लोकसभा निवडणुकीत मतदानोत्तर चाचण्यांचे कल शनिवारपासून जाहीर होऊ लागले असले, तरी विरोधकांची मदार मात्र कोणताही गाजावाजा न करता मतदान केलेल्या बहुसंख्य सायलेंट मतदारांवर आहे.
हे कल जाहीर झाल्यानंतर राज्यभरातील विविध स्तरांवरील नागरिकांशी संपर्क साधल्यावर धक्कादायक माहिती हाती आली आहे. त्यानुसार लोकांनी या खेपेला ठरवून मतदान केल्याचे दिसून येते.
राष्ट्रीय पातळीवर राष्ट्रीय लोकशाही आघाडीला स्पष्ट बहुमत मिळणार, असा चाचण्यांचा कल आणि गोव्यातील दोन्ही जागा राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या म्हणजेच भाजप उमेदवारांच्या पारड्यात पडतील, असे या चाचण्यांतून दाखविले आहे. तरीही अनेक मतदारांना मात्र ते अद्याप पचनी पडलेले नाही.
त्यांच्या म्हणण्यानुसार, या चाचण्या घेताना मतदान करून परत येणाऱ्या मतदारांना त्यांचे मत विचारले जाते. मात्र, त्यावेळी दिलेली माहिती खरीच असते, असे नाही. बहुतांशवेळा मत दिलेल्या उमेदवाराच्या विरोधातील माहिती बाहेर आल्यावर मतदार देतात. त्यामुळे मतदानोत्तर चाचण्यांचे कल चुकू शकतात.
काँग्रेसने राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), शिवसेना (उद्धव ठाकरे गट), आम आदमी पक्ष, तृणमूल काँग्रेस आणि गोवा फॉरवर्डशी आघाडी केली आहे. त्यामुळे भाजपविरोधी मतांची विभागणी होणार नाही, असे काँग्रेसने अपेक्षित धरले आहे. केंद्रात आणि राज्यात भाजप सत्तेवर असल्याने मतदार उघडपणे भाजपविरोधी भूमिका घेणार नाहीत, असे काँग्रेसचे म्हणणे आहे.
भाजपच्या कारभाराला, वाढत्या महागाईला, बेरोजगारीला आणि ढासळलेल्या कायदा-सुव्यवस्थेला जनता कंटाळली असून ती भाजपविरोधी मतदान करेल, यावर काँग्रेसने भिस्त ठेवली आहे. त्यामुळे गुपचूपपणे, पण ठरवून केलेले मतदान हे भाजपविरोधीच आहे, असे काँग्रेसजनांचे ठाम मत असून चार जून रोजी गोव्यातील दोन्ही जागा हे सायलेंट मतदार काँग्रेसला जिंकून देतील, असे काँग्रेसला वाटते.
दोन्ही ठिकाणी धक्कादायक निकाल
मतदानोत्तर कल चाचण्यांचे निकाल जाहीर झाल्यानंतरही समाज माध्यमांवर या निकालांचे फारसे स्वागत होताना दिसत नाही. त्यामुळे मतदार या खेपेला मतदान केल्यानंतर गप्प राहिल्याचे जाणवते. या सायलेंट मतदारांवरच विरोधी पक्षांची मदार आहे. त्यामुळे चाचण्यांचे कल काहीही असले, तरी गोव्यातील दोन्ही जागांवर भाजपसाठी धक्कादायक निकाल लागू शकतील, असे काँग्रेस गोटाचे म्हणणे आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.