In Goa Cashew Production Declined: सत्तरी तालुक्यात सध्या एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच काजू उत्पादन कमी मिळत आहे. त्यामुळे ऐन काजू हंगामामध्येच बोंडू मिळणे कमी झाल्याने काजू बागायतदार वर्ग आर्थिक संकटात सापडला आहे.
एरव्ही रामनवमी किंवा हनुमान जन्मोत्सव या काळात काजू बोंडूंना दरवर्षी मोठा बहर आलेला असतो. काजू बागायतदार वर्ग सकाळ, सायंकाळ बागायतीत बोंडू गोळा करण्याच्या कामात अगदी व्यस्त असतात.
पण यावर्षी मात्र एप्रिल महिन्यातच काजू बोंडू मिळण्याचे प्रमाण घटले आहे. सत्तरी तालुक्यात अनेक गावांत ही स्थिती आहे. नगरगाव पंचायत भागातील धावे, तार, तसेच सोनाळ, उस्ते, धावे वरचा वाडा, आंबेडे आदी गावांत सध्या काजू बोंडू मिळण्याचे प्रमाण कमी झाले आहे.
काजू बियांना अत्यंत कमी दर...
यावर्षी काजू बियांना दोनशे रुपये प्रतिकिलो दर मिळणे आवश्यक होते. पण दराची सुरुवातच 123 रुपयांनी होऊन ती आता 115 रु.पर्यंत पोहोचलेली आहे.
त्यातच लहान काजू बियांना 106 रु. असा सध्याचा दर आहे. यावर्षी मोठ्या व लहान काजू बिया अशी प्रतवारी केल्याने बागायतदारांना नुकसानीची झळ बसली आहे.
काजू कलमांना नोव्हेंबरमध्येच फुलधारणा होऊन साधारण जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात उत्पादन सुरू होते. पण ज्यांनी गावठी रोपांपासून काजूची लागवड केलेली आहे.
अशांना साधारण मार्चमध्ये बहर येतो व ती मेपर्यंत तग धरून राहतात. काजू रोपांचे उत्पन्न कमी मिळत असले तरीही ते एप्रिल शेवटपर्यंत मिळते.
विश्वनाथ गावस, कृषी अधिकारी वाळपई
काजूचा दर 123 रुपये प्रति किलो वरून 115 रुपये खाली खाली घसरला आहे. तसेच सध्या काजू उत्पन्नदेखील अचानक खाली आले आहे. अनेक कुटुंबे आज गोव्यात काजूच्या नगदी पिकावर अवलंबून आहेत. त्यामुळे गोवा सरकारने काजूला 200 रुपये प्रतिकिलो आधारभूत किंमत दिली पाहिजे.
- ॲड. शिवाजी देसाई, ब्रह्मकरमळी
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.