Goa Politics: गोव्यातील भाजपचे सरकार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या गॅरंटीच्या बढाया मारते.
मग मोदींनी प्रत्येक गोमंतकीयांना हक्काचे 300 चौरस मीटर आकाराचे घर, जमीन किंवा फ्लॅट देण्याची गॅरंटी द्यावी.
असे केल्यास मी स्वतः रिव्हॉल्युशनरी गोवन्स पक्ष भाजपमध्ये विलीन करीन, असे रोखठोक आव्हान देत ‘आरजी’चे सर्वेसर्वा तथा उत्तर गोव्याचे पक्षाचे उमेदवार मनोज परब यांनी भाजपला ललकारले.
गोवा मुक्तिदिनाचे औचित्य साधून ‘आरजी’च्या म्हापशातील अस्तित्व सभेत मार्गदर्शन करताना परब बोलत होते. या सभेत ‘आरजी’ने लोकसभेसाठी उत्तर व दक्षिण या दोन्ही मतदारसंघांमध्ये आपले उमेदवार जाहीर केले.
उत्तरेतून मनोज परब, तर दक्षिणेतून रुबर्ट परेरा हे रिंगणात असतील. यावेळी परब म्हणाले की, आरजी पक्ष हा कुठल्याच राजकीय पक्षाची ‘बी टीम’ नाही. तसेच विरोधक हे ‘आरजी’वर तसेच माझ्यावर वैयक्तिक आरोप करतात.
काहींच्या मते, माझ्याकडे बीएमडब्ल्यू, ऑडी या कार तसेच महागडा बंगला आहे, असा दावा करतात. परंतु, हे कुणी कागदपत्रे किंवा पुराव्यांनिशी सिद्ध केल्यास मी आरजी पक्ष त्याक्षणी बंद करीन, असे खुले आव्हान मनोज परब यांनी विरोधकांना दिले.
गोव्यातील स्थानिक महिला विक्रेत्यांचे हक्क आणि उपजीविकेचे रक्षण करण्यासाठी रिव्हॉल्युशनरी गोवन्स पक्षाने महिलांसाठी ‘फुलराणी’ संघटनेची स्थापना केली आहे.
स्थानिकांच्या उपजीविकेचे रक्षण करणे, त्यांना व्यवसाय करताना उद्भवणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी, तसेच परप्रांतीय विक्रेत्यांकडून सतत होणाऱ्या अत्याचारातून मुक्त करण्यासाठी ही संघटना कार्यरत असणार आहे.
मासेविक्री, फळविक्री, फुलविक्री, कपडे, खाद्यपदार्थ, किराणा सामान व्यवसायात आणि गोव्याच्या बाजारपेठांमध्ये, रस्त्याच्या कडेला आणि विविध ठिकाणी गुंतलेल्या स्थानिक महिलांची समृद्धी सुनिश्चित करण्यासाठी ही संघटना काम करणार असल्याचे पक्षाचे प्रमुख मनोज परब यांनी म्हटले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.