सासष्टी: मडगावात ११६ व्या दिंडी उत्सवाला गुरुवारी सुरवात झाली. यंदापासून दिंडी उत्सवाला राज्य महोत्सवाची मान्यता मिळाल्याने उत्सव ४ नोव्हेंबरपर्यंत उत्साहाने साजरा करण्याची सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे.
गुरुवारी श्रीहरी मंदिर देवस्थानातून सार्वजनिक बांधकाम मंत्री दिगंबर कामत यांच्या हस्ते समई प्रज्वलनाने दिंडी उत्सवाचा शुभारंभ झाला. यावेळी नावेलीचे आमदार उल्हास तुयेकर, भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, देवस्थान समितीचे पदाधिकारी व भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मडगावमधील दिंडी उत्सवाची महती सर्व गोमंतकीयांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे, असे मंत्री दिगंबर कामत यांनी यावेळी सांगितले. दिंडीला राज्य महोत्सवाची मान्यता मिळाली त्याचा फायदा मडगावसह फातोर्डा, झालेली परिसरातील लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आमचा प्रयत्न आहे, असे त्यांनी सांगितले.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी सांगितले की, दिंडीची परंपरा मडगावकरांनी जपली. गुरुवारी सकाळी श्रीहरी मंदिरात श्रींची विधिवत षोडशोपचार महापूजा व इतर धार्मिक कार्यक्रम झाले. धनवंततरी अनुष्ठान धार्मिक विधीतील खास आकर्षण होते.
संध्याकाळी केजी ते सातवी विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. उद्घाटन सोहळ्यानंतर चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांहस्ते बक्षिसे प्रदान करण्यात आली. त्यानंतर पुणे येथील ह.भ.प. संदीपबुवा मांडके यांच्या सुश्राव्य कीर्तनाचा लाभ उपस्थित भाविक व भक्तगणांनी घेतला.
दरम्यान, जिल्हाधिकारी एगना क्लिटस (आयएएस), पोलिस अधीक्षक तिकम सिंग वर्मा (आयपीएस), उपजिल्हाधिकारी, मामलतदार व इतर अधिकाऱ्यांसमवेत मडगाव शहरातील कोंब येथील श्री विठ्ठल मंदिर परिसर तसेच मालभाटातील श्रीहरी मंदिर देवस्थान परिसराची पाहणी केली व तयारीचा आढावा घेतला.
सतत पडत असलेल्या पावसामुळे दिंडी उत्सवातील दोन कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची घोषणा आज करण्यात आली. शुक्रवारचा ३१ ऑक्टोबर रोजीचा आकेतील ओंकार च्यारी व प्रथमेश लघाटे यांचा सांगीतिक कार्यक्रम तसेच १ नोव्हेंबर रोजीचा बोर्डातील अभंग रिपोस्ट हे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.
गत १८ वर्षांपासून दामबाबाले घोडे ही संस्था मडगावातील दिंडी उत्सवानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करीत आहे. संस्थेचे पदाधिकारी दिलीप नाईक, सुजय लोटलीकर, बाबल नाईक व संदेश गावकर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ३ रोजी दिंडी पथक स्पर्धेला श्री हरी मंदिराकडून संध्याकाळी ५ वाजता सुरवात होईल. स्टेट बॅंक ऑफ इंडिया समोर वर्षपद्धती प्रमाणे दामबाब चौकाची निर्मिती करण्यात येणार आहे.
ही दिंडी पथके या चौकापर्यंत येऊन तिथे रिंगण सादर करतील, आकाश कंदील व फळे-भाजी कोरणे स्पर्धा दामबाब चौकात होईल. या स्पर्धा संध्याकाळी ६ वाजल्यापासून सुरू होतील. उद्घाटन सोहळ्यास मंत्री दिगंबर कामत. भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक उपस्थित राहणार आहेत. बक्षिस वितरणाला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, पर्यटन मंत्री रोहन खंवटे, आमदार उल्हास तुयेकर व इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.