सासष्टी: मायणा येथील सर्वेक्षण क्र. ४६५/१३ मधील बांधकाम प्रकल्पाचे काम बंद करण्याचा आदेश कुडतरी पंचायतीने दिला होता. या आदेशाला संबंधित बांधकाम व्यावसायिकाने पंचायत संचालनालयात आव्हान दिले होते. त्यावर दक्षिण गोवा पंचायत संचालनालय अतिरिक्त संचालकांनी १० सप्टेंबर रोजी बांधकाम सुरू करण्यास परवानगी दिली. या निर्णयाच्या निषेधार्थ मायणा येथील नागरिकांनी कुडतरी पंचायतीवर मोर्चा काढला.
नागरिकांनी सरपंच मिलाग्रेस रॉड्रिगीस यांना निवेदन सादर केले. यापूर्वी सर्वेक्षण क्र. ४६१/१-बी मधील बांधकाम प्रकल्पालाही पर्यावरण आणि साधनसुविधांमधील त्रुटींमुळे पंचायतीने काम बंद करण्याचा आदेश दिला होता. या प्रकरणातही परिस्थिती समान असताना पंचायत संचालनालयाने बांधकाम सुरू करण्यास परवानगी कशी दिली, असा प्रश्न नागरिकांनी निवेदनातून उपस्थित केला आहे.
काँग्रेस नेते मोरेनो रिबेलो यांनी या प्रकरणात स्थानिक आमदाराची भूमिका काय, असा प्रश्न उपस्थित केला. नागरिक जुआंव रिबेलो यांनी सरपंच व पंचसदस्यांचा नागरिकांना पाठिंबा नसल्याचा आरोप केला. तसेच पंचायत सचिव योग्य प्रकारे वागत नसल्याची तक्रार केली.
नागरिकांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर सरपंच रॉड्रिगीस यांनी यासंदर्भात योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.
बेकायदा बांधकामांना विरोध कायम : रेजिनाल्ड
स्थानिक आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी या प्रकरणात काहीजण राजकारण करत असल्याचा आरोप केला. कुडतरी मतदारसंघातील बेकायदा बांधकामांना आपला विरोध असल्याचे आपण वेळोवेळी स्पष्ट केले आहे. यापूर्वीचा एक बांधकाम प्रकल्प आपल्या सांगण्यावरूनच बंद करण्यात आला होता; मात्र त्याचे श्रेय काही जण घेण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा दावाही त्यांनी केला.
पंचायतीने न्यायालयात जावे, खर्च देण्याची आमदारांची तयारी
नागरिक आणि शेतकऱ्यांच्या विरोधात आपण नाही. पंचायत क्षेत्रात बेकायदा तसेच पर्यावरणाला बाधा आणणाऱ्या बांधकाम प्रकल्पांना परवानगी देऊ नये असे आपण सरपंचांना सांगितले आहे. या बांधकामाविरोधात पंचायतीने न्यायालयात जावे, असेही आपण सांगितले असून त्यासाठी येणारा खर्च देण्याची तयारी दाखविली असल्याचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.