लोकसभा निवडणुकीच्या आज अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी कोणत्याही उमेदवाराने अर्ज मागे न घेतल्याने उत्तर व दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघातून प्रत्येकी ८ असे एकूण १६ उमेदवार रिंगणात राहिले आहेत.
रिव्होल्युशनरी गोवन्स (आरजी) पक्षाच्या उमेदवारांनी माघार न घेतल्याने काँग्रेसप्रणित इंडिया आघाडीची मते फुटणार हे स्पष्ट झाले आहे.
काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे कायम निमंत्रित गिरीश चोडणकर यांनी जाहीर आवाहन करूनही आरजीने आपले उमेदवार मागे न घेतल्याने काँग्रेसचे उमेदवार ॲड. रमाकांत खलप आणि विरियातो फर्नांडिस यांना आरजी आणि भाजप अशा दोन्ही आघाड्यांवर लढावे लागणार आहे.
कोणीही उमेदवारी अर्ज मागे न घेतल्याने उत्तर गोव्यातून ८ तर दक्षिण गोव्यातून ८ असे १६ उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत ते असे- उत्तर गोवा ः श्रीपाद नाईक (भाजप), ॲड. रमाकांत खलप (कॉँग्रेस), तुकाराम परब (आरजी), मिलन वायंगणकर (बसप), सखाराम नाईक (अपक्ष), थॉमस फर्नांडिस (अपक्ष),
ॲड. विशाल नाईक (अपक्ष) आणि शकील शेख (अपक्ष) दक्षिण गोवा : पल्लवी धेंपे (भाजप), विरियातो फर्नांडिस (काँग्रेस), रुबर्ट परेरा (आरजी), डॉ. श्र्वेता गावकर (बसप), हरिश्र्चंद्र नाईक (भ्रष्टाचार निर्मूलन पक्ष), आलेक्सी फर्नांडिस (अपक्ष), दीपकुमार मापारी (अपक्ष),
डॉ. कालिदास वायंगणकर
(अपक्ष). उत्तर गोवा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. स्नेहा गिते आणि दक्षिण गोवा निवडणूक निर्णय अधिकारी आश्विन चंद्रू यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोणत्याही उमेदवारांनी अर्ज मागे घेतलेले नाहीत. त्यानंतर सायंकाळी सर्व उमेदवारांना चिन्हे वाटप करण्याची प्रक्रिया करण्यात आली असून उमेदवारांना दिलेली चिन्हे ही मुख्य मतदार अधिकाऱ्यांना कळविण्यात आली आहेत. उमेदवारी अर्ज सादर केल्यापासून उमेदवारांना दैनंदिन खर्चाचा अहवाल निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना सादर करावा लागत आहे.
लोकसभा निवडणूक मतदानासाठी १६ दिवस बाकी
चिन्हांचे वाटप असे...
श्रीपाद नाईक (कमळ)
ॲड. रमाकांत खलप (हात)
तुकाराम परब (फुटबॉल) मिलन वायंगणकर (हत्ती) सखाराम नाईक (किटली) थॉमस फर्नांडिस
(अन्नाने भरलेले ताट)
ॲड. विशाल नाईक
(गॅस सिलिंडर)
शकील शेख (हेल्मेट)
पल्लवी धेंपे (कमळ) विरियातो फर्नांडिस (हात) रुबर्ट परेरा (फुटबॉल)
डॉ. श्वेता गावकर (हत्ती) हरिश्चंद्र नाईक (फुटबॉल खेळाडू)
आलेक्सी फर्नांडिस (फणस)
डॉ. कालिदास वायंगणकर (बोट)
दीपकुमार मापारी
(सीसीटीव्ही कॅमेरा)
काँग्रेसने उमेदवारीसाठी उत्तर गोव्यातून विजय भिके, सुनील कवठणकर व दक्षिण गोव्यातून एल्विस गोम्स, खासदार फ्रान्सिस सार्दिन, गिरीश चोडणकर इच्छुक होते. भाजपकडून उत्तर गोव्यातून माजी आमदार दयानंद सोपटे, तर दक्षिण गोव्यातून प्रदेश सरचिटणीस ॲड. नरेंद्र सावईकर, बाबू कवळेकर इच्छुक होते.
या साऱ्यांना काँग्रेस व भाजपने उमेदवारी दिली नाही. पैकी भिके व गोम्स यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली. मात्र, दोन्ही पक्षांनी आपल्या अधिकृत उमेदवारांआड कोणी पक्षाचा नेता कार्यकर्ता अपक्ष लढणार नाही याची काळजी घेतली आहे.
लोकसभेच्या २०१९ च्या निवडणुकीत उत्तर गोव्यातून भगवंत कामत व ऐश्वर्या साळगावकर हे दोन अपक्ष उमेदवार होते. त्याशिवाय श्रीपाद नाईक (भाजप), गिरीश चोडणकर (काँग्रेस), दत्तात्रय पाडगावकर (आप), अमित कोरगावकर (रिपब्लिकन पक्ष) हे उमेदवार रिंगणात होते.
दक्षिण गोव्यातून मयूर काणकोणकर व डॉ. कालिदास वायंगणकर हे दोन अपक्ष होते. त्याशिवाय फ्रान्सिस सार्दिन (काँग्रेस), ॲड. नरेंद्र सावईकर (भाजप), एल्विस गोम्स (आप), राखी नाईक (शिवसेना) हे उमेदवार रिंगणात होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.