म्हापसा/पणजी: ‘म्हापसा-गणेशपुरी दरोडा प्रकरणी दोघा बांगलादेशींना अटक करण्यात आली आहे’, अशी माहिती उत्तर गोवा पोलिस अधीक्षक राहुल गुप्ता यांनी सायंकाळी जारी केली. जोरदार नागरी टीकेनंतर अखेर आठव्या दिवशी पोलिस पुढे आले व त्यांनी तपासाचा तपशील जाहीर केला. संशयित हे कर्नाटकात विजापूर येथे वास्तव्य करत होते.
निवेदनात म्हटले आहे, ‘शोध मोहिमेत गोवा पोलिसांनी सहा मुख्य संशयितांचा माग घेतला. त्यांचा ठाव लागला नाही; परंतु त्यांना साह्य करणाऱ्या राजू बी. (वय २७) आणि सफीकुल अमीर (वय ३७) या दोघांना अटक केली आहे.
द्वयींनी दरोड्याच्या कटात महत्त्वाची भूमिका बजावली. संबंधित हे एकमेकांचे नातेवाईक आहेत. समोर आलेली माहिती पडताळून आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांनंतर ही अटक करण्यात आली. त्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला’.
पुराव्यांनुसार, राजू बी. आणि सफीकुल यांनी इतर सहा मुख्य संशयितांसोबत कट रचला होता. त्यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कठोर कलमे लागू करण्यात आली आहेत.
कलम ३३१ (३): मालमत्ता किंवा मौल्यवान वस्तू उकळण्यासाठी गंभीर दुखापत करणे; कलम ११५(२), ३५१(३), १२६(२), ३१०(२), ६१(२), १११ : दरोडा, कट आणि दरोड्याच्या उद्देशाने जमाव जमविणे या सारख्या गुन्ह्यांशी संबंधित आहेत. कलम ३(५): संघटित गुन्हेगारीला चालना होय. पोलिसांनी या प्रकरणाला संघटित गुन्हेगारी मानलेआहे.
दरोडा पडला त्या घरातील लोक व पोलिस यांच्या माहितीनुसार दरोडेखोर हे सराईत असावेत व त्यांनी कसलाही धागादोरा मागे सोडलेला नाही. ज्याप्रकारे दोनापावला येथे धेंपो कुटुंबीयांच्या घरावर दरोडा पडला तशीच काहीशी पद्धत यावेळीही डॉ. घाणेकर यांच्या घरातील चोरी प्रकरणात अवलंबिण्यात आली. त्यामुळे धेंपो घरातील चोरीप्रमाणेच म्हापसा दरोडा प्रकरणातही पोलिस गोंधळलेले आहेत.
घरामध्ये पोलिसांना रिकाम्या व्हिक्सच्या बाटल्या सापडल्या आहेत, त्यामुळे कुत्र्यांना माग काढता येऊ नये यासाठी त्यांनी वास मारून टाकण्याची क्लृप्ती अवलंबिली होती.
दरोड्यानंतर पोलिसांचे खास पथक घटनास्थळी आणले होते, परंतु त्यातून काही हाती लागले नाही.
तज्ज्ञांच्या मते, ही टोळी जर आंतरराष्ट्रीय असेल, तर गोवा पोलिसांनी केंद्रीय गृहखात्याची मदत का घेतली नाही, असा प्रश्न विचारला जातो. बांगलादेशातून ही टोळी येत असेल तर ती आणखी काही राज्यांना हवी आहे का, याचा शोध पोलिसांनी घेतला आहे का? गोवा पोलिसांनी सीमेवरच्या पोलिसांना व गस्तीवरील पोलिसांना सतर्क केले नव्हते, त्याबाबतही म्हापसा पोलिसांच्या अनास्थेवर प्रकाश पडतो.
घटनेनंतर म्हापशातील सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला. म्हापशात सीसीटीव्ही यंत्रणा नव्हती आणि तशी यंत्रणा का हवी, याचा अहवाल पोलिसांनी तयार केला नव्हता, हे या घटनेनंतर पुन्हा उजेडात आले. गुप्तहेर यंत्रणेचा तर फज्जा उडाला आहे.
डॉ. घाणेकर यांचे कुटुंबीय अजूनही तणावाखाली आहेत. डॉक्टर इस्पितळात जाऊ लागलेत व कन्याही शाळेत जाऊ लागली आहेत; परंतु घराची सुरक्षा आणखी कशी वाढवावी, ग्रिल्स आणखी बनवून घ्यावेत का यावर विचार केला जातोय.
गेले काही दिवस म्हापशात गस्ती घातल्या जात आहेत; परंतु पोलिस गृहनिर्माण वसाहतीत स्थानिक गाड्याच तपासत असल्याने नागरिक पोलिसांच्या कार्यपद्धतीवरच शंका उपस्थित करीत आहेत.
म्हापसा येथे दरोडा टाकून सहाही दरोडेखोर हे विजापूर येथे पोहचले. म्हापसा पोलिसांनी अटक केलेले दोन्ही संशयित हे त्यांच्या घरी घटनेच्या दिवशीच दाखल झाले होते. या घरात ते दोन तास होते. त्यांनतर ते हैदराबादकडे गेले. विजापूरमधील याच घरात दरोड्याची योजना आखली होती. या सहाही मुख्य दरोडेखोरांची पोलिसांनी ओळख पटवली असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चार विशेष पथके सध्या राज्याबाहेर कार्यरत आहेत. ही पथके विशेषतः कर्नाटक, बेंगळुरू परिसरात सहा मुख्य आरोपींचा मागोवा घेत आहेत. बांगलादेशी नागरिकांचा या गुन्ह्यात सहभाग असल्याचे उघड झाल्यामुळे प्रकरणाला आंतराष्ट्रीय गुन्हेगारीचे स्वरूप मिळाले आहे. संशयिताच्या शोधार्थ गेलेल्या गोवा पोलिसांच्या काही पथकांवर हताश माघारी परतण्याची वेळ ओढवली. ज्यामध्ये गुन्हा शाखेचाही सहभाग आहे. मुख्य दरोडेखोरांनी पोलिसांना गुंगारा देत आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडल्याचा कयास आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.