सासष्टी: नावेली येथील मनोहर पर्रीकर स्टेडियममध्ये शनिवारपासून "शादी"चा माहोल होता, मात्र सोमवारी दुपारपर्यंत हा स्टेडियम पुन्हा चकाचक झाला होता. "शादी" आणलेले सर्व साहित्य हलवण्यात आले, त्यामुळे दुपारी चार वाजल्यानंतर बास्केटबॉल, टेबल टेनिस व बॅडमिंटन खेळाडूंनी नेहमीप्रमाणे सरावास सुरवात केली.
हा स्टेडियम लग्नासाठी भाडेपट्टीवर दिल्याने बॅडमिंटन, बास्केटबॉल तसेच इतर क्रीडा प्रकारासाठी तयार केलेल्या साधन सुविधांवर काही परिणाम होईल किंवा नासाडी होईल अशी शंका व्यक्त करण्यात येत होती. रविवारी स्टेडियममध्ये लग्नाचे साहित्य अस्ताव्यस्त पडलेले होते. जिथे खेळतात तिथे काहीतरी नुकसान झाले असावे अशी शंकाही व्यक्त करण्यात येत होती. समाज माध्यमांवर तेथील स्थितीचे फोटो व्हायरल झाल्यामुळे आयोजकांनी साहित्य हटविण्याची धावाधाव केली. सोमवारी दुपारपर्यंत आणलेले सर्व साहित्य तिथून हटविले. त्यामुळे दुपारी चार वाजल्यानंतर खेळाडूंनी नेहमीप्रमाणे सरावास सुरवात केली.
या प्रतिनिधीने स्टेडियममध्ये जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. तसेच काही प्रशिक्षक तसेच ज्येष्ठ खेळाडूंशी चर्चा केली तेव्हा त्यांनी सांगितले की, जिथे प्रत्यक्ष खेळतात त्या क्षेत्राला काही बाधा झालेली नाही. बॅडमिंटन कोर्टच्या फळ्यांना बारीक सारीक स्क्रॅचिस पडले आहेत पण ते नगण्य आहेत. रविवारची परिस्थिती पाहता आज आम्हाला सराव करायला मिळणार की नाही.
कोर्ट व्यवस्थित असणार की नाही याची भीती होती. पण आयोजकांनी म्हणा किंवा शादीसाठी ज्या कंत्राटदाराची नियुक्ती केली होती त्याने व्यवस्थित निगा राखली असावी असे एका ज्येष्ठ खेळाडूने सांगितले. मात्र या पुढे क्रीडा स्पर्धांव्यतिरिक्त इतर कार्यक्रमांना हा स्टेडियम भाड्याने देऊ नये, असे आपले प्रामाणिक मत असल्याचे त्याने सांगितले.
शादी सोहळ्यासाठी हा स्टेडियम दिल्यामुळे शुक्रवार २३ व २४ असे दोन दिवस सराव व प्रशिक्षणासाठी स्टेडियम बंद ठेवण्यात आला होता. खेळाडूंनी, प्रशिक्षकांनी तसेच तमाम क्रीडाप्रेमींनी इनडोअर स्टेडियम विवाह, प्रदर्शनांसाठी देऊ नये असे सांगितलेले असतानाही हा स्टेडियम विवाहासाठी दोन दिवस भाड्याने देण्यात आला. रविवारी तिथे जाऊन पाहतो तर सर्व अस्ताव्यस्त साहित्य पडलेले होते. लाखो रुपये खर्च करून तयार केलेले बॅडमिंटन कोर्टावर त्यामुळे परिणाम झाल्याची शक्यता स्थानिक खेळाडू ऑस्कर सिल्वेरा याने व्यक्त केली होती. कोर्टच्या लाकडी फळ्यां ओरखडल्या सारख्या दिसत होत्या असे त्याचे मत होते.
रविवारीच स्टेडियममध्ये झालेल्या दशेचे फोटो व्हायरल झाले होते. सर्वत्र कचरा पसरला होता. बॅडमिंटन कोर्टला किंवा इतर फ्लोरिंगला तडा जाऊ नये म्हणून दुहेरी थराच्या मॅट घातल्या असाव्यात. शिवाय निरिक्षणासाठी अभियंते व देखरेख करण्यासाठी माणसे ठेवल्याचे सांगण्यात आले होते. कोर्टवर घातलेल्या मॅटींगवर जे फर्निचर किंवा इतर सामान ठेवले होते ते प्रथम काढायला हवे होते. पण कर्मचाऱ्यांनी प्रथम मॅटींग ओढून काढले होते व सामान तसेच फळीवर ठेवलेले दिसत होते असे ऑस्करचे म्हणणे आहे.
खेळ सोडून क्रीडा संकुले इतर कार्यक्रमासाठी देऊ नये म्हणून काही नागरिक न्यायालयात दाद मागण्याच्या विचारात असल्याचे कळते.
स्टेडियमच्या छप्परावर एग्जोस्ट पंखे बसवलेले आहेत त्यातून पाणी झिरपते आहे. तात्पुरता उपाय म्हणून ज्या एग्जोस्टमधून पाणी झिरपते तिथे पाइप बसवलेला आहे व पाणी बादलीत पडते. तरी सुद्धा अजूनही ही समस्या सुटलेली नसून बॅडमिंटन कोर्टवर थेंबे थेंबे पाणी झिरपत असल्याचे काही जणांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.