Mapusa Municipality Dainik Gomantak
गोवा

म्हापसा पालिकेकडून स्वत:च्याच ठरावाची पायमल्ली!

गांधी चौकात शिगमोत्सवाचे पुतळे उभारले

दैनिक गोमन्तक

गोवा: राष्ट्रीय पतीके असलेल्या हुतात्मा चौक, गांधी चौक इत्यादी स्मारकांच्या आवारात कोणतेही अन्य ध्वज अथवा बॅनर्स, पुतळे इत्यादी लावून विद्रूपीकरण करू नये, अशा आशयाचा ठराव यापूर्वी म्हापसा पालिकेने संमत केलेला होता, परंतु यंदा गांधी चौकात कुणीतरी शिगमोत्सवाचे पुतळे उभारलेच. सामाजिक कार्यकर्त्यांनी ही बाब पालिकेच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर मुख्याधिकाऱ्यांनी पर्यटन खात्याच्या अधिकाऱ्यांशी पाठपुरावा केला असता कुणीही त्यांना प्रतिसाद दिला नाही.

स्थानिक आमदार ज्योशुआ डिसोझा यांच्या सूचनेनुसारच तिथे ते पुतळे उभारण्यात आले व पालिका मंडळावरील सत्ताधारी गट त्याबाबत मूग गिळून गप्प बसल्याचा सध्या म्हापशात बोलबाला आहे. भाजपचे पदाधिकारी असलेले संदीप फळारी नगरसेवकपदी असताना त्यांनी तो ठराव पालिका बैठकीत मांडला होता. मात्र, त्यांनीसुद्धा याबाबतीत सध्या मौन व्रत धारण केले. गांधी चौकात अशा स्वरूपाचे विद्रूपीकरण होत असतानाही काँग्रेस पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनीही त्याविरोधात कोणतेही वक्तव्य न केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

कार्यकर्त्यांच्या आशेला धुमारे

आमदार दिगंबर कामत हे भाजप प्रवेशाच्या तयारीत असल्याचे वक्तव्य भाजप प्रवक्ते उरफान मुल्ला यांनी केल्याने कामत यांच्या कार्यकर्त्यांमध्ये चलबिचल सुरू झाली आहे. ते कुठेही जाऊ दे, पण आमचे सरकारी काम होऊ दे अशी चर्चा गुपचूपपणे रंगली आहे. काही कार्यकर्ते गुपचूपपणे एकमेकांना फोन करून विचारतही आहेत ते म्हणजे ‘खरेच कामत भाजपमध्ये जाणार का?’ यातील काहींना कामत यांनी निवडणुकीपूर्वी आपला पक्ष सत्तेवर आल्यास सरकारी नोकरी मिळवून देणार असे आश्वासन दिले होते. भाजप सत्तेवर आल्यानंतर त्यांच्या आशेवर पाणी फिरले होते. आता या चर्चेने पुन्हा त्यांना उकळ्या फुटल्या आहेत एव्हढे खरे.∙∙∙

मगो परत सत्तेत पावन

विधानसभेच्या 2017 निवडणुकीत मगोने भाजप सरकारला पाठिंबा दिल्याने भाजपचे सरकार बनले होते. मात्र, मध्यावरच मगोच्या दोन्ही आमदारांना भाजपने आपल्यात सामावून घेऊन मगोला म्हणजेच सुदिन ढवळीकर यांना सत्तेबाहेरचा रस्ता दाखवला होता. त्यानंतर ढवळीकर यांनी आपण भाजपसोबत कधीच जाणार नाही आणि त्यांच्यासोबत जाणे म्हणजे आत्महत्या करण्यासारखे आहे असे वारंवार वक्तव्य केले होते. मात्र, आता परत सत्ता स्थापनेच्यावेळी मगोने भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला आहे. त्यानंतर भाजपच्या नेत्यांनीही त्यांना पावन करून घेत मंत्रिमंडळात सामावून घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मगो आता कितव्यांदा आत्महत्या करणार? हा प्रश्न लोकांमधून विचारला जात आहे.∙∙∙

डॉक्टरांचा डोस सर्वांवर भारी

विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला काठावरचे बहुमत मिळाल्यानंतर अपक्षानी मदतीचा हात दिल्याने भाजप बहुमत मिळवण्यात यशस्वी झाला आहे. मात्र, नव्या सरकारचे नेतृत्व कोण करणार? हा यक्ष प्रश्न सर्वांसमोर होत आहे. यात पक्षाचे वरिष्ठ नेते माविन गुदिन्हो आणि विश्‍वजीत राणे यांनी उडी घेतल्यानंतर ही शर्यत अधिकच रंगतदार बनली होती. यात काळजीवाहू मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी बाजी मारली. यासाठी पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी आणि आमदारांनी सावंत यांच्या बाजूने कल दिल्याने केंद्रीय निरीक्षकांची निर्णय घेताना अडचण झाली होती. अखेर या शर्यतीतून गुदिन्हो आणि राणे यांनी माघार घेतल्याने डॉ. सावंत यांचा मार्ग मोकळा झाला आहे. आता विधिमंडळ बैठकीत यावर शिक्कामोर्तब होऊन सोपस्कार पूर्ण केले जाणार आहेत. मात्र, डॉक्टरांचा डोस सर्वांवर भारी पडल्याची सर्वत्र चर्चा आहे. ∙∙∙

युती, नको रे बाबा!

दुधाने तोंड पोळल्यानंतर ताकसुध्दा फुंकून पिले जाते. विधानसभा निवडणुकीत अशा युतींचा फटका बसल्यानंतर आता प्रत्येक पक्ष युती म्हटली की दोन हात दूर राहण्याचा पवित्रा घेताना दिसत आहे. म. गो.ने गतवेळी भाभासुमंकडे अशीच युती करून हात पोळून घेतले तरीही यावेळी त्याने तृणमूलकडे युती केली व असली नसलेली पत घालवली. तेच काँग्रेस व फॉरवर्डमधील युतीचे झाले व आता दोघेही एकमेकांना दोष देत आहेत. त्यामुळे २०२७ मध्ये युतीबाबत प्रत्येकजण सावधगिरी बाळगू शकतो असेच वाटते.∙∙∙

...यांची आधी चौकशी करा

राज्यातील विधानसभा निवडणुकीवेळी उमेदवारांकडून पैशांचा महापूर आला. कुणी एका मतासाठी दोन हजार दिले, तर हाच दर पाच हजार, सात हजार आणि त्याही पुढे गेला. सरकार चालवण्यासाठी या लोकांकडे पैसे नाहीत, दर महिन्याला कर्ज घेतले जात होते, मग मतांसाठी एवढे करोडो रुपये आले कुठून. बरं, सत्ताधाऱ्यांबरोबरच विरोधकांकडेही हाच प्रकार. अर्थातच सत्ताधाऱ्यांनी जरा जास्त खर्च केला. पण हे पैसे कुठून आले, कुणी दिले, निवडणुकीसाठी पैशांची पोती कुणाकडे होती, कुणी ती बाहेर काढली आणि मतदारांपर्यंत पोचवण्यासाठी कुणी जीवाची बाजी लावली हे कळायला हवे. खरे म्हणजे मतदारांपर्यंत पोचवण्यासाठी दिलेल्यातील काही गठ्ठे म्हणे कार्यकर्त्यांच्या खिशात तसेच राहिले... आता या पैशांची या उमेदवारांकडून कदाचित चौकशी होईल, पण मुळात उमेदवारांनी पैशांचा महापूर आणला तो कुठून, कसा काय... कोडेच आहे बुवा!

सरकार घडले तरी... तुझे माझे जुळेना...

निवडणुका झाल्या, निकालही लागले, पण अजून सरकार घडत नाही. त्यामुळे ‘ऑल ईज वेल’ नाही याची कुणकूण सर्वांनाच लागली आहे. यावेळेला मुख्यमंत्री प्रमोद सावंत की विश्‍वजीत राणे, की अन्य कुणी... याबाबतच चर्चा होत असल्याचे स्पष्ट होत असल्याने तुझे माझे जुळेना सरकार स्थापले तरी एकमेकांचे सूत्र मिळेना असा प्रकार होणार आहे हे नक्की.

निवडणूक निकाल लागून आठवडा उलटला, तरी सरकार स्थापनेचे त्रांगडे काही व्यवस्थित सुटलेले नाही. आता मुख्यमंत्री कोण हे दिल्लीहून भाजपचे नेते येऊन जाहीर करणार म्हणे. त्यापूर्वी हे नेते कुणाकुणाला चुचकारणार, कुणाकुणाचे सांत्वन करणार आणि कुणाकुणाची मनधरणी करणार देव जाणे. एक मात्र खरे, सत्तेसाठी काहीही करण्याची गोव्यातील आमदारांची तयारी आहे याची झलक मागच्या काळात अर्थातच भाजपच्या सरकारवेळीच या वरिष्ठ नेत्यांना दिसली आहे. त्यामुळे ताकसुद्धा फुंकून पिण्याची पाळी भाजपच्या या वरिष्ठ नेते मंडळीवर आली आहे हे मात्र खरे! ∙∙∙

अखेर निरीक्षकांचे घोडे गंगेत न्हाले

बहुमत मिळाल्यानंतर राष्ट्रीय पक्ष केंद्रीय निरीक्षकांची नेमणूक करून ते विधिमंडळ पक्षांची बैठक घेण्यासाठी पाठवतात. राज्यात मतमोजणी झाल्यानंतर भाजपला बहुमत मिळवून 10 दिवस पूर्ण झाले असले, तरीही निरीक्षकांचा पत्ता नव्हता. अखेर ते आज गोव्यात येत आहेत त्यामुळे आज नेता निवड होईल आणि सत्ता स्थापनेचा दावा होईल. मात्र, गेले दहा दिवस हे निरीक्षक होते कुठे? अशी चर्चा सर्वत्र आहे. विधिमंडळ नेता निवडीचे सगळे सोपस्कार पक्षाच्या केंद्रीय नेत्यांनी पार पाडल्यानंतर हे निरीक्षक गोव्यात येऊन आणखी काय करणार? हाही प्रश्न आहेच. मात्र, ते काही का असेना हे निरीक्षक आज येत असल्याची घोषणा प्रदेशाध्यक्षांनी केली आहे. त्यामुळे अखेर निरीक्षकांचे घोडे गंगेत न्हाले असेच म्हणावे लागेल.∙∙∙

सत्तेविना पंधरा वर्षे

‘स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी’ अशी एक गाजलेली पद्यपंक्ती आहे. थोडा फार बदल करून गोव्यातील काँग्रेसवाल्यांना ती लागू पडते. 1980 मध्ये तो पक्ष गोव्यात सत्तेवर आला व नंतर त्याला सत्तेविना राहणे जमेनासे झाले. येथील पक्षबदलांचे तेच तर मुख्य कारण आहे. 2012 पासून तो पक्ष सत्तेला पारखा झालेला असून दहा वर्षे त्यांनी कशी तरी तळमळत काढली ती यावेळी आपलेच सरकार येईल या आशेवर, पण ती आशाही फोल ठरल्याने आता ही पाच वर्षे कशी काढायची हा प्रश्न त्यांच्यासमोर आवासून उभा आहे.∙∙∙

दोनवरून यापुढे होणार 22 आमदार

आम आदमी पक्षाचे दोन आमदार विधानसभेत दाखल झाले असून 2027 मध्ये किमान 22 आमदार निवडून येतील. दिल्ली, पंजाबातील निकालनुसार गोव्यातही पुढील पाच वर्षांत क्रांती घडणार आहे, असा ठाम विश्वास ‘आप’च्या उमेदवारांनी माशेलात व्यक्त केला. राजकारण बदलासाठी पंचायत पातळीवरून काम करून लोकसभेसाठीही लढण्याची भाषा यावेळी नेत्यांनी केली. त्यामुळे त्यांच्या अपेक्षा वाढल्याची चर्चा उपस्थितीतांत सुरू होती.∙∙∙

बिचारे दामू

अनेक खटपटी लटपटी करूनही फातोर्ड्यातील सलग तिसरा पराभव टाळू न शकल्याने तेथील दामू सध्या काहीसे हताश झाले आहेत. निवडणूक निकालानंतर त्यांनी वेगवेगळ्या कोनांतून पराभवाची कारणमीमांसा करून पाहिली, पण त्यांचे समाधान झालेले नाही की आपले प्रयत्न कुठे कमी पडले ते त्यांना कळू शकलेले नाही. त्यांचे समर्थक त्यांना आतापासूनच पुढच्या तयारीला लागा असे सांगून त्यांना प्रोत्साहन देतात खरे, पण पाच वर्षांनंतरचे कुणी पाहिले आहे असे दामूबाबांना स्वतःच वाटत असावे व म्हणून राज्यात पुन्हा भाजपाला सत्ता मिळाली असली तरी त्याचा मनसोक्त आनंद व्यक्त करणे त्यांना कठीण होऊन बसले आहे. असते एकेकाचे नशीब!∙∙∙

रंगांची उधळण...

समाज मनावर निवडणुकीचा इतका प्रभाव असतो की तो प्रत्येक गोष्टीत जाणवत असतो. आता गावची होळी, रंगपंचमी म्हटल्यानंतर सर्व विसरून एकत्र येण्याचा उत्सव असतो, पण निवडणुकीचा रंग अद्याप उतरलेला नसतानाच रंगपंचमी आल्याने काही उत्साही, तर काही निरुत्साही होऊन घरी बसले. गेल्या पाच वर्षांत ज्यांनी रंगांची उधळण केली ते आता रूसून बसल्याने ज्यांना सत्ता मिळाली त्यांनी बेभान होऊन रंगांची उधळण केली. हा सर्व रागरंग पाहता ही रंगपंचमी की पंचवार्षिक होळी अशी वाटू लागली आहे. म्हणून तर लोक म्हणतात आता सर्वच क्षेत्राला राजकारण लागले आहे. काल होते ते आज नाही आणि आज आहेत ते उद्या असणार म्हणून कोण सांगू शकतो? कारण कोण कशाप्रकारे रंगांची उधळण करील त्यावर पुढील रंगपंचमी ठरणार आहे बरं.

सरकार कधी स्थापणार

निकाला लागून दहा दिवस झाले, पण राज्यात अद्याप सत्ता स्थापन करण्यात भाजपला अपयश आले आहे. मुख्यमंत्रिपदासाठी रस्सीखेच सुरू असून कोण होणार मुख्यमंत्री, हेच ठरत नाही. त्यामुळे फक्त दिल्लीवाऱ्या वाढल्या आहेत. फक्त पदासाठी, सत्तेचा विचार सुरू असून विकासाकडे दुर्लक्ष होत आहे, अशी चर्चा ‘आप’च्या माशेलातील गौरव समारंभात बरीच गाजली.∙∙∙

बाबू व मडगावचा विकास

आपण पेडण्याचा कायापालट केला व आता मडगावात विकासगंगा आणण्यासाठी येथे आलो आहे अशा राणा भीमदेवी थाटाच्या गर्जना माजी उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर हे निवडणूक प्रचारात करत होते, पण त्यांच्या या गर्जना मडगावकरांवर प्रभाव पाडू शकल्या नाहीत हे कळून चुकल्यामुळेच असेल कदाचित, मतमोजणीचा निकाल जाहीर झाल्यापासून बाबू मडगावात कुठेच दिसत नाहीत. त्यांचे निवासस्थान असलेल्या पाजीफोंड येथील वर्दळही थंडावली आहे. साहजिकच आहे, असतील शितं तर जमतील.∙∙∙

बाबूंचा माफीनामा!

माझे काहीतरी चुकले असावे त्यासाठीच मला केपेकरांनी नाकारले असावे अशा शब्दात बाबू कवळेकर यांनी केपेकरांची माफी मागितली आहे. वास्तविक विरोधी पक्षात असतानाही बाबूंना केपेच्या लोकांनी एकदा जिल्हा पंचायतीवर तर चारवेळा विधानसभेवर निवडून आणले. बाबू कवळेकर यांनी त्यावेळी फारसा विकास केला नव्हता, तरीही केपेकरांनी त्यांना ‘आमचाच बाबू’ म्हणून माफ केले, पण बाबू सत्तेत आले आणि लोकांपासून दूर गेले. त्यामुळेच लोकही त्यांच्यापासून दूर गेले. केपेत झालेल्या एका सभेत भाजपच्या एका नेत्याने ‘बाबू आता भाऊ झाले आहेत’, असे म्हटले होते. या भाऊपणामुळेच बाबू पडले नसावेत ना? ∙∙∙

चर्चिलची पुन्हा जुनीच थेअरी

2012 च्या निवडणुकीत आलेमाव कुटुंबाचे पुरते पानिपत झाले, त्यावेळी चर्चिल आलेमाव यांनी आम्हाला लोकांनी पाडले नाही, तर मतदान यंत्रात फेरफार करून पाडले अशी हाकाटी पिटण्यास सुरवात केली होती. 2017 मध्ये ते जिंकले. त्यांना त्यावेळी हे यंत्र आठवले नाही. मात्र, आता 2022 ते आणि त्यांची लाडली लक्ष्मी वालंका यांचा सपशेल पराभव झाला तर यावेळी त्यांना हे यंत्र म्हणजे फेरफारीची जुनी थेअरी असे पुन्हा आठवू लागले आहे. 2012 मध्ये त्यांनी त्यासाठी दिगंबर आणि पर्रीकर यांना दोष दिला होता. आता यावेळी त्यांच्या लाडक्या असलेल्या प्रमोद सावंत यांना ते याबद्दल दोष देणार का?∙∙∙

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: मंत्री, आमदारांचे कॉल रेकॉर्ड तपासा; सरकारी नोकरी घोटाळ्याप्रकरणी 'आप'ने सत्ताधाऱ्यांनाच घेरले

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa News Updates: कळंगुटमध्ये एफडीएची धडक कारवाई, निकृष्ट काजू जप्त; वाचा दिवसभरातील घडामोडी

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

SCROLL FOR NEXT