मांद्रे, हरमल, मोरजीसह पेडणे तालुक्यातील सर्वच रस्त्यांवर गेल्या वर्षीही फूटभर खड्डे पडले होते. शिवाय पाऊसही खूप पडला होता. त्यावेळी सरकारने आश्वासन दिले होते की, पावसाळ्यानंतर सर्व रस्ते चकाचक केले जातील. पण यंदाही रस्त्यांची तीच गत आहे. सध्या सार्वजनिक बांधकाम खाते मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे सांभाळत आहेत. त्यामुळे ‘भिवपाची गरज ना’ एवढेच म्हणावे लागेल. त्यातच पुढचे ‘निवडणूक वर्ष’ आहे.
सद्यःस्थितीत रस्त्यांची स्थिती खराब होण्यामागे अनेक कारणे आहेत. ‘कंत्राटदाराचा काळ्या यादीत समावेश करण्यात येईल’ या आदेशामुळे पावसाळ्यानंतर रस्ते चकाचक बनतील असा अंदाज नागरिक रामकृष्ण माजिक यांनी व्यक्त केला. सरकारने रस्त्यांच्या कामाचा दर्जा तपासण्याची गरज आहे. आणि कामाचा दर्जा खालावलेला आढळल्यास तत्काळ कारवाई केली जावी, अशी मागणीही त्यांनी केली.
दरम्यान, आजमितीस एकाही कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्यात आलेले नाही. त्यामुळे सरकारचे विधान म्हणजे जनतेची करमणूक होत आहे. सरकारने रस्त्यांकडे अक्षम्य दुर्लक्ष केल्याने यंदा ‘बाप्पा’ खड्ड्यांतून येत आहेत. ‘डबल इंजीन’ सरकारने रस्ते चकाचक करावेत, यासाठी लोक श्री गणरायाला साकडे घालू लागले आहेत.
कंत्राटदाराची अकार्यक्षमता, सरकारची उदासीनता आणि त्याच्या जोडीला धो-धो कोसळणारा पाऊस, यामुळे राज्यातील रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. ठिकठिकाणी मोठ-मोठे, गोलाकार खड्डे पडले असून, अपघात वाढले आहे. दरम्यान, गणेश चतुर्थीचा सण तोंडावर आला आहे. परिणामी भाविकांना मोठा मन:स्ताप सहन करावा लागणार आहे. विघ्नहर्त्या श्री गणरायाचे आगमनही यंदा याच खड्ड्यांतून होणार आहे.
मोरजी पंचायत क्षेत्रातही रस्त्यांची स्थिती भयावह
मोरजी पंचायत क्षेत्रातील रस्त्यांची स्थिती तर भयावह आहे. गावडेवाडा, दाभोलकर वाडा, मरडीवाडा, मुनांगवाडा, मधलावाडा, बागवाडा, खिंड या परिसरातील रस्त्यांवरून वाहने चालवताना जीव मुठीत धरावा लागतो.
या रस्त्यांची चतुर्थीपूर्वी दुरुस्ती करावी अशी मागणी सरपंच पवन मोरजे यांनी केली आहे. दरम्यान, आता हे काम एवढ्या कमी अवधीत होणे शक्य नाही. तरीसुद्धा आम्ही पंचायतीतर्फे खड्डे बुजविण्यासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही मोरजे यांनी दिली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.