Lok Sabha Election|Digambar Kamat Dainik Gomantak
गोवा

Margao News : मडगावात कामतांच्या वर्चस्वाला धक्का; भरवशाच्या भागाने दिला दगा

गोमन्तक डिजिटल टीम

Margao News :

सासष्टी, मडगावचे आमदार दिगंबर कामत हे दक्षिण गोव्यातील व खास करून मडगावमधील ‘हेवीवेट’ राजकारणी आहेत. मात्र लोकसभा निवडणूक निकालावरून कामत यांच्या, विशेषतः मडगावातील या वर्चस्वाला धक्का बसल्याचे दिसून येत आहे.

गेल्या तीस वर्षांत कामत ज्या मोती डोंगर व आझाद नगरी सारख्या झोपडपट्टीतील मतावर अवलंबून होते, त्या भागातही ते भाजपला आघाडी मिळवून देऊ शकले नाहीत, हे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.

दक्षिण गोव्यात भाजपच्या उमेदवार पल्लवी धेंपे २५ हजारांपेक्षा जास्त मताधिक्याने निवडून येतील,असे भाकीत कामत यांनी केले होते. भाजपचे नाणे खणखणीत असल्याने ‘भिवपाची गरज ना’असेही त्यांचे म्हणणे होते. मात्र, धेंपे यांचा १४,७०३ मतांनी पराभव झाला व मडगावातही सुरवातीला दहा हजार, नंतर पाच हजार पेक्षा जास्त मतांची आघाडी मिळेल, असे जे त्यांनी भाकीत केले होते, ते फोल ठरले. मडगावात भाजपला केवळ १,३२३ मतांचीच आघाडी मिळणे शक्य झाले.

मडगाव मतदारसंघात भाजपची सात ते साडेसात हजार मते आहेत हे यापूर्वीच्या सर्व निवडणुकांमधून दिसून आलेले आहे. दिगंबर कामत यांना सरासरी १२ ते १३ हजार मते पडतात. आता कामत यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने मडगावात कमीत कमी १५ ते १८ हजार मतांची अपेक्षा होती.

पण भाजपला केवळ ११,४७४ मते मिळाली व कॉंग्रेसची मडगावात ४ ते ५ हजार मते आहेत, त्या कॉंग्रेसच्या उमेदवाराला १०,१५१ मते पडली. याचा अर्थ कामतांची पाच ते सहा हजार मते कॉंग्रेसला मिळाली.

बूथ क्रमांक २, ६ व ७ या मोती डोंगरावरील बूथवर धेंपेंना केवळ ८४१, तर कॅप्टनला १२०८ म्हणजे कॉंग्रेसला जवळ जवळ ४०० मतांची आघाडी मिळाली. चिंचाळ कोलमोरोड या भागात जे १७,१८ व १९ बूथ आहेत तिथे भाजपला ७७१ तर कॉंग्रेसला ७७८ मते मिळाली. या भागातही कामत आघाडी मिळवू शकले नाहीत. आझाद नगरी, राजेंद्र स्टेडियम , कालकोंडा येथील १४ बुथावर २६५ची आघाडी भाजपला मिळाली. पण १५, १६ बूथवर १५० मतांची आघाडी कॉंग्रेसने घेतली. खारेबांद शिरवडे या भागातील चार बूथवरही भाजप ७०० मतांनी पिछाडीवर गेला.

खारेबांद मारूती मंदीर भागातही जवळ जवळ २२ मतांनी भाजप पिछाडीवर गेला. तिथे कामत यांचे निवासस्थान आहे, त्या मशीद रोडवरील बूथ क्रमांक ३४ वर भाजपला १६३ व कॉंग्रेसला १८१ मते पडली. मडगावात ३९ व ४० हे नवे बूथ यावेळी तयार करण्यात आले होते. त्यातील रावणफोंड जवळील बूथ क्र. ४० मध्ये भाजपला १७३ तर कॉंग्रेसला ४८३ मते पडली. ही आकडेवारी पाहता स्थिती अशीच राहिली तर कामत यांच्या वर्चस्वाला धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

फातोर्ड्यातही २४३७ ने पडला भाजप मागे

कामत यांच्या आके येथील पाच बूथवर त्यांना ७०६ मतांची, मालभाट, विशांत जवळील दोन बूथवर २४९ मतांची, कोंबवाडा येथील २७,२८, २९ या बूथवर ४१५ मतांची तसेच सिने लता, गांधी मार्केट व परिसरातील मिळून ५ बूथमध्ये जवळ जवळ ५०० मतांची, मालभाट येथील तीन बूथवर ३१२ मतांची आघाडी मिळवून कामत यांना तारले.

शिवाय मडगावात ‘नोटा’साठी २२५ मतदारांनी आपली पसंती दिली आहे. कामत हे फातोर्ड्यातही प्रचार करीत होते. या पूर्वीच्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपला थोडी तरी आघाडी मिळत असे. मात्र, या वेळी भाजप २४३७ मतांनी मागे पडला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Marine Projects: ..गोव्यात अखेर '23 प्रकल्‍पांची' मान्यता रद्द! रोजगार तसेच कोटींच्‍या गुंतवणुकीवर पाणी

Rashi Bhavishya 18 October 2024: उत्तम द्रव्यलाभ होईल, व्यावसायिकांसाठी आजचा दिवस आशादायी

Ponda: बहिणीने धाडस केले पण भाऊ बचावला नाही; 17 तासानंतर आढळला दर्शन नार्वेकरचा मृतदेह

मेरशीत एक महिन्यापासून उभ्या जीपमध्ये आढळला मृतदेह, परिसरात खळबळ; गोव्यातील ठळक बातम्या

Goa Belgaum Highway: गोवा-बेळगाव महामार्गावरील वाहतूक ठप्प, दोन्ही बाजूला 4-5 किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा

SCROLL FOR NEXT