पणजी: गोव्यापासून सुमारे ४०० किलोमीटर अंतरावर अरबी समुद्रात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा सध्या स्थिर आहे. मात्र बंगालच्या उपसागरात निर्माण झालेला दुसरा कमी दाबाचा पट्टा चक्रीय वाऱ्यात रूपांतरित होऊन पश्चिमेकडे सरकत आहे. या दोन प्रणालींच्या संयुक्त प्रभावामुळे गोव्यासह कोकणपट्ट्यात पावसाची तीव्रता वाढली आहे, अशी माहिती गोवा वेधशाळेचे संचालक नहुष कुलकर्णी यांनी ‘गोमन्तक’ला दिली.
बंगालच्या उपसागरातील चक्रीय वाऱ्यांची दिशा आणि त्यांचा वेग ठरवणार आहे की पुढील काही दिवस पाऊस किती तीव्र असेल. तथापि, सध्या हवामान स्थिती पाहता, पुढील आठवडाभर राज्यात मध्यम ते अधूनमधून जोरदार पावसाची शक्यता कायम राहील, असे कुलकर्णी यांनी सांगितले.सर्वसामान्यपणे ऑक्टोबर महिन्यात राज्यात पावसाचे प्रमाण कमी होते.
परंतु यंदा स्थिती वेगळी आहे. पणजीत सामान्य सरासरीपेक्षा तब्बल ७५ मि.मी. अधिक पाऊस नोंदवला गेला आहे. हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार, मागील काही वर्षांपासून राज्यात ऑक्टोबर महिन्यात अपेक्षेपेक्षा जास्त पाऊस पडत आहे. एनआयओचे माजी शास्त्रज्ञ एम. आर. रमेशकुमार यांनी सांगितले की, यावर्षी तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे जास्त पाऊस पडला आहे. हवामानातील बदल आणि समुद्राच्या पृष्ठभागावरील तापमानवाढ हे घटक पावसाच्या वाढत्या तीव्रतेस कारणीभूत ठरत आहेत.
अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात दोन कमी दाबाचे पट्टे सक्रिय झाल्याने पावसाचा मुक्काम वाढण्याची शक्यता.
गोवा व कोकणात पावसाची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता
पणजीत सरासरीपेक्षा ७५ मिलिमीटर पडला अधिक पाऊस
पुढील आठवडाभर मध्यम ते जोरदार पावसाचा इशारा
नागरिकांनी सतर्क राहण्याचे वेधशाळेचे आवाहन
हवामान तज्ज्ञांच्या मते, अशा प्रकारचे कमी दाबाचे पट्टे ऑक्टोबरमध्ये आता वारंवार तयार होत आहेत. त्यामुळे गोव्यातील पावसाचे पॅटर्न बदलले आहेत. पूर्वी सप्टेंबरअखेर पावसाचा जोर कमी होत असे. मात्र गेल्या दोन-तीन वर्षांपासून ऑक्टोबरपर्यंत मान्सूनचा प्रभाव वाढला आहे. हा कल भविष्यातील हवामान बदलाचे स्पष्ट द्योतक असल्याचे शास्त्रज्ञांचे निरीक्षण आहे.
अचानक वाढलेल्या पावसामुळे राज्यातील अनेक भागांत शेतीचे नुकसान झाले आहे. तसेच रस्त्यांवर पाणी साचणे आणि वाहतुकीत अडथळे निर्माण झाले आहेत. काही ठिकाणी वीजपुरवठा खंडित होण्याच्या घटना घडल्या असून, जनजीवनावर त्याचा परिणाम झाला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.