Marathi rajbhasha nirdhar samiti  Dainik Gomantak
गोवा

Marathi Language: 'ज्योतीचे वणव्यात रूपांतर करू'! मराठी राजभाषेसाठी वज्रनिर्धार; हजारो मराठीप्रेमींनी घेतली शपथ

Marathi rajbhasha nirdhar samiti: गोव्यात मराठी ही मुक्तीपूर्व काळापासून अस्तित्वात आहे. तरीसुद्धा मराठीला राजभाषा करा म्हणून आंदोलन करावे लागणे ही लाजिरवाणी गोष्ट असल्‍याचे ढवळीकर यांनी सांगितले.

Sameer Panditrao

पणजी: मराठीला राजभाषेचा दर्जा मिळाल्‍याशिवाय आता आम्‍ही गप्‍प बसणार नाही. त्‍यासाठी आम्‍हाला मराठीचे राजकीय उपद्रव्यमूल्य वाढवावे लागेल. प्रत्येक तालुक्यात मराठीची मतपेढी तयार करावी लागेल. आमच्‍या हातात फक्त दोन वर्षे आहेत. ज्योतीचे वणव्यात रूपांतर करून विजयी होऊ, असा निर्धार मराठी राजभाषा निर्धार समितीचे निमंत्रक प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी शेकडो मराठीप्रेमींच्‍या उपस्‍थितीत केला.

येथील इन्‍स्‍टिट्यूट मिनेझिस ब्रागांझा संस्‍थेच्‍या सभागृहात मराठी राजभाषा निर्धार समितीने आयोजित केलेल्या निर्धार सभेत वेलिंगकर बोलत होते. व्यासपीठावर गोपाळ ढवळीकर, गुरुदास सावळ, प्रदीप घाडी आमोणकर, नेहा उपाध्ये, प्रा. गजानन मांद्रेकर,

डॉ. अनुजा जोशी, प्रा. पौर्णिमा केरकर, प्रकाश भगत, देविदास आमोणकर, तुषार टोपले, गोविंद देव, नितीन फळदेसाई, प्रा. आत्माराम गावकर, मच्छिंद्र च्यारी व अन्‍य मराठीप्रेमी उपस्थित होते. या सभेला गोव्‍याच्‍या कानाकोपऱ्यांतून हजारो मराठीप्रेमींनी उपस्थिती लावली.

हा लढा कोकणीच्या, सरकारच्‍या विरोधात नाही तर अभिजात मराठीच्या मूलभूत हक्कासाठी आहे. हजारो वर्षांचा इतिहास लाभलेल्या मराठीवरील अन्यायाविरोधात आहे. अन्यायाविरोधात लढणे हा प्रत्येकाचा जन्मसिद्ध अधिकार आहे. सरकारच्या अकर्मण्य नीतीमुळे निष्पाप जनतेला रस्त्यावर उतरावे लागत आहे. याला सरकारची अनास्था आणि वास्तवापासून पलायन जबाबदार आहे. आता तरी सरकारने सामंजस्य, विवेकबुद्धी व दूरदृष्टीने मराठीवरील अन्याय दूर करायला हवा, असेही वेलिंगकर म्‍हणाले.

‘आयएमबी’चे सभागृह भरले खचाखच

मराठी राजभाषा निर्धार समितीने दिलेल्या हाकेला साद देत राज्यातील कानाकोपऱ्यांतून हजारो मराठीप्रेमी राजधानीत एकवटले. इन्‍स्‍टिट्यूट मिनेझिस ब्रागांझा संस्‍थेचे सभागृह पूर्ण भरले होते.

बाहेरही मोठ्या संख्‍येने मराठीप्रेमी उपस्‍थित होते. गोव्याच्या संस्कृतीचा अविभाज्य घटक असणाऱ्या मराठीला गोव्यात राजभाषेचा दर्जा देण्यात यावा, अशी मागणी ते करत होते.

आता सहनशीलता संपली : गो. रा. ढवळीकर

गोव्यात मराठी ही मुक्तीपूर्व काळापासून अस्तित्वात आहे. तरीसुद्धा मराठीला राजभाषा करा म्हणून आंदोलन करावे लागणे ही लाजिरवाणी गोष्ट असल्‍याचे गो. रा. ढवळीकर यांनी सांगितले. माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी मराठीला राजभाषेचा दर्जा देण्याचे आश्‍‍वासन दिले, परंतु त्यांनी तसे केले नाही. विद्यमान मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हेसुद्धा मराठीला डावलत आहेत. त्यामुळे आता सहनशीलता संपली आहे, असेही ते म्‍हणाले.

मराठीप्रेमी शपथबद्ध

मराठी राजभाषा निर्धार मेळाव्यास उपस्थित असलेल्‍या मायमराठीच्‍या शिलेदारांनी मराठीसाठी शपथ घेतली. ‘‘ज्या मराठी भाषेने आम्हाला संस्कारांचे आणि राष्ट्रप्रेमाचे बाळकडू पाजले, आमचे जीवन समृद्ध आणि अर्थपूर्ण बनवले, त्या मराठीची गळचेपी आणि तिचा होणारा अपमान भविष्यात कदापि सहन करणार नाही. आमच्या आईसमान असलेल्या मराठीवर ज्या-ज्या वेळी अन्याय होईल, त्या-त्या वेळी आम्ही सारे त्या अन्यायाविरोधात एकजुटीने उभे ठाकू. आम्ही अशीही प्रतिज्ञा करतो की, ज्या मराठी भाषेला गोव्यात हजारो वर्षांची उज्ज्वल परंपरा आहे आणि जी जगातील एक समृद्ध भाषा गणली जाते, त्या अभिजात मराठीला गोव्यात राजभाषेचा दर्जा प्राप्त करून घेतल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही’’ अशी शपथ मराठीप्रेमींना यावेळी देण्यात आली

संख्याबळ वाढविण्यावर भर

विधानसभा निवडणूक दोन वर्षांवर आली आहे. त्‍यामुळे मराठीप्रेमींना आता पेटून काम करावयाचे आहे. संपूर्ण मराठी समाजाला एकत्र आणायचे आहे, जेणेकरून निवडणुकीपूर्वी मराठी राजभाषा झालीच पाहिजे. यासाठी मराठीचे राजकीय उपद्रव्यमूल्य वाढवावे लागेल. लोकशाहीत गुणवत्तेला नव्हे तर संख्याबळाला नमस्कार केला जातो. त्यामुळे प्रत्येक तालुक्यात मराठीची मतपेढी तयार करावी लागेल, असे प्रा. वेलिंगकर यांनी सांगितले.

मराठी-कोकणी एकत्र नांदाव्यात

मराठी आणि कोकणीच्या वादात इंग्रजीचा लाभ होत आहे. भाषा ही संवादाचे माध्यम आहे, परंतु सध्या वादच सरू आहेत. त्याचा गोमंतकीय सामाजिक स्वास्‍थ्‍यावर विपरीत परिणाम होत आहे. कोकणीला राजभाषेचा दर्जा आहे. त्यासोबतच आता मराठीलाही राजभाषेचा दर्जा देण्यात यावा. यामुळे कोकणीचे नुकसान होणार नाही, परंतु दोन्ही भाषा हातात हात घालून नांदतील व त्याचा लाभ दोन्ही भाषांना होईल, असे प्रा. गजानन मांद्रेकर म्‍हणाले. तर, रोमी कोकणीला पाठिंबा देणे म्हणजे राष्ट्रीयतेशी तडजोड करणे होईल, असे मत प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी व्यक्त केले.

युवा कीर्तनकार नेहाने टोचले कान

आजच्या पिढीचे भाषेसंबंधीचे ज्ञान हे ‘एक ना धड भाराभर चिंध्या’ असे आहे. याचे कारण पालक. कारण त्यांना वाटते की आम्ही मराठीत शिकलो म्हणून काही करू शकलो नाही.

अशा मानसिकतेमुळे ते आपल्या मुलांना कॉन्‍व्‍हेंटमध्ये पाठवतात, असे मत युवा कीर्तनकार नेहा उपाध्ये यांनी व्यक्त केले.

आंदोलनाची रूपरेषा

१पुढील तीन महिन्यांत राज्यातील मराठीप्रेमींना एकत्र आणून तालुकावार बैठका घेणार.

२तालुकावार मराठी मतपेढी तयार करून सरकारला दखल घेण्‍यास भाग पाडणे.

३ राज भाषेसंदर्भात व्यापक जागृती करणार

४मराठीप्रेमींचे राज्यस्तरीय विशाल संमेलन घेणे.

५२०२७च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी मराठीला राजभाषा करण्यासाठी सर्वतोपरी कार्य करणे.

सरकारला इशारा

मराठीप्रेमी राजकीय उपद्रव्यमूल्य वाढवणार

न्‍याय मिळेपर्यंत आता लढा सुरूच ठेवणार

पुढील दोन वर्षांत ज्‍योतीचे वणव्‍यात रूपांतर

मराठींप्रेमींचा सरकारला निर्वाणीचा इशारा

मागील ४० वर्षांपासून मराठीला राजभाषेचा दर्जा मिळावा यासाठी अनेकांनी खस्ता खाल्या. संघर्ष करत मराठीचे कार्य सुरू ठेवले. आता समझोता नाही...तडजोड नाही... बलिदान देऊ, परंतु अंती मराठीला राजभाषेचा दर्जा मिळवून विजयीच होऊ.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

World Cup 2025: टीम इंडियासाठी 'करो या मरो'चा सामना, उपांत्य फेरी गाठण्यासाठी 'विजय' आवश्यक; इंग्लंडविरुद्ध 'अशी' असेल Playing 11

Goa Diwali Bazar: पणजी, दिवचल भरला दिवाळी बाजार...

Pakistan-Afghanistan War: "पाकिस्तान क्रिकेट को बर्बाद करना चाहता है…" माजी अफगाण कर्णधाराची शत्रू देशावर टीका

राजधानीत नरकासुराचा 'हाहाकार', दिवाळीची तयारी जोरदार ; Watch Video

जब तक सूरज - चांद रहेगा तब तक पर्रीकर- रवि तुम्हारा नाम रहेगा! मागोवा

SCROLL FOR NEXT