Damodar Mauzo  Dainik Gomantak
गोवा

कोकणी परिषदेच्या अधिवेशनात ‘मालवण’ दिसलेच नाही

दैनिक गोमन्तक

मडगाव: मालवणातील कोकणी भाषिकांना कोकणीच्या मुख्य धारेत आणण्याच्या उद्देशाने अखिल भारतीय कोकणी परिषदेचे 32 वे अधिवेशन मोठ्या उमेदीने मालवणात भरवण्यात आले. परंतु या अधिवेशनात स्थानिक मालवणी माणूस दिसला पाहिजे होता, तो अभावानेच दिसला.

या अधिवेशनात खास निमंत्रित म्हणून गेलेले ज्ञानपीठ पुरस्कार विजेते साहित्यिक दामोदर मावजो यांनीच ही प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले, ही आयोजनाबद्दल केलेली तक्रार नाही. मात्र या अधिवेधनात स्थानिकांचा जो सहभाग असायला पाहिजे होता तो कमीच दिसला. मुख्य कार्यक्रमात स्थानिकांना जे प्रतिनिधित्व मिळायला पाहिजे होते, तेही मिळाले नाही. आयोजक यात कमी पडले, असे म्हणावे लागेल.

मालवणात कोकणी बोलणारे सुमारे 4 हजारांच्या आसपास लोक असून, त्यात प्रामुख्याने ख्रिस्ती लोकांचा समावेश आहे, जे घरात आणि चर्च व्यवहारात कोकणीचा वापर करतात. त्याशिवाय काही कोकणी सोनार व्यापाऱ्यांची घराणीही येथे आहेत. या भागात कोकणीचा प्रसार व्हावा आणि कोकणीच्या मुख्य धारेत हा भाग यावा, या उद्देशाने कोकणी चळवळीतील ज्येष्ठ नेते नागेश करमली यांनी हे अधिवेशन मालवणमध्ये घ्यावे, अशी सूचना केली होती. त्यानुसार मालवण येथे हे अधिवेशन आयोजित करण्यात आले. या अधिवेशनाचे उद्‌घाटन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. या उद्‌घाटन समारंभाला लोकांनी गर्दी केली, ही गोष्ट जरी खरी असली तरी नंतरच्या कार्यक्रमाला स्थानिक अभावानेच दिसले.

मावजो म्हणाले, ज्या भागात कोकणी भाषिक राहतात त्यांना कोकणीच्या मुख्य धारेत आणणे आणि कोकणी संस्कृती विकसित करणे, हा मुख्य उद्देश असतो. मालवणमध्येही हेच होणे आवश्यक होते. मात्र त्यासाठी परिषदेच्या अधिकाऱ्यांनी एक-दोन महिने तिथे राहून स्थानिक संघटन बांधून काढण्याची गरज होती. पण परिषद त्यात कमीच पडली. कदाचित त्यांनाही त्यांच्या मर्यादा असतील. हे आयोजन स्वतः नागेश करमली यांनी केले असते तर त्यांनी तिथे जाऊन असे संघटन बांधून काढले असते आणि नंतरच अधिवेशन घेतले असते.

वास्तविक हे अधिवेशन दोन वर्षांपूर्वी आयोजित होणार होते; पण कोविडमुळे ते रेंगाळले. खरे तर कोविडमुळे परिषदेला दोन वर्षे अधिक मिळूनही त्यांच्याकडून पुरेसे प्रयत्न झाले नाहीत, असाही सूर व्यक्त होत आहे.

आम्ही या अधिवेशनासाठी पूर्वतयारी केली होती. एकदा वेंगुर्ला येथे तर एकदा मालवण येथे मनोमीलन कार्यक्रमही आयोजित केला होता. त्यातून आम्हाला काही चांगले कार्यकर्ते मिळाले. त्यांच्याच जोरावर आम्ही या अधिवेशनाचे आयोजन केले, असे परिषदेचे संयुक्त सचिव गौरीश वेर्णेकर यांनी सांगितले. सध्या मालवणमध्ये पर्यटन हंगाम सुरू आहे. तिथले बहुतेक लोक पर्यटनावर आधारित काम करणारे आहेत. त्यामुळे आपला व्यवसाय सोडून ते अधिवेशनात येण्याची अपेक्षा ठेवणे चुकीचे, असे ते म्हणाले.

स्थानिक आयोजक असलेले मालवण येथील कोकणी साहित्यिक रुजारियो पिंटो यांना याबाबत विचारले असता ते म्हणाले, मालवणमध्ये जे कोकणी भाषिक आहेत ते बहुतेक ख्रिस्ती समाजातील असून त्यातील काही मुंबईत व्यवसायानिमित्त स्थायिक झाले आहेत. त्यातच मालवणमध्ये मराठी चित्रपट महोत्सव आणि भाऊ कदम आणि वैशाली सामंतसारख्या गाजलेल्या कलाकारांचा समावेश असलेला मालवण महोत्सव सुरू होता. अशा परिस्थितीतही उद्‌घाटन सोहळ्याला 600 च्या आसपास लोक होते, स्थानिक आमदार उपस्थित होते. त्यामुळे स्थानिकांचा सहभाग नाही, असे म्हणता येणार नाही.

या अधिवेशनाकडे सुरुवात म्हणून पाहावे लागेल. काही प्रमाणात बिगर कोकणी लोकही सामील झाले होते, ही निश्चितच स्वागतार्ह बाब आहे. पुढच्या दोन वर्षांत येथे स्थानिक संस्था स्थापन करून कोकणीचे काम सुरू करण्याचे ठरले असून, ही एक चांगली सुरुवात म्हणावी लागेल, असे परिषदेच्या उपाध्यक्ष सुनीता काणेकर यांनी सांगितले.

स्‍थानिकांना वाव देण्याची गरज

या अधिवेशनात आयोजित केलेल्या कविसंमेलनात दादा मडकईकर व सुनंदा कांबळी या दोन स्थानिक कवींनी भाग घेतला. त्यांनी छान कविता सादर केल्या, असे मावजो म्हणाले. मात्र यापेक्षा स्थानिक कवी-कवयित्रींना आमंत्रित करून जर मालवणी कविता संमेलन आयोजित केले असते तर अधिक चांगले ठरले असते. यापुढे हे काम आवर्जून करण्याची गरज मावजो यांनी व्यक्त केली.

आदरातिथ्य उत्तम

या अधिवेशनात ''घाट माथ्यावरील कोकणी भाषिकांच्या समस्या'' हा परिसंवाद जास्त रंगला. यात या भागातील लोकांनी आपले मनोगत उत्स्फूर्तपणे मांडले. त्याशिवाय जेवण आणि आदरातिथ्य उत्तम होते, असे ते म्हणाले

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT