राज्यात जी-20 परिषदेची पहिली बैठक पुढील आठवड्यापासून सुरू होणार असल्याने सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक भागांत पोलिसांनी गेल्या दोन दिवसांपासून प्रतिबंधक कारवाईखाली गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या 68 गुंडांसह 760 जणांची धरपकड केली. तसेच 681 परप्रांतीय भाडेकरूंचीही पडताळणी केली.
दरम्यान गोवा पोलिसांनी ही मोहीम आजही सुरु ठेवली. यावेळी म्हापसा पोलिसांनी वेर्ला, काणका व पर्रा या परिसरात कोम्बिंग ऑपरेशन राबवत भाड्याने राहाणाऱ्यांची पडताळणी केली.
यावेळी म्हापसा पोलिसांनी कोणताही ओळखीचा पुरावा नसल्याबद्दल 30 पेक्षा अधिक बिगर गोमंतकीय रहिवाशांना ताब्यात घेत सीआरपीसी कायद्यान्वे अटक करण्यात आली. भाडेकरूंची माहिती पोलिस स्थानकात न दिल्याप्रकरणी खोली मालकाविरुद्धही कारवाई केली जाणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.
‘जी-20’ परिषदेच्या कालावधीत राज्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी योग्य ती दक्षता घेतली जात आहे. सुरक्षा चोखपणे बजावण्यासाठी पोलिस स्थानकाच्या प्रमुखांना सक्रिय करण्यात आले आहे. उत्तर गोवा पोलिस अधीक्षक निधीन वाल्सन हे स्वतः रात्रीच्यावेळी किनारपट्टी भागात पोलिस फौजफाटा घेऊन गस्त घालण्याचे काम करत आहेत.
किनारपट्टी भागात समाजकंटकांच्या हालचालींवर नजर व देखरेख ठेवण्यात येत आहे. ज्या समाजकंटकांची पोलिस स्थानकात ‘हिस्ट्रीशिटर’ म्हणून नोंद आहे, त्यांना बोलावून ताकीद देण्याची प्रक्रिया सुरू आहे.
दरम्यान जी-20 परिषदेच्या पार्श्वभूमीवर कोलवाळ पोलिसांनी गुरुवारी सकाळी मुशीरवाडा परिसरात कोम्बिंग ऑपरेशन राबवत भाड्याने राहाणाऱ्यांची पडताळणी केली. यावेळी 101 जणांना पोलिसांनी ताब्यात घेऊन स्थानकावर आणले. त्यातील 39 जणांकडे आवश्यक कागदपत्रे नव्हती.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.