Goa illegal beach wedding: गोव्यातील समुद्रकिनाऱ्यांवर अनधिकृत कार्यक्रमांबाबत पर्यटन विभागाने कठोर भूमिका घेतली आहे. मांद्रे किनाऱ्यावरील 'रिवा बीच रिसॉर्ट' या रिसॉर्टने नियमांचे उल्लंघन करून बीच वेडिंग आयोजित केल्यामुळे, पर्यटन विभागाने त्यांच्यावर १ लाख रुपयांचा मोठा दंड ठोठावला आहे.
पर्यटन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (दि. १७) संध्याकाळी ६ वाजण्याच्या सुमारास मांद्रे बीचवर एका बीच वेडिंगसाठी अवैध सेटअप उभा केला जात असल्याची तक्रार पर्यटन वॉर्डनने दिली.
तक्रार मिळताच पर्यटन वॉर्डनने पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने तयारी थांबवली आणि रिसॉर्टच्या प्रतिनिधींना सेटअप त्वरित काढण्याचे निर्देश दिले.पर्यटन विभागाने स्पष्ट केले की, ताकीद देऊनही रिसॉर्टने कार्यक्रम पुढे सुरू ठेवला, ज्यामुळे 'गोवा टुरिस्ट प्लेसेस प्रोटेक्शन अँड मेंटेनन्स ॲक्ट, २००१' मधील नियमांचा भंग झाला आहे.
रिसॉर्टने अधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी न घेता कार्यक्रम आयोजित केल्यामुळे, ही कृती कायद्याचे उल्लंघन करणारी ठरली आहे. कायद्यानुसार, पर्यटन स्थळी परवानगीशिवाय कोणताही उपक्रम राबवता येत नाही, ज्यामुळे लोकांना गैरसोय किंवा धोका निर्माण होऊ शकतो.
रिसॉर्टला पुढील सात दिवसांच्या आत १ लाख रुपयांचा दंड भरणे बंधनकारक आहे. दंडाव्यतिरिक्त, 'गोवा रजिस्ट्रेशन ऑफ टुरिस्ट ट्रेड ॲक्ट, १९८२' आणि नियमांनुसार रिसॉर्टची नोंदणी रद्द का करू नये, याबद्दल स्पष्टीकरण देण्यासही सांगण्यात आले आहे.
पर्यटन संचालक केदार नाईक यांनी स्पष्ट केले की, सर्व पर्यटन भागधारकांनी नियामक नियमावलीचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. अधिसूचित समुद्रकिनाऱ्याच्या भागात अनधिकृत कार्यक्रम खपवून घेतले जाणार नाहीत आणि जबाबदार पर्यटन पद्धती सुनिश्चित करण्यासाठी नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.