Porvorim Elevated Road Dainik Gomantak
गोवा

Porvorim Elevated Road: म्हापसा-मडगाव आता अर्ध्या तासात! पर्वरी उन्नत मार्गाचे नितीन गडकरींच्या हस्ते उद्घाटन, गुरुवारपासून वाहतुकीसाठी होणार खुला

Porvorim Elevated Road Inauguration: उत्तर गोव्यातील व्यापारी राजधानी म्हापसा आणि दक्षिण गोव्यातील औद्योगिक राजधानी मडगाव आता अर्ध्या तासाच्या अंतरावर आली आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

म्हापसा: उत्तर गोवा व दक्षिण गोवा केवळ अर्ध्या तासावर आणणाऱ्या ५.५ किलोमीटर लांबीच्या, ६४१ कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या सहापदरी पर्वरी उन्नत मार्गाचे बुधवारी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्‌घाटन करण्यात आले.

उत्तर गोव्यातील व्यापारी राजधानी म्हापसा आणि दक्षिण गोव्यातील औद्योगिक राजधानी मडगाव आता अर्ध्या तासाच्या अंतरावर आली आहे. हा प्रकल्प निर्धारित मुदतीपूर्वीच, म्हणजे विक्रमी वेळेत (२९ महिन्यांत) पूर्ण करून खुला करण्यात आला असून, यामुळे मोपा व दाबोळी या दोन्ही विमानतळांमधील प्रवास अधिक वेगवान होणार आहे. हा मार्ग टोलमुक्त ठेवण्यावर भर दिला गेला असून, यात अत्याधुनिक ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ यंत्रणाही कार्यान्वित करण्यात आल्याचे नितीन गडकरी यांनी सांगितले.

या ऐतिहासिक सोहळ्यादरम्यान गडकरी यांनी गोव्यासाठी ६,२०० कोटींहून अधिक रुपयांच्या तीन मोठ्या राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांची घोषणा केली. यामध्ये एनएच-७४८ वरील गोवा-कर्नाटक सीमा (अनमोड) ते मोले रस्त्याचे रुंदीकरण व सुधारणा (२,००० कोटी रुपये), मोलेम ते खांडेपार रस्त्याचे रुंदीकरण (२,२०० कोटी रुपये) आणि बोरी येथील झुआरी नदीवरील नवीन पुलाचे बांधकाम (२,००० कोटी रुपये) यांचा प्रामुख्याने समावेश आहे.

यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले की, हा दिवस गोव्याच्या विकासाच्या इतिहासातील मैलाचा दगड ठरला आहे. झुआरी पुलावर पॅरिसच्या आयफेल टॉवरच्या धर्तीवर १२० मीटर उंचीचे दोन समांतर टॉवर्स उभारले जात असून, अवघ्या तीन मिनिटांत लिफ्टने वर पोहोचण्याची सुविधा, रिव्हॉल्व्हिंग रेस्टॉरंट, कॉन्फरन्स हॉल व व्ह्यूअर गॅलरी यामुळे पर्यटनाला जागतिक ओळख मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

गोवा राज्य प्रदूषणमुक्त व्हावे

गोवा हे सर्वात सुंदर राज्य आहे. पर्यटनासाठी जगभरातील लोक गोव्यात येत असतात. त्यामुळे हे राज्य जल, वायू आणि ध्वनी प्रदूषणापासून मुक्त व्हावे. त्यासाठी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या सरकारने खास प्रयत्न करावेत, असे नितीन गडकरी यांनी सांगितले.

भोमा-फोंडा महामार्गाचे काम ऑक्टोबरपासून

बहुप्रतिक्षित ५५७ कोटी रुपये खर्चाच्या भोमा-फोंडा महामार्ग प्रकल्पासाठी अखेर काम करणारी एजन्सी निश्चित करण्यात आली असून, या प्रकल्पाचे प्रत्यक्ष काम ऑक्टोबर २०२६ पासून सुरू होणार आहे. हे काम ऑक्टोबर २०२८ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आल्याची माहिती मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.

मंत्री गडकरी काय बोलले...

राज्यातील विकासकामांच्या पार्श्वभूमीवर गडकरी यांनी राजकीय चर्चांना पूर्णविराम दिला. गोव्यात मोठ्या प्रमाणावर काम केल्यामुळे येथील एका पत्रकाराने मला गोव्यातून निवडणूक लढवणार का, असा थेट प्रश्न विचारला होता. तसेच इतर राज्यांतूनही अशा अनेक ऑफर्स आल्या. मात्र, मी केवळ माझ्या गृहराज्यातूनच निवडणूक लढवेन, असे गडकरी यांनी स्पष्ट केले.

मुंबई-गोवा महामार्गाच्या विलंबाबाबत नाराजी: बहुचर्चित मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामावर गडकरी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. या प्रकल्पाला होत असलेल्या विलंबावर बोट ठेवत, कामचुकार कंत्राटदारांना निलंबित करून त्यांना काळ्या यादीत टाकण्याचा एका वर्षातील नवा विक्रम मी प्रस्थापित करेन, असा इशारा त्यांनी दिला. या महामार्गाचे सुमारे ९३ ते ९४ टक्के काम पूर्ण झाले असून, उर्वरित काम तातडीने पूर्ण करून येत्या ऑक्टोबर महिन्यात या महामार्गाचे अधिकृत लोकार्पण करण्यात येईल. मात्र, या प्रकल्पाला झालेल्या विलंबामुळे मला लाज वाटत आहे, असे म्हणत गडकरी यांनी दिलगिरी व्यक्त केली.

मनोहर पर्रीकरांची आठवण

नितीन गडकरी यांनी आपल्या भाषणात दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची आठवण काढली. अटल सेतूसाठी पर्रीकरांनी खास आग्रह धरला होता. ते या पुलासाठी सतत पाठपुरावा करत होते. राज्य सरकार ५०० कोटी रुपये यासाठी खर्च करणार, अशी भावनिक इच्छा त्यांनी व्यक्त केली होती. त्यांच्या स्वप्नातील हा प्रकल्प होता आणि म्हणूनच आजारी असतानाही ते अटल सेतूच्या उद्घाटन सोहळ्यासाठी उपस्थित होते, असे गडकरी यांनी सांगितले. पर्रीकरांचे गोव्यासाठी खास व्हिजन होते, असेही ते म्हणाले.

‘ट्विन टॉवर्स’च्या कामाचाही शुभारंभ

गडकरी यांनी नवीन झुआरी पुलावरील जुळ्या मनोऱ्यांच्या (ट्विन टॉवर्स) आणि व्ह्यूइंग गॅलरीच्या कामाचा शुभारंभही केला. यामुळे गोव्यातील रस्ते पायाभूत सुविधांच्या जाळ्यात आणखी एका महत्त्वपूर्ण प्रकल्पाची भर पडली आहे.

आणखी तीन रस्ते प्रकल्प असे :

१ गोवा-कर्नाटक सीमा (अनमोड) ते मोले : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४-अच्या रुंदीकरण व सुधारणेसाठी २,००० कोटी रुपये.

२ मोले ते खांडेपार : रस्त्याच्या रुंदीकरण व सुधारणेसाठी २,२०० कोटी रुपये.

३ बोरी येथे नवीन झुआरी नदी पूल : नवीन पुलाच्या बांधकामासाठी २,००० कोटी रुपये.

मंत्रालयाकडून सात जागतिक विक्रम

नितीन गडकरी म्हणाले की, त्यांच्या मंत्रालयाने विविध कामांमध्ये सात जागतिक विक्रम नोंदवले आहेत. आता एका वर्षाच्या कालावधीत कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकणे, त्यांना कामांपासून अपात्र ठरवणे तसेच अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचा आणखी एक विक्रम करण्याचे आपले लक्ष्य आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games 2026: तिरंदाजीत भारताची 'गोल्ड' हॅटट्रिक! पुरुष कंपाउंड संघाने मिळवला रोमांचक विजय; फायनलमध्ये चीनला दिली मात

Kharif Sowing Area Decline: पेरणीखालील क्षेत्र घटले, तरी खरीप उत्पादनाला फटका नाही; रब्बीसाठी केंद्राचे 177.72 दशलक्ष टनांचे लक्ष्य

Lucky Zodiac Signs: राहू-केतूची उलटी चाल ठरणार वरदान! 'या' राशींच्या आयुष्यात येणार सुख, संपत्ती आणि समृद्धी; मिळणार बक्कळ पैसा

Goa Water Crisis: राज्य गंभीर पाणी संकटाच्या दिशेने; सत्तरीतील नद्या सप्टेंबरमध्येच तळाला, 31 टक्के पावसाची तूट

Onion Price: कांद्याने आणले गृहिणींच्या डोळ्यांत पाणी; नवा कांदा 60, जुन्याचा दर 75 रुपये किलो

SCROLL FOR NEXT