Local People Gomantak Digital Team
गोवा

Bauxite Mining : देवाच्या नावाचे विडंबन केल्याने नाकेरी-किटलमध्ये बाचाबाची

मामलेदारांची मध्यस्थी : बॉक्साईट खाणीला स्थानिकांचा विरोध

गोमन्तक डिजिटल टीम

Quepem News : नाकेरी-किटल येथे बॉक्साईट खाण सुरू करण्यासाठी बेतुल येथे घेतलेल्या जनसुनावणीवेळी लोकांनी या खाणीला तीव्र विरोध दर्शविला. यावेळी एका व्यक्तीने भूमिपुरुष देवाचा चुकीच्या पद्धतीने उच्चार केल्यामुळे दोन गटांत जोरदार बाचाबाची होऊन हे प्रकरण हातघाईवर आले. मात्र, मामलेदार प्रताप गावकर यांनी मध्यस्थी करून हे प्रकरण नियंत्रणात आणले.

बेतुल येथे प्रास्ताविक बॉक्साईट खाणीला कंपनीने भूमिपुरुष ऐवजी ‘...पुरुष’ असे नाव ठेवावे, असे आवाहन एका नागरिकाने केले असता लोक धावून व्यासपीठावर आले. त्यामुळे दोन गटांत जबरदस्त धक्काबुक्की झाली. यावेळी परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे पाहून पोलिस उपअधीक्षक संतोष देसाई, केपेचे मामलेदार प्रतापराव गावकर व इतर अधिकाऱ्यांनी धाव घेऊन परिस्थिती हाताळली. अन्यथा या जनसुनावणीला वेगळेच वळण लागले असते.

मे. भूमिपुरुष प्रा.लि.कडून नाकेरीच्या पठारावर बॉक्साईट खाण सुरू करण्यासाठी गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे प्रस्ताव दाखल केला आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी बेतुल येथे खास जनसुनावणी ठेवली होती. या जनसुनावणीत सुमारे पाचशे स्थानिक लोकांनी उपस्थिती लावली होती.

मात्र, या खाणीला लोकांचा सुरुवातीपासूनच विरोध असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवला होता. यावेळी पोलिस उपअधीक्षक संतोष देसाई, पोलिस निरीक्षक नेल्सन कुलासो, तुकाराम चव्हाण, मामलेदार प्रतापराव गावकर, मामलेदार मनोज कोरगावकर व इतर अधिकारी उपस्थित होते.

सकाळी ११ वाजता न्यायदंडाधिकारी एकना क्लेटास यांच्यासमोर सुनावणी सुरू झाली. सुरुवातीलाच लोकांनी या खाणीला जोरदार आक्षेप घेतला. कोणत्याही स्थितीत नाकेरी गावात खाणीला परवानगी देऊ नये, अशी मागणी त्यांनी केली. सुमारे चार तास ही सुनावणी सुरू होती. लोकांचा विरोध वाढत चालला होता.

अचानक चार्ल्स नामक एका व्यक्तीने व्यासपीठावर येऊन खाणीला विरोध दर्शवून भूमिपुरुष या नावाच्या जागी ‘...पुरुष’ असे नाव वापरा, असे वादग्रस्त वक्तव्य केले. त्याच्या या वक्तव्यामुळे लोक प्रचंड चिडले. व्यासपीठ सोडून खाली उतरा आणि जाहीर माफी मागा, अशी मागणी करत लोकांचा जमाव व्यासपीठाकडे धावून आला.

अचानक या घटनेमुळे प्रचंड तणाव निर्माण झाला. विराज देसाई यांनी त्यांना माफी मागण्याची सूचना केली. जमाव प्रक्षुब्ध झाल्याचे पाहून पोलिसही धावून आले. मामलेदार प्रतापराव गावकर यांनीही तेथे धाव घेऊन वादावर नियंत्रण आणले. यावेळी दोन गटांमध्ये धक्काबुक्की झाली. मात्र, पोलिस उपअधीक्षक संतोष देसाई यांनी मध्यस्थी केल्याने संघर्ष टळला.

यावेळी अशोक नाईक, वीरेंद्र देसाई यांनी भूमिपुरुष देवाचे नाव खाण कंपनीने वापरल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. माजी सरपंच कृष्णा सावंत देसाईं यांनी मात्र खाणीचे समर्थन करताना, खाणीला विरोध करणारे या गावचे नाहीत, असा आरोप केला. लंडनमध्ये नोकरी करणाऱ्या लोकांचे गावचे काहीच पडून गेलेले नाही, असे ते म्हणाले.

जलस्रोत नष्ट होण्याची भीती

केपेचे आमदार एल्टन डिकॉस्ता म्हणाले की, ही खाण सुरू झाल्यास स्थानिकांना त्रास होणार आहे. गावातील पाण्याचा स्रोत नष्ट होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली. या खाणीसाठी दररोज 15 हजार लिटर पाणी लागणार आहे ते कोठून आणणार, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. काही माजी लोकप्रतिनिधी रस्त्यांच्या डांबरीकरणास आमंत्रण न देताही उपस्थित राहातात; पण जनसुनावणीस अनुपस्थित राहतात. यावरून त्यांना लोकांचे काहीच पडलेले नाही हे सिद्ध होते, असे ते म्हणाले.

श्र्वेतपत्रिका काढा!

किटल येथील सोनल देसाई यांनी या खाणीमुळे यापूर्वी गावातील किती लोकांना फायदा झाला, असा प्रश्न उपस्थित केला. खाण वाहतूक सुरू झाल्यास बाळ्ळी येथे वाहतूक कोंडी होईल, असे ते म्हणाले. देवाच्या नावाचे विडंबन केल्याबद्दल नाकेरी येथील मारियो फर्नांडिस यांनी तीव्र आक्षेप नोंदवला. घाणेरडे राजकारण करण्यासाठी आराध्य दैवताच्या नावाचा वापर करू नका, असेही ते म्हणाले. या खाणीबद्दल लोकांनी केलेल्या मागणीची श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणी त्यांनी केली.

...तर पाठिंबाही देऊ

या भागात चार मंदिरे आहेत. खाणीतील ब्लास्टींगमुळे त्या देवळांना तडे जाणार आहेत. यापूर्वी खाणीच्या ब्लास्टींगमुळे गावातील घरांना तडे गेले होते. या जागेवर पूर्वी डिफेन्स एक्स्पो झाला होता आणि त्याला आम्ही पाठिंबा दिला होता. चांगले प्रकल्प आल्यास पाठिंबा देऊ, असेही ते म्हणाले.

येथील रस्ता अरुंद असल्याने त्यावरून खाण वाहतूक शक्य नाही. बाळळी येथे असलेला पूलसुद्धा लहानच आहे. त्यातून एक ट्रकही सुटू शकत नाही. गोसालिया यांनी पिढ्यान पिढ्यांपासून हा गाव लुटून खाल्ला आहे.

गोविंद फळदेसाई, सरपंच.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

SCROLL FOR NEXT