Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीत उत्तर आणि दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघांत मतदानाचा टक्का किंचित वाढला आणि भाजपचा विजय पक्का झाला. मतदानाची टक्केवारी घटेल असा राजकीय अंदाज होता, मात्र भाजपने मतदान करण्यासाठी मतदार घराबाहेर पडतील, याची पक्षाच्या यंत्रणेमार्फत पुरेपूर काळजी घेतली. त्यामुळे २०१९ च्या तुलनेत किंचित वाढलेली मतदानाची ही टक्केवारी भाजपला लाभदायक ठरेल, असे काल सायंकाळी स्पष्ट झाले.
उत्तर गोव्यातून भाजपचे (BJP) श्रीपाद नाईक आणि दक्षिण गोव्यातून (South Goa) पल्लवी धेंपे यांचा विजय ४ जून रोजी जाहीर होणे, ही केवळ औपचारिकता बाकी आहे. राज्यभरातील १ हजार ७२५ मतदान केंद्रांवर सकाळी ७ वाजता मतदानास सुरवात झाली. कोठेही मतदारांच्या मोठ्या रांगा सकाळच्या सत्रात दिसून आल्या नाहीत. एकेक मतदार दोन ते सव्वादोन मिनिटांत मतदान करून केंद्राबाहेर पडत होता. त्यामुळे रांगा दिसत नसतानाही सकाळी ७ ते ११ या चार तासांत ३१ टक्के मतदान झाले होते. याचा अर्थ तासाला ७.७५ टक्के मतदान झाले होते.
भाजपने केलेल्या नियोजनानुसार दुपारी २ वाजेपर्यंत मतदानासाठी न फिरकलेल्या मतदारांना मतदानाची आठवण करण्यासाठी कार्यकर्त्यांनी दूरध्वनीवर संपर्क साधला. ज्यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क झाला नाही, त्यांच्या घरी कार्यकर्ते गेले. मतदानाचे पवित्र कर्तव्य बजावावे, याची आठवण त्यांना करून देण्यात आली. त्यानंतर हे मतदार मतदान केंद्रांपर्यंत पोचले.
मतदानावेळी यंत्रे नादुरुस्त होण्याचे अनेक प्रकार घडले. तब्बल १०९ यंत्रे दिवसभरात बदलावी लागली. २१ मतदान यंत्रे, २१ नियंत्रण युनिट तर ६७ व्हीव्हीपॅट यंत्रे बदलावी लागली, अशी माहिती संयुक्त मुख्य मतदार अधिकारी त्रिवेणी वेळीप यांनी दिली.
राज्यात यंदा लोकसभा निवडणुकीसाठी मतदानाची टक्केवारी वाढली आहे. ही वाढणारी मतदानाची टक्केवारी भाजपलाच लाभदायी ठरणार आहे. प्रखर ऊन आणि तीव्र उकाडा असला तरीही मंगळवारी लोकांचा सहभाग उत्साहपूर्ण होता. जनतेच्या याच प्रतिसादामुळे पुन्हा भाजप दोन्ही मतदारसंघांत विजयी होईल!
भाजपने या लोकसभा निवडणुकीत सरकारी यंत्रणेचा गैरवापर केला. दक्षिण गोव्यात निश्र्चितच कॅप्टन विरियातोंना यश मिळेल. आम्ही या निवडणुकीत आक्रमक; पण नियोजनबद्ध प्रचार केला असून त्याचा परिणाम मतमोजणीदिवशी दिसून येईल. कुंकळ्ळीत मुख्यमंत्री, मंत्री, उद्योगपती आले तरी त्यांचा प्रभाव मतदारांवर पडलेला नाही.
मानगाळ, साळजिणीत १०० टक्के मतदान: सांगे मतदारसंघातील अतिदुर्गम भागातील मतदारांनी शत-प्रतिशत मतदानाचा हक्क बजावला. या मतदारसंघातील मानगाळ गावात शंभर टक्के मतदान झाले. या गावातील सर्व २२३ ही मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. काजूगटो व कर्ला गावातील फक्त पाचच मतदार मतदानापासून वंचित राहिल्याने शंभर टक्के मतदान होऊ शकले नाही. तसेच साळजिणी गावातील सर्व मतदारांनी हक्क बजावल्याने या गावात १०० टक्के मतदान झाले.
कुडचडे मतदारसंघातील खामामळ येथील मिलाग्रीस दिनीज यांचे सोमवारी निधन झाले होते; पण त्यांच्या पत्नी मारियाना आणि पुत्र हॅस्टेन यांनी मंगळवारी मृत व्यक्ती घरात असतानाही मतदानाचा हक्क बजावला. मिलाग्रीस यांच्यावर आज संध्याकाळी चार वाजता कुडचडे स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
काणकोण मतदारसंघात मतांची टक्केवारी मतदान संपता संपता सुमारे ७८ टक्क्यांवर आली होती. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. खास करून सभापती रमेश तवडकर हे खूश दिसत होते. आमची दहा हजार मतांची आघाडी कुणीही नेलेली नाही. त्यामुळे भाजपचा विजय निश्चित आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला फक्त ५,०८६ मतांचीच आघाडी प्राप्त झाली होती. मात्र, यंदा मताधिक्य वाढले आहे.
मुरगाव तालुक्यातील चार मतदारसंघांत यंदा टक्केवारी वाढली आहे. यातील एक कुठ्ठाळी मतदारसंघ सोडल्यास अन्य तीन मतदारसंघ भाजपला पोषक आहे. केपे आणि कुडचडे या दोन मतदारसंघांत मतांची टक्केवारी ७८ टक्क्यांच्या आसपास असून त्यातील किती मते काँग्रेसला पडतील, यावर दक्षिण गोव्याचे गणित ठरणार आहे. त्यामानाने सासष्टीतील आठ मतदारसंघांतील मतांची टक्केवारी ७२ टक्क्यांच्या आसपास असून हा काँग्रेससाठी चिंतेचा विषय आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.