकरसंक्रांतीच्या गोडव्यावर महागाईचे सावट! साहित्याचे दर वाढले; वाण खरेदीसाठी बाजारात लगबग

Goa Assembly Session: गोव्यात 'स्मार्ट पोलिसिंग'वर भर; सायबर गुन्हे रोखण्यासाठी आता AI शस्त्राचा वापर

Goa Tourism: देशी, विदेशी पर्यटक वाढले! चार्टर विमानांच्या लँडिंगमध्ये वाढ; पर्यटन खात्‍याचा दावा

Abhang Repost: ‘रेव्‍ह पार्ट्या - ड्रग्स पार्ट्या सुरू, अभंगा’वर मात्र बंदी'! 'अभंग रिपोस्ट' रद्द केल्याने रसिक संतप्त Watch Video

SCROLL FOR NEXT