Jnanpith Award  Dainik Gomantak
गोवा

Jnanpith Award 2023: मावजो यांना ‘ज्ञानपीठ’ प्रदान, राज्यपालांच्या हस्ते करण्यात आला बहुमान

मावजाे यांच्या साहित्‍यात स्थानिक समाजाचा इतिहास : गुलजार

गोमन्तक डिजिटल टीम

Jnanpith Award 2023 दामोदर मावजो यांनी आपल्या लेखनातून गोव्यातील ख्रिस्ती आणि सर्वसामान्यांचा इतिहास लिहिला. समाजाचा आत्मस्वर प्रकट करण्याचे श्रेय त्यांना जाते, अशा शब्दांत प्रसिद्ध गीतकार गुलजार यांनी आज, शनिवारी ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान सोहळ्यात गोमंतकीय साहित्यकाराचा गौरव केला.

राजभवनच्या दरबार हॉलमध्ये मावजाे यांना ‘ज्ञानपीठ’ प्रदान करण्याचा दिमाखदार सोहळा राज्यपाल पी.एस. श्रीधरन पिल्लई, कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे, ज्ञानपीठाचे संयोजक व पुरस्कार समितीच्या प्रमुख प्रतिभा राय यांच्या उपस्थितीत पार पडला.

यावेळी गुलजार म्हणाले की, हिंदी चित्रपटांमधून गोमंतकीय ख्रिस्ती माणसाचे आत्मचित्रण होते; परंतु या छोट्या समाजाचे अंतरंग मावजो यांनी प्रभावीपणे जगासमोर मांडले.

मावजो येथील लोक, समाज, भाषा व गोव्यावर उत्कट प्रेम करतात आणि भरभरून बोलतात. देशात आपली भाषा व प्रदेशावर एवढे भरभरून प्रेम करणारा साहित्यिक मी अभावानेच पाहिला आहे.

धर्म आणि राजकारणापेक्षाही भाषा अधिक प्रभावी असते. त्यामुळे अनेक देश घडले आहेत, असे सांगून राज्यपाल पिल्लई यांनी बांगला देश व युक्रेनचे उदाहरण दिले.

कोकणीचा प्रसार करण्यासाठी गोवा विद्यापीठ लवकरच केरळ व मंगळूर येथे कोकणी अध्ययन केंद्र सुरू करणार आहे, अशी माहिती राज्यपालांनी दिली.

कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी आपल्या भाषणात अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार करताना टीकाकार हा आपला शेजारी असणे नेहमीच चांगले, असे सांगितले.

प्रारंभी ‘ज्ञानपीठ’चे अध्यक्ष वीरेंद्र जैन यांनी स्वागत केले, दिलीप प्रभुदेसाई यांनी मानपत्राचे वाचन केले, तर पुनित जैन यांनी आभार मानले. अनंत अग्नी यांनी सूत्रसंचालन केले.

मावजोंकडे विचार मांडण्याचे सामर्थ्य

ज्ञानपीठ पुरस्कार निवड समितीच्या अध्यक्षा प्रतिभा राय यांनी मावजो यांचा गौरव करताना ते स्त्रीवादी आहेत, त्यांच्या साहित्यात लैंगिक भागही निडरपणे आल्याचे सांगितले.

आपल्या विचारधारा विलक्षण ताकदीने समाजापुढे मांडण्याचे सामर्थ्य मावजो यांनी दाखविले, असे सांगून त्या म्हणाल्या, भारत हा बहुभाषिक देश आहे व आपल्याकडे साहित्य हे माणसा-माणसांना जोडते; परंतु राजकारण व धर्म माणसांमध्ये फूट पाडतो!

मावजो यांनी ज्ञानपीठ स्वीकारल्यानंतर केलेल्या भाषणात कोकणी भाषेत माझ्या संवेदना पोहोचविण्याचे सामर्थ्य आहे, असे उद्‍गार काढले. गोव्यात साहित्यिकांना लिहिण्यासारखे अनेक विषय आहेत. येथील संस्कृती, निसर्ग, डोंगर-दऱ्या, तलाव, म्हादई नदी, इतिहास धुंडाळूनही अनेक विषय अभ्यासण्यासारखे आहेत.

असे सांगून त्यांनी गोवा मुक्तीसाठी नेहरूंनी जे मेक्सिकन नेते ऑक्टावियो पाझ यांचे मदत घेतली होती. त्यांनी त्यांचा उल्लेख केला. पाझ हे मेक्सिकाेचे भारतातील राजदूत होते व स्वतः कवी होते. गोवा सरकारने अशा ज्ञात-अज्ञात व्यक्तींची माहिती-दस्तऐवज उजेडात आणावा, असे आवाहन त्यांनी केले.

कोकणी भाषेबद्दलचे आपले प्रेम व्यक्त करताना मावजो यांनी या भाषेने पोर्तुगीज काळात सोसलेली बंदी व गोवा मुक्तीनंतरही आपल्याच सरकारकडून होत असलेल्या अवहेलनेचा उल्लेख केला.

ते म्हणाले, कोकणी भाषिक लोकांना परागंदा व्हावे लागले; परंतु एडवर्ड ब्रुनो डिसोझा, शणैं गोंयबाब आदींनी परिश्रमपूर्वक या भाषेला तिचे गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी कष्ट सोसले.

अनेकांनी बलिदान दिले. परंतु आता कोकणी भाषेत सकस साहित्य तयार होते, तरुण लोक लिहितात व सकस लिहिले तर तरुणांमध्येही ते वाचले जाते. भाषा आणि साहित्याचा प्रसार होण्यासाठी आम्ही सर्वांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा प्राणपणाने पुरस्कार केला पाहिजे.

माझ्यावर शरदचंद्र चट्टोपाध्याय तसेच चार्ल्स डिकन्स यांचा प्रभाव असल्याचा सांगून मावजो म्हणाले, सर्वसामान्य व गरिबांचे दुःख व त्यांच्या वेदना साहित्यांतून लोकांपर्यंत पोहोचविण्याचे महान कार्य साहित्यिक करतात. लोकांचे जीवन साहित्यात येत राहील, तेव्हाच त्यांना उभारी मिळेल व असे साहित्य वाचले जाईल.

समाजातील विसंगती टिपतो तो साहित्यिक

ज्ञानपीठ पुरस्कार लाभल्याचा मला सर्वप्रथम फोन आला. तेव्हा मी कोकणीतील माझे ‘जाग’ मासिक वाचत होतो. क्षणभर माझा विश्‍वासच बसेना. तेव्हा मी टीव्हीवर बातम्या लावल्या. एका बाजूला नागालॅण्डमध्ये सैनिकांकडून निरपराध आदिवासींचे हत्याकांड झाले, त्याच्या बातम्या सुरू होत्या.

दुसऱ्या वाहिनीवर युक्रेन युद्धाबाबत अमेरिकी नेते बोलत होते. जपानच्या बंदरावर झालेल्या हल्ल्यासंदर्भात आणखी एके ठिकाणी चर्चा सुरू होती. मानवी जीवन अशा विभिन्न भावभावना व मानवी कल्लोळांनी भरले होते.

त्यामुळे माझे मन पुरस्कार मिळूनही विषण्ण झाले होते. परंतु लेखन म्हणजे याच भावना असतात. समाजातील याच विसंगती टिपतो तो साहित्यिक. मावजो यांनी आपल्या भाषणात त्यांचे एकेकाळचे साहित्यिक गुरू रवींद्र केळेकर यांचे नाव घेतले.

माधवी सरदेसाईंचीही आपल्याला आठवण येते, असे ते म्हणाले. आपल्यापूर्वी बाकीबाब बोरकर आणि मनोहर सरदेसाई यांचा ज्ञानपीठाने गौरव व्हायला हवा होता, असे सांगून गोव्याचे सुपुत्र, लेखक, चित्रकार, गायिका, तियात्रिस्त अशा अनेकांचा त्यांनी कृतज्ञतापूर्वक उल्लेख केला.

मातृभाषेमुळेच मावजोंचा गौरव

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा संदेश यावेळी सहक्षेपित करण्यात आला. त्यात त्यांनी मातृभाषेतून लिहिण्याचे महत्त्व विषद केले. मातृभाषेत लिहिल्यानेच मावजो यांचा राष्ट्रीय पातळीवर गौरव झाला.

नव्या शैक्षणिक धोरणात मातृभाषेवर भर दिला असून त्यासाठी शैक्षणिक साहित्य तयार करण्याचे काम वेगाने सुरू आहे, असे त्यांनी सांगितले.

भाषेच्या समृद्धीसाठी मावजो झटले

हा साहित्यकार केवळ साहित्य प्रसवत नाही, तर तो भाषा घडविताे, भाषेच्या समृद्धीसाठी, तिच्या मान्यतेसाठी लढतो, . त्यामुळे ज्ञानपीठाने त्यांना गौरविणे अत्यंत उचित आहे.

पोर्तुगिजांचे खूप मोठे जुलूम कोकणीने सोसले आहेत. अशा साहित्यकाराचा गौरव करण्यासाठी ‘ज्ञानपीठ’ गोव्यात आले, असे ज्येष्ठ गीतकार गुलजार म्हणाले.

मावजो गोव्याचे चार्ल्स डिकन्स

राज्यपाल पिल्लई यांनी, मावजो हे गोव्याचे चार्ल्स डिकन्स आहेत. डिकन्स यांनी आपल्या साहित्यात ज्याप्रकारे अनाथांवर लिहिले, तशीच दृष्टी मावजो यांनी ‘कार्मेलीन’ लिहिताना बाळगली असल्याचे मत मांडले. ‘ज्ञानपीठ’ लहान-मोठ्या भाषांमध्ये भेद करीत नाही. साहित्यात भेदाभेद असू नये.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: सरकारी नोकरी घोटाळ्यात भाजपचे नेते गुंतलेत; अमित पालेकरांचा हल्लाबोल!

Goa Post Office: गोव्यात पोस्टाची सेवा ठप्प! देशभरातील इंटरनेट सेवेत बिघाड; बॅंकिंग सेवेला मोठा फटका

Bhutani Project: ‘त्‍या’ तिघांना अटक करा! सांकवाळच्या तीस महिलांसोबत कुतिन्हो यांची मागणी

Goa News: गोव्यात भूरूपांतरासाठी अनेक प्रस्ताव! 1 लाख 18 हजार 756 चौरस मीटर जमीनीवर लक्ष; 'नगर नियोजन'ने मागवले आक्षेप

Sattari Crime: वाळपईतील व्यावसायिकाला 'स्टॉक एक्स्चेंज'च्या व्याजाचे आमिष दाखवून एक कोटींचा गंडा! बंगळूरू येथील संशयितास अटक

SCROLL FOR NEXT