सासष्टी: गेल्या मे महिन्यांपासून दुरुस्तीसाठी बंद असलेले मडगावच्या रवींद्र भवनातील पाय तियात्रिस्त हे मुख्य सभागृह तसेच ब्लॅक बॉक्सची दुरुस्ती पूर्ण झाली असून लोकार्पणासाठी सज्ज झाले आहे.
या दोन्ही सभागृहांचे उद्घाटन बुधवार ५ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते केले जाणार आहे. या प्रसंगी सार्वजनिक बांधकाम मंत्री दिगंबर कामत, कला व संस्कृती मंत्री रमेश तवडकर हे उपस्थित राहणार आहेत. संध्याकाळी ६ वाजता रंगभूमी दिनाचे औचित्य साधून पुणे येथील कॉलेज क्रिएशन्सचे आनंदमठ हे अत्यंत गाजलेल्या नाटकाचा प्रयोग होणार आहे.
तत्पूर्वी मडगाव, फातोर्डा, नावेली परिसरात २० संस्था, ज्या ८१ प्रशिक्षकांमार्फत २८३९ विद्यार्थ्यांना संगीत, वादन, नृत्य व इतर कलेचे प्रशिक्षण देत आहेत, त्याची माहिती देणारी पुस्तिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे, ही सर्व माहिती रवींद्र भवन मडगावचे अध्यक्ष राजेंद्र तालक व उपाध्यक्ष मनोहर बोरकर यांनी दिली.
कला व संस्कृती मंत्री रमेश तवडकर यांनी सांगितले की, मडगावच्या रवींद्र भवनला सांस्कृतिक दृष्ट्या पुष्कळ महत्त्व आहे. हे भवन उभारल्यास बरीच वर्षे झाली व त्याच्या नूतनीकरणाची गरज होती. सरकारने या कामाला प्राधान्य देऊन काम वेळेत पूर्ण केले आहे. आपण सर्व कामाची पाहणी केली असून आपण समाधानी असल्याचे त्यांनी सांगितले.
ध्वनी व्यवस्था सिनेमा प्रदर्शन नजरेसमोर ठेवून क्षमता वाढविण्यात आली आहे. शिवाय वीज प्रवाह बंद झाला तरी रंगमंचावरील कार्यक्रम बंद होणार नाही यासाठी खास युपीएसची व्यवस्था करण्यात आली आहे, असे तालक यांनी सांगितले. इफ्फीतील चित्रपट प्रदर्शन या सभागृहात होणार असून त्या संदर्भातील तयारी सुद्धा समांतर चालू आहे अशी माहिती राजेंद्र तालक यांनी दिली.
राजेंद्र तालक यांनी सांगितले की, खुर्च्या, कार्पेट, सभागृहातील पायऱ्यांवरील तसेच पथदीप नवे बसवले आहेत. सभागृह व ब्लॅक बॉक्सची दुरुस्ती करताना त्याची मूळ रचना तशीच ठेवली आहे. दुरुस्तीसाठी खर्च भरपूर झाला आहे. तरी भाडे शुल्क वाढवले नव्हते. मात्र एप्रिल १ पासून शुल्कात वाढ करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.