दाबोळी: वास्को (Vasco) येथील मासळी मार्केटातील (Fish Market) विक्रेत्यांचे सर्वेक्षण मुरगाव पालिकेने सुरू केले आहे. मात्र, विक्रेत्यांकडून योग्य सहकार्य करण्यात येत नसल्याने मुरगाव पालिका निरीक्षक व इतर कर्मचारी वैतागले आहेत.सर्वेक्षण करण्यासाठी गेलेल्या पालिका निरीक्षक व इतरांना घेराव घालून काही मासे विकेत्यांनी वाद घातला. त्यामुळे सदर सर्वेक्षण कसे करावे, असा प्रश्न संबंधितांना पडला आहे.
याप्रकरणी मुरगाव पालिकेच्या मुख्याधिकाऱ्याने लक्ष घालण्याची गरज आहे. सर्वेक्षण (Survey) झाले नाही तर मासे मार्केट बांधकामाला अडचण येण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. मुरगाव पालिकातर्फे मासळी मार्केटच्या बैठ्या इमारतीच्या जागी नवीन सुसज्ज इमारत बांधण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यासाठी पालिकेने सुडाकडे संबंधित रक्कम वर्ग केली आहे.
मासळी मार्केटातील विक्रेत्यांना देव दामोदर ट्रस्टच्या जागेवर हलविण्यात येणार आहे. तेथे शेड उभारणीचे काम पूर्ण झाले असून इतर कामे लवकरच पूर्ण होणार आहेत. त्या विक्रेत्यांना मार्केटातून देव दामोदर ट्रस्टच्या जागेवर हलविण्यापूर्वी तेथे किती मासळी विक्रेते आहेत. मासे कापणाऱ्या व्यक्ती किती आहेत.फळ, भाजी विक्रेते किती आहेत यासंबंधी सर्वेक्षण करण्यात येत आहे.मात्र, बऱ्याच मासळी विक्रेत्यांकडून योग्य सहकार्य मिळत नसल्याचे दिसून येते आहे. जे माहिती देण्याचा प्रयत्न करतात त्यांनी माहिती देऊ नये यासाठी दबाब आणण्यात येत आहे.
त्यामुळे कोणत्या आधारे सर्वेक्षण करावे, असा प्रश्न संबंधितांना पडला आहे. या मासळी विक्रेत्यांनी आम्ही आमच्या अध्यक्ष किंवा कायदा सल्लागार (Legal advisor)फा. मायकल यांच्याकडे चर्चा केल्यावरच पुढील निर्णय घेणार असल्याचे सर्वेक्षण करणाऱ्यांना सांगितले. त्यामुळे सर्वेक्षण पूर्ण करता आले नाही. याप्रकरणी मासळी विक्रेत्यांना विश्वासात घेऊन योग्य तोडगा काढण्याची गरज आहे. नाही तर मासळी मार्केट बांधकामाला पुन्हा अडथळा येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.