पणजी: देशाचे माजी संरक्षणमंत्री तथा गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर (Manohar Parrikar, former Chief Minister of Goa) यांचे पुत्र उत्पल पर्रीकर (Utpal Parrikar) यांनी पक्षाचे भरीव काम करून दाखवावे. त्यांना स्वतःलाही केवळ पर्रीकरांचे पुत्र म्हणून भाजपची (BJP) उमेदवारी आपल्यालाच मिळावी असे कधीही वाटणार नाही, असे मत भाजपाचे गोव्याचे निवडणूक प्रमुख देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मंगळवारी ‘गोमन्तक’शी बोलताना व्यक्त केले.
फडणवीस पुढे म्हणाले, मनोहर पर्रीकर यांनी केवळ गोव्यासाठी नाही, तर भाजपा पक्ष म्हणून मोठा व्हावा, यासाठी मोठे योगदान दिले आहे. त्यांची नामोनिशाणी कुणाला पुसता येणार नाही. त्यांचा वारसा गोव्यात अव्याहत चालू राहील आणि त्या समृद्ध वारशावर केवळ भाजपाचाच अधिकार आहे.
उत्पल पर्रीकर यांनी सध्या पणजीमध्ये राजकीय काम सुरू केले आहे. भाजपातील एका गटाने उत्पल पर्रीकर यांनाच भाजपाने उमेदवारी द्यावी, असा आग्रह धरला आहे. दुसऱ्या बाजूला तशी चर्चा चालू आहे, की उत्पल पर्रीकर यांनी आपला वेगळा मार्ग चोखळावा. भाजप अतानासियो मोन्सेरात यांच्यासह त्यांच्या पत्नीलाही उमेदवारी देण्यात स्वारस्य दाखवत असल्याने उत्पल पर्रीकर यांनी पणजीमध्ये अपक्ष म्हणून निवडणूक लढवावी आणि कार्यकर्त्यांनी त्यांच्या पाठिमागे उभे राहावे.
दरम्यान, भाजपची सत्ता गोव्यात आहेच, तसेच केंद्रातही आमचीच सत्ता आहे. त्यामुळे नेत्यांना केवळ गोव्यातच सत्तेत हिस्सा मिळणार असे नाही. अनेक सत्तेची पदे त्यांना मिळू शकतात आणि पक्षश्रेष्ठींनी सत्ता वाटप करताना गोव्याचा विचार कधी टाळलेला नाही, असे फडणवीस म्हणाले.
"भाजपामध्ये अनेक नेत्यांचे चांगले काम चालू आहे. अनेकांनी खस्ता खाऊन हा पक्ष वाढवला. परंतु आता सत्तेवर आल्यानंतर अनेक घटकांना आम्हाला बरोबर घेऊन चालावे लागते. आमदारांना आम्ही उमेदवारी देताना जरुर प्राधान्य देऊ, त्याचबरोबर पक्षाच्या इतर नेत्यांनाही काम करण्यास खूप संधी आहे."
- देवेंद्र फडणवीस, भाजपाचे गोवा निवडणूक प्रमुख
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.