Margao : मडगाव येथील जलतरण तलाव 20 एप्रिलपर्यंत सज्ज होणे आवश्यक होते, पण काम लांबले, ते आता 30 पर्यंत पूर्ण होईल, अशी माहिती क्रीडामंत्री गोविंद गावडे यांनी सोमवारी दिली. क्रीडा खात्याचे अधिकारी मंगळवारी या प्रकल्पाच्या कामाची पाहणी करणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.
क्रीडामंत्री गावडे मडगाव येथे म्हणाले, ‘‘मडगावचा जलतरण तलाव 20 एप्रिलपर्यंत पूर्ण करावा असे कंत्राटदाराला सांगण्यात आले होते. आमदार दिगंबर कामत यांच्यासमक्ष कंत्राटदाराला ही मुदत दिली होती. आता पंप फिल्ट्रेशन, तसेच टाईलिंगचे काम पूर्णत्वाच्या दिशेने असून येत्या 30 एप्रिलपर्यंत जलतरण तलाव पूर्ण होईल.’’
आतापर्यंत जलतरण तलावासाठी 54 लाख रुपयांच्या कामाचे आदेश देण्यात आले आहेत. गोवा जलतरण संघटनेचे अध्यक्ष आमदार दिगंबर कामत यांनीही यासंदर्भात काही सूचना केल्या आहेत. क्रीडा अधिकारी पाहणी केल्यानंतर अतिरिक्त खर्च किती येईल हे स्पष्ट होणार असल्याचे क्रीडामंत्री गावडे यांनी नमूद केले.
जलतरण तलाव व रवीन्द्र भवन मडगावच्या उपाहारगृहाचे कंत्राट बचत गटांना देण्यात येईल अशी माहितीही क्रीडामंत्री गावडे यांनी दिली. गोव्यातील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन ही मोठी जबाबदारी आहे.
दर पंधरा दिवसानंतर कामाचा आढावा घेण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले. फातोर्डा येथील क्रिकेट मैदानाच्या सराव खेळपट्ट्यांचे काम पावसाळ्यानंतर पूर्ण होईल, असे स्पष्ट करून खेळपट्ट्यावर लोक फिरणार नाहीत यासाठी खास उपाययोजना करण्याचे त्यांनी सूतोवाच केले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.